Blog Archive

Wednesday, 11 January 2017

चारित्र्यहनन: इतिहास आणि वर्तमान-राज कुलकर्णी

नवीन वर्षाच्या सुरवातीला पुण्यातील संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा 'संभाजी ब्रिगेड'ने रातोरात उखडून मुठा नदीत फेकून देण्याच्या घटनेची चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील तपमानाचा पारा शून्याच्या जवळ पोचला असतानाच सामाजिक-राजकीय क्षेत्रात मात्र ग्रीष्माच्या झळा जाणवू लागल्या. एकदम तप्त आणि संतप्त प्रतिक्रिया दोन्ही बाजूने सुरु झाल्या. या वादात प्रत्येकजण आपापली बाजू हिरीरीने मांडताना दिसतो आहे.

संभाजी ब्रिगेड या संघटनेचे नुकतेच राजकीय पक्षात रुपांतर झाले आहे. पुण्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच त्यांनी हे पाऊल उचलण्याने त्याला राजकीय अर्थही असल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. राजकीय उद्दिष्ट समोर ठेवून केलेल्या अशा कांही  घटना राजकीय पक्षाला मतांचा फायदा करून देण्यास पोषक असतात, हे महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने वारंवार अनुभवलेले आहे. आज सत्तेवर असणाऱ्या भाजपा या पक्षाने १९८४ साली २ जागा असताना १९९६ सालात सरकार स्थापन करण्यापर्यंत जी मजल मारली ती अशाच एका कृत्याने होती. कोणी धर्मवादाच्या नावाखाली तर कोणी जातीवादाच्या नावाखाली मतांचे पीक घेण्याचा उद्योग सातत्याने केलेला आहे. त्यामुळे या अशा नव्या राजकीय पक्षांनी आपले राजकीय चारित्र्य कसे ठेवावे हे सांगण्याचा अधिकार आज अनुभवी
असणा-या कोणत्याच राजकीय पक्षाला उरलेला नाही.

गडकरी यांचा पुतळा हटविण्याच्या घटनेबाबत ज्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने आल्या त्या ध्रुवीकरण करणाऱ्या होत्या, त्या तशा असाव्यात हीच ती कृती करणार्‍यांची अपेक्षा होती असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही. पुतळा काढण्याच्या कृतीचे समर्थक 'जे समर्थन करतात तेच शिवप्रेमी आणि निषेध करणारे सर्व जण मनुवादी आहेत' अशी मांडणी कांहीजण करत होते, तर दुसऱ्या बाजूने 'पुतळा काढणारे म्हणजे जातीयवादी आणि ब्राह्मण द्वेष्टे' असल्याची भूमिकाही कांहीनी मांडली.

यावर दोन्ही बाजूंनी गेल्या सात दिवसात एवढे लिहिले आणि बोलले आहे की त्यावर चर्चा करण्यात कांहीच अर्थ नसल्याचे पुरेसे स्पष्ट झाले आहे. अशी स्थिती आज केवळ महाराष्ट्रातच निर्माण झाली आहे असे नसून, सध्या देशातील एकूणच राजकारणाचा समाजकारणाचा दर्जा एवढा घसरलेला आहे की, आपल्या विशिष्ट मताबाबत वा धारणेबाबत ज्याने मतभेद व्यक्त केले तो थेट पणे शत्रू झालेला आहे. राजकारणात तर ही परिस्थिती यापेक्षाही बिकट असून सरकारचा विरोधक हा देशद्रोही म्हणून ठरवला जात आहे. त्यास सरळ पाकिस्तानवादी ठरवून पाकिस्तानात पाठविण्याचीही  भाषा केली जाते आहे.

महाराष्ट्रात हे सर्व घडत असतानाच चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलावंत ओम पुरी यांचे निधन झाल्याची बातमी आली. देखणा चेहरा नसूनही अभिनयाच्या क्षेत्रात मापदंड निर्माण केलेल्या ओम पुरी यांनाही मृत्यूनंतर तात्काळ चारित्र्यहननाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या दारूच्या व्यसनावर, कौटुंबिक वादाबद्दल अपमानास्पद भाष्य करण्यात आले. 'पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात काम करण्यास परवानगी असावी' असे मत त्यांनी व्यक्त केल्यामुळे त्यांना देशद्रोह्यांच्या यादीत टाकले गेले आणि सतत लक्ष्य केले जात होते. त्यांच्या मुलाखतीत त्यांच्या तोंडातून भावनेच्या भरात बाहेर पडलेल्या एखाद्या वाक्याचे भांडवल करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या गेल्या. याबद्दल त्यांनी उद्विग्न होवून माझ्या जिवास कांही बरे वाईट झाले तर (राष्ट्रभक्तीच्या नावावर हा धुरळा उडवून देणारे) पंतप्रधान जवाबदार असतील असे ट्विट केले होते. अर्थात ओम पुरींच्या मृत्युमुळे या षड्यंत्रात सहभागी असलेल्या लोकांना त्यांना अधिक त्रास देण्याची किंवा यु. आर. अनंतमूर्तीचे निधनानंतर केल्याप्रमाणे फटाके उडवून आपला विकृत आनंद  व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही.

या सर्व  घटना अजून ताज्या असतानाच नुकत्याच प्रकाशित झालेल्या स्वाती चतुर्वेदी या पत्रकाराच्या ‘ आय अँम अ ट्रोल’ या पुस्तकाने या अनुभवा मागच्या  मानसिकतेवर शिक्कामोर्तब केले. या पुस्तकातील  दाव्यानुसार भाजपा सरकारच्या विरोधात असणाऱ्या किंवा मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांना लक्ष्य करून त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांची खिल्ली उडवणे, त्यांची प्रतिमा जनमानसात मलीन करणे यासाठी भाजपने एक स्वतंत्र फौज निर्माण केली होती आणि आजही ती आहे. जिच्या माध्यमातून अनेक खोट्या आणि चारित्र्यहनन करणाऱ्या बातम्या विविध माध्यमातून पद्धतशीरपणे पसरविण्यात येत आहेत.

भारत हा जगाच्या पाठीवर असा देश आहे, जिथे सामाजिक चारित्र्याच्या बरोबरीने व्यक्तिगत चारित्र्यास देखील तितकेच महत्व दिले जाते. याच मानसिकतेचा फायदा घेऊन उज्ज्वल सामाजिक चारित्र्य असणाऱ्या म्हणजेच सर्वसामान्य जनमानसाच्या हित पाहणाऱ्या व त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचा विरोध करण्याऐवजी त्याच्या मूल्यांना बदनाम  करण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्यहननाचा  मार्गच सर्रास स्वीकारला जाताना  दिसतो.

आपल्या हितसंबंधाच्या आड येणाऱ्या, विरोधी विचारधारेच्या असामान्य व्यक्तिमत्वांचे खच्चीकरण करण्यासाठी सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात कार्य करणारे, सार्वकालिक सनातनी 'ट्रोलिंग'च्या किंवा झुंडशाहीच्या माध्यमातून अशा प्रकारचे चारित्र्यहनन सातत्याने करत आले आहेत. याचे बळी अगदी बळीराजापासून ते अगदी आधुनिक काळातील नेहरू गांधी पर्यंत दिसून येतात.आधुनिक काळात या पद्धतीचा वापर जनसंघ वा भाजपाने १९५६  सालच्या
दुस-या सार्वत्रिक निवडणूकीतील अपयशानंतर सुरू केलेला आहे. त्यावेळी हे कुजबूज आघाडी, तथाकथित  बौद्धिके, शाखांच्या माध्यमातून जमवलेले कार्यकर्ते, मंदिरातल्या बैठका यांच्या  माध्यमातून होत असे. आज ते 'डिजिटल'  माध्यमांचा  वापर करत आपले स्वीकृत कार्य दुप्पट जोमाने करताना दिसत आहेत.

देश स्वतंत्र झाल्यावर देशातील सर्व जाती-धर्माच्या, भाषा-संस्कृतींच्या जनतेला बंधुत्वाच्या एका धाग्यात गुंफणारा धर्मनिरपेक्षता हा विचार आणि संसदीय लोकशाही पं. नेहरूंनी रूजवली.  यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी, या दोन मूल्यांचा विरोध करण्यासाठी किंवा ही मूल्येच चुकीची आहेत हे सांगण्यासाठी ज्या व्यक्तीने ही मूल्ये रुजवली किंवा जो व्यक्ती या मूल्यांचे समर्थन करतो त्या त्या व्यक्तींची अधिकाधिक बदनामी करून चारित्र्यहनन करायचे असा प्रकार  सुरू झाला. हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षापासून नेहरूं तथा महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची  बदनामी करण्यासाठी वापरला गेला. आज डिजिटल युगात मदतीला 'सोशल मीडिया' आहे, पैशाने बटीक केलेली चॅनेल्स आहेत, स्रोत उघड न झालेल्या पैशांतून सुरु झालेल्या आणि  एकाच  प्रकारचेच नव्हे तर एकच लेखन प्रसिद्ध  करून त्यांचा पल्ला  वाढवणार्‍या इंटरनेट वेबसाईट्स आहेत. पूर्वीच्या कुजबुज आघाड्यांना नव्या माध्यमांचे पंख लाभल्यामुळे त्यांचे
काम आज अनेक पटीने सोपे झाले आहे. हेच काम मध्ययुगीन कालखंडात बखरींनी केले! संभाजी महाराज सुद्धा याच प्रकारच्या चारित्र्यहननाचे बळी ठरले असल्याचे दिसून येते आहे.

शिवाजी महाराजांनी जेंव्हा आपले राज्य शून्यातून उभे केले तेंव्हा त्या उभारणीच्या कार्यात अनेकांनी मदत केली होती. राज्य अभिषेकानंतर महाराजांनी नेमलेल्या प्रशासनातील अनेकांनी पूर्वी केलेल्या त्यागामुळे महाराजांनी त्यांच्या कांही दुर्गुणांकडे वा अपराधांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र संभाजी महाराजांनी प्रशासनात आणलेला काटेकोरपणा आणि त्यांची त्यावरील पकड यातून अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले होते. पुढे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकाराच्या विषयासंदर्भात असे अनेक जण शाहू महाराजांच्या ऐवजी राजाराम महाराजांच्या पाठीशी उभे राहून मतभेदाला मोठ्या संघर्षाचे रूप देऊन  या संघर्षाला खतपाणी घालताना दिसून आले. हा ट्रेंड आधुनिक काळातही आढळून येतो आहे. देशातील जनतेने 'गांधी ऐवजी सावरकरांचे नेतृत्व स्वीकारायला हवे होते' म्हणणे असो किंवा 'नेहरूंच्या ऐवजी पटेल हे पंतप्रधानपदाला अधिक लायक होते' असा दावा करणारे या प्रकारच्या संघर्षाला चेतवून त्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या  भाजून घेणार्‍यांच्याच जातकुळीचे असतात. अर्वाचीन काळातले हे संदर्भ  ऐतिहासिक संदर्भातही  अभासी संघर्ष असल्याच्या इतिहास निर्माण करण्याच्या प्रयत्नांच्या  पातळीवरच पाहावे लागतात. 

संभाजी महाराजांची छत्रपती पदाची कारकीर्द अवघी नऊ वर्षाची!  पण तरीही त्यांच्या कारकिर्दीचे  महत्व कमी करण्यासाठी त्यांच्यातील कांही बाबींना मुद्दामहून त्यांचा अवमान होईल या पद्धतीने मांडण्यात आले, तेही त्यांच्या मृत्युनंतर कित्येक वर्षांनी लिहील्या गेलेल्या बखरीतून ! यातील सभासदाची बखर १६९६ सालातील आहे तर चिटणीसची बखर १८११ सालातील आहे. (यावर तज्ञांनी प्रकाश टाकला तर योग्य)  माझा मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास अल्प आहे. पण तर्काच्या आधारे अनेक बाबी समजून घेता येऊ शकतात. संभाजी महाराजांवर व्यसनधीनतेचा आणि अनैतिक चारित्र्याचा कथित आरोप केला गेला, तो खोटाच असण्याची शक्यता जास्त आहे. धर्मातील तत्वानुसार क्षत्रियांना मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य नाही. क्वचित प्रसंगी  केलेले मद्यपान व्यसनही ठरत नाही. मग याचा बखरीमध्ये आवर्जून केलेला उल्लेख खरेतर गरजेचाच नव्हता शिवाय तत्कालीन समाज धारणांनुसार बहुपत्नीत्व देखील समाजमान्य होते. दक्षिणेतील बहुतेक राज्यात तर  प्रथम  पत्नी अथवा पट्टराणी सोबतच अनेक पत्नी असण्याची वा विवाह  करण्याची प्रथा होती. या पत्नी प्रामुख्याने विविध सामंत अथवा सरदार घराण्यातील असत आणि असे विवाह हे राज्याला स्थैर्य आणण्याच्या दृष्टीने केल्या जाणार्‍या राजकारणाचा भाग म्हणूनच केले जात. त्यामुळे संभाजी महाराजांच्यासंबधात  कोण्या स्रींयांचा उल्लेख करण्याचे काहींच कारण नव्हते. मुळात या सर्व बखरी विश्वासार्ह नसल्याचे मत ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकारांनी यापूर्वीच नोंदवून ठेवले आहे. शिवाय ती लिहीणा-याच्या मनात कोणता आकस होता, हे ही पाहणे गरजेचे ठरते. अर्थात माझे आकलन चुकीचेही असू शकते. आज एवढी माहिती नि पुरावे उपलब्ध असतानाही  बिनदिक्कतपणे खोटे बोलत गांधी-नेहरूंच्या बदनामीचे चाललेले आजचे प्रयत्न पाहता ३०० वर्षापूर्वी  राजाश्रय  असलेल्या बखरकारांनी मांडलेल्या लेखनातही हेतूत: कांही लिहीले जाणे  अगदीच स्वाभाविक दिसते. अशा बखरींच्या विश्वासार्हतेची ही आधुनिक काळातील जाणीव विसाव्या शतकाच्या सुरवातीला नव्हती. ललित लेखक इतिहासाचे तपशील प्रामुख्याने उपलब्ध असलेल्या अशा साधनांतूनच  घेत असत हे उघड होते. जे संभाजी महाराजांबात घडले तेच शरद पोंक्षे यांच्या नाटकातून महात्मा गांधीबाबतही घडले.

भारतीयांचे इतिहास लेखन आजच्या एकविसाव्या शतकात देखील व्यक्तिकेंद्रित असेच असून त्याचे स्वरूप Dynastical History असेच राहिलेले आहे आणि ते Social History या स्वरूपापासून खूप दूर आहे. काळाच्या ओघात राजेशाही संपली आणि लोकशाहीचा आधुनिक कालखंड सुरु झाला तरीही अशा बखरींच्या आधारावर नाट्य लेखन किंवा कादंबरी लेखन कळत नकळत चालू ठेवण्यात आले. सद्यस्थितीत  गैरसोयीच्या सामाजिक व्यवस्थेवर टीका करण्यासाठी  त्यात आपल्या सोयीचे  बदल घडवून आणण्यासाठी प्रथम ते वारसा सांगत असलेल्या तत्कालीन नेतृत्वाचे चारित्र्यहनन करून त्याला पदभ्रष्ट करण्याचामार्ग अंगीकारला जातो. म्हणून मध्ययुगीन काळात संभाजी महाराजांचे केले गेलेले चारित्र्यहनन हा अशाच षडयंत्राचा भाग असल्याचे ठामपणे म्हणता येईल.

गैरसोयीच्या श्रेष्ठ व्यक्तींच्या चारित्र्यहननाचा हत्यार म्हणून वापर केल्याचा पुरावा आधुनिक  काळातही पाहायला मिळतोच आहे. मोदींचा उदय आणि अनेक श्रेष्ठ व्यक्तींच्या बदनामीच्या कालखंडाला आलेले उधाण हा कांही योगायोग म्हणता येणार नाही! नेहरू पटेलांच्या अंत्यविधीला हजर असल्याची ध्वनिचित्रफीत असताना, तत्कालीन वृत्तपत्रांतून त्यांची फोटोसह बातमी आल्याचे पुरावे उपलब्ध असतानाही  मोदींनी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर ‘नेहरूंनी पटेल यांच्या अंत्यविधीला टांग मारली!’ असा धादांत खोटा आरोप केला होता. त्यांच्या बेफाम आणि वाचाळ भक्तांनी हा प्रचार पुढे एवढा वाढवला की, नेहरू हे चारित्र्यहीन होते हे सांगण्यासाठी नेहरू यांचे शेख अब्दुलांच्या पत्नीशी आणि लेडी एडविनाशी सबंध होते इथपर्यंतही लिहीले  गेले. पुढे तर नेहरूंचे जीवशास्त्रीय बाप मुबारक आली होते इथपर्यंत हे पोचून पुन्हा नेहरू हे घराणेच मुस्लीम होते (मुस्लिम असणे हा त्यांच्या देशद्रोहाचा पुरावा असल्याचा  अलिखित संकेत करणारा) असाही प्रचार करण्यात आला. नेहरू हृदयविकाराच्या झटक्याने मृत झाले याचे वैद्यकीय अहवाल उपलब्ध असतानाही ते ‘सिफिलीस’ने वारले इथपर्यंतही प्रचार झाला. नेहरुंचा मृत्यू होऊन त्यांची राख होवून पन्नास वर्षे झाली. पण आज या बाबींचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कारण म्हणजे नेहरूंनी प्रचलित केलेल्या मूल्यांना गाडण्याचा प्रयत्न करणे हेच आहे. हे केवळ संघाकडून झाले असे नव्हे तर शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या नेत्याने सुद्धा नेहरूंवर टीका करताना सिफिलीसमुळे मेंदू काम करत नाही, असा वाह्यात आरोप केला होता. परवा तर नेहरूंचा जन्म वेश्यांची वस्ती असणाऱ्या अलाहाबाद मधील मीरगंज परिसरात झाला असल्याची बातमी पसरवली गेली. बातमी वस्तुस्थितीचे विपर्यस्त चित्रण करणारीच होती. पण समजा हे खरे आहे म्हटले तरी त्याचा आणि त्यांच्या विचारांचा कुठे संबंध येतो. कोणी कुठे जन्म घ्यावा हे कोणाच्या हातात नसते आणि मनुष्य जन्मावरून नव्हे तर कर्मावरून मोठा ठरतो, हा मुद्दा  अस्मिता आणि अहंकार यांच्या प्रादुर्भाने मेंदू काम करेनासे झालेल्यांच्या डोक्यात येणे शक्यच नाही.

वस्तुनिष्ठ टीका करून प्रतिवाद करणे अवघड होऊ लागले की सर्वच विचारधारांचे लोक याचा वापर करू लागतात. सनातनी लोक यात प्रथमपासून आघाडीवर आहेतच, पण स्वतःला पुरोगामी म्हणवणारे देखील क्वचित या प्रकाराचा अवलंब करताना दिसतात. सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांचा मी देखील कट्टर विरोधक आहे, पण त्यामुळे त्यांच्या विचारांना विरोध करताना त्यांना ‘संडासवीर’ अशा शब्द वापरणे हे अश्लाघ्य वृत्तीचे नि विचारांच्या खंडनाशिवाय, केवळ चारित्र्यहननाच्या आधारे त्यांचे तथाकथित स्थान हिरावून घेण्याचा प्रयत्नाचेच उदाहरण आहे. हाच प्रकार ‘पायपोस किमतीचे पेशवे’ या ग्रंथातही  पाहायला मिळतो. अगदी नुकताच गडकरीं यांच्यावर टीका करण्यासाठी लिहिलेल्या इंद्रजीत सावंत यांच्या लेखात गडकरी यांच्या कथित प्रेमपात्राचा आणि प्रेमभंगाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. लेखक बदफैली होता की नाही हे सिद्ध करण्याने त्याने लिहिलेल्या लेखनातून एखाद्या व्यक्तीची बदनामी होते हे मुळीच सिद्ध होत नाही, पण मुळात ज्या हेतूने हा सारा प्रकार घडवला गेला ते ध्रुवीकरण मात्र नक्की साधते. ऐतिहासिक व्यक्तींचे चारित्र्यहनन हे स्वतंत्र विषय म्हटला तरी सध्याच्या कालखंडात राजकीय हेतूसाठी व जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी फोटोशॉप सारख्या तंत्राने जिवंत व्यक्तींचे देखील चारित्र्यहनन केले जात आहे.

इतिहासातील माहिती ही केंव्हाच पूर्ण सत्य असू शकत नाही, त्यामुळे इतिहास भावनेतून नव्हे तर विचारांच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यासायला हवा.  
  
एखाद्याने गैरसोयीचा मुद्दा मांडला की त्या मुद्द्याऐवजी थेट त्याची लायकी काढणारी शेंडा-बुडखा नसलेली शेरेबाजी करणे हा ट्रोलिंगचा प्रकार गेल्या दोन-चार वर्षात चांगलाच फोफावला आहे. काल परवा बीएसएफच्या जवानाने आपल्याला मिळणार्‍या अन्नाच्या निकृष्टतेबद्दल थेट वीडिओच प्रसारित केला तेव्हा बीएसएफ तर्फे पहिली प्रतिक्रिया होती ती 'तो मनोरुग्ण असल्याची', वीडिओत स्पष्ट दिसणार्‍या अन्नाच्या निकृष्टतेबद्दल नव्हे! यावरून हा चारित्र्यहननाचा रोग आता आपल्या सर्वांच्या वृत्तीत नि समाजात किती खोलवर रुजला आहे हे दिसून येते आहे.
© राज कुलकर्णी.

No comments:

Post a Comment