नोटाबंदी,खासदार पगारवाढ आणि शास्त्रीजींचा संबंध काय ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. नोटबंदी झाल्यावर जी परिस्थिती निर्मण झाली त्यामुळे मला तरी शास्त्रीजींची आठवण येत होती, कारण अनेक महिलांनी आपल्या नव-याच्या माघारी साठवलेले पैसे यावेळी बाहेर आले होते. विनोदाचा भाग सोडून शास्त्रीजींच्या आयुष्यात हि अशीच साधर्म्य असणारी गोष्ट घडली होती. एकदा त्यांच्या जवळच्या मित्राला पैशाची गरज होती तेंव्हा तो आपला मित्र असणा-या पंतप्रधान शास्त्रीजींकडे जाऊन मदत मागितली. तेंव्हा शास्त्रीजी म्हणाले कि माझ्याकडे पैसे नाहीत. तोच त्यांच्या पत्नीनी पैसे आणून दिले. तो मित्र गेल्यावर त्यांनी पत्नीकडे चौकशी केली असता त्यांच्या पगारातून ५ रुपये वाचवून पत्नीने ते पैसे साठवल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पत्र लिहून कळवले कि माझा पगार माझ्या गरजेपेक्षा जास्त होतोय त्यामुळे त्यातून ५ रुपयांची कपात करावी. किती आश्चर्यकारक गोष्ट आहे हि. जगात पगार वाढवा म्हणून लिहलेली अनेक पत्र, आंदोलन झाली, पण पगार कमी करा म्हणणारा हा अवलिया पहिलाच ! आज जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर कधी हि एक न होणारी राज्यकर्ती मंडळी स्वतःचा पगारवाढीच्या निर्णयावर मात्र एकसाथ उभे होतात हि लोक कधी शास्त्रीजींचा आदर्श घेतील ?
हि प्रेरणा त्यांना कुठून मिळाली ? त्यांची साधी राहणीमान, खर्चाला फाटा, कमी गरज हि तत्व कोणाची आहेत ? हि सगळी प्रेरणा आहे गांधी विचारांची! शास्त्रीजी एकदा म्हणाले होते "लोकांना खरी लोकशाही व स्वराज्य कधी हि असत्य व हिंसेने मिळणार नाही" हि तत्वे गांधी तत्वे नाहीत का ? शास्त्रीजींचा आधार गांधी विरोधासाठी घेणारी काही विद्वान मंडळी याकडे का दुर्लक्ष करतात ? हा हि संशोधनाचा मुद्दा आहे असो, शास्त्रीजींच्या याच सदगुणांनी जनतेच्या मनावर राज्य केलं होत. "जय जवान, जय किसान" नारा देत त्यांनी जनतेला तत्कालीन टंचाई सदृश्य परिस्थितीवर उपाय म्हणून सोमवारचा एक दिवस उपवास करायला सांगितलं होत. टंचाई गेली पण शास्त्रीजींनी दिलेलं वचन म्हणून त्यावेळेची लोक आज हि सोमवारचा उपवास करतात, हे पाहून शास्त्रीजींच्या कार्याची महती लक्षात येते. हा शास्त्रीजींच्या आचरणाचा प्रभाव आहे, नाही तर आज काल "लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण "अशी मंडळी खूप आहेत. देशाचा पंतप्रधान असताना हि गाडी घेण्यासाठी कर्ज काढणारा पंतप्रधान, अन त्यांच्या मृत्यूनंतर त्या कर्जाचे हप्ते फेडणारा शास्त्री परिवार या देशाला लाभणे हा दुर्मिळयोग आहे. गांधींचे फक्त नाव घेणा-या आजच्या राजकर्त्यांनी गांधीचा शिष्योत्तम शास्त्रीजींकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. शास्त्रीजींच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन .....
लेखक- विवेक सिद्ध.
No comments:
Post a Comment