नथुराम गोडसेचा उदोउदो करणार्या काही पोस्ट्स आज पाहण्यात आल्या तेंव्हा मी एम एस्सीला असतांनाचा एका कट्टर हिंदुत्ववादी ब्राह्मण मित्राशी झालेला संवाद आठवला :
मित्र : तू स्वत: ब्राह्मण असून ब्राह्मणाच्या शत्रूला (गांधीजी) कसा काय मानू शकतोस?
मी : मग मी कोणाला मानावे?
"अर्थात नथूरामाला, तो ब्राह्मण होता"
'मित्रा पण नथुराम तर स्वत: ब्राह्मण असून ब्राह्मणांच्याच मूळावर उठला होता हे तू विसरतो आहेस'
"कसा काय?"
'साधी गोष्ट आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय नेत्याला मारल्यावर मारेकर्याची जात शोधली जाईल आणि त्या जातीलाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल हेही न कळण्या इतकी निर्बुद्धता नथुराम, आपटे आदी मारेकर्यांमध्ये ठासून भरलेली होती. गांधी हत्त्येनंतर हजारो ब्राह्मण देशोधडीला लागले, वाडे जाळले गेले, तरूण मुलींवर बलात्कार झाले, तरूणांना जाळले गेले. हा विध्वंस अमानवी आणि निषेधार्हच होता, पण हे सर्व झाले ही वस्तुस्थिती होती. आपल्या एका कृत्याने आपल्या हजारो जाती बांधवांना इतके भोगावे लागेल हे साधे सामाजिक वास्तव ज्याच्या लक्षात सुद्धा आले नाही त्याला माथेफिरूच म्हणले पाहिजे'
"पण हे गांधीच्या हत्त्येमुळेच झाले नाही का?"
'मित्रा, कुठलेही कलेवर कुठलाच आदेश देऊ शकत नाही ! त्यामुळे हे तर नक्कीच की गांधीनी ब्राह्मणांना ठोका हा 'मरणोत्तर' आदेश दिला नसणार ! गांधीवाद्यांनी हातात शस्त्र कधीच घेतले नाही. गावागावात ब्राह्मणांचे वाडे ज्यांच्या डोळ्यात खुपत होते त्यांनी गांधी हत्त्येचा मूहूर्त साधला इतकंच ! नथुराम पुण्याच्या बाहेर कधी गेलाच नसावा आणि म्हणून महाराष्ट्रात खेड्यापाड्यात ब्राह्मणांची एखाद दुसरीच असलेली घरं जाळली जातील एवढंसुद्धा कळण्याची त्याच्या बुद्धीची कुवत नव्हती. आणि मित्रा, आजही असे अनेक ब्राह्मण आहेत ज्यांची हे कळण्याची कुवतच नाही की जात म्हणून जे सर्वाधिक नुकसान ब्राह्मणांचे केले ते नथुरामानेच केले ! ज्यांना काही ब्राह्मणांनी विनाकारण आपला शत्रू मानले त्या मोंढ वाणिया जातीत लौकिक अर्थाने जन्माला आलेल्या गांधीजींनी काय केले? तर त्यांचे गुरू गोखलेही ब्राह्मण आणि पहिले सत्त्याग्रही शिष्य विनोबा भावेही ब्राहमण! आज प्रचलित झालेल्या बहुजनवादाला थारा न देता पहिले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान म्हणून तीनही ठिकाणी ब्राह्मणांचीच निवड करणारे गांधीजी ब्राह्मण विरोधी कसे हे तूच मला समजावून सांग आता.'
".........." (शांतता !)
हा संवाद तेंव्हा तर तिथेच संपला पण आज फेसबुकवरच्या काही पोस्ट्स वाचून लक्षात आलं की निर्बुद्धता अजूनही संपलेली नाही !
विश्वभर चौधरी
No comments:
Post a Comment