काॅलेजच्या रणसुभे सरांनी विचारलं,"जगन फडणीस सरांना तुझं अक्षर आवडलं आहे त्यांना त्यांच्या पुस्तकातील काही बाबी परत लिहायच्या आहेत तर तू त्यांना लिहायला मदत करायला जातोस का? ते त्याबद्दल तूला मोबदला पण देतील." येवढ्या मोठ्या माणसासोबत काही दिवस काम करायला मिळतं आहे म्हटल्यावर मोबदल्याचा विचार न करता मी जगन फडणीस सरांकडे जावू लागलो.काॅलेज संपल की होस्टेलला यायचं, जेवायचं,जरा आराम करायचा आणि मग सायकल घेवून राजारामपुरीत जायचं मग चार पासून सात साडेसात पर्यंत सर सांगतील ते लिहून काढायचं...गप्पा मारायच्या..एक दोनदा चहा व्हायचा.काही वेळेला पानसरे सर यायचे मग त्यांच्या गप्पा रंगायच्या मी आपला हे सारं बोलणं शांतपणे ऐकत बसायचो.मस्त होतं ते सारं...
लहान असताना किंवा काॅलेजमधे पण महात्मा गांधी बद्दल मला कधी आकर्षण वाटले नव्हते..वयाचा आणि वाचनाच्या अभावाचा परिणाम म्हणून मला क्रांतीकारी चळवळ आकर्षीत करायची.गांधीबद्दल चांगली पुस्तकं हातात येण्याच्या अगोदर.."पंचावन्न कोटींचे बळी" वगैरे सारखी खोटी,गांधीवर चिखलफेक करणारी पुस्तक वाचनात आली होती..मग मला पण अहिंसा वगैरे मुल्ये खटकू लागली.गांधींजींचा "वध" केला गेला,तो गरजेचा होता,गांधीमुळेच फाळणी झाली,पंचावन्न कोटी गांधीनी पाकिस्तानाला दिले म्हणून त्यांचा "वध" केला ते बरोबरच वाटत होते.हे सारं खोटं आहे हे सांगणारं किंवा त्याबद्दल हे हे वाच म्हणणारं कोणी नव्हतं "गांधीवादी" कोणी हे समजावून सांगतील ही अपेक्षा पण नव्हती.आयुष्याच्या या टप्प्यावरती फडणीस सरांची ओळख झाली...
"क्रांतीकारकांचे योगदान कोणीच नाकारत नाही..पण सशस्त्र पद्धतीने भारतातील ब्रिटिश सत्ता उलथून टाकणे शक्य नव्हेत कारण ब्रिटीश सत्ता प्रचंड मोठी होती..जगभर पसरलेले ते साम्राज्य होतं..आणि मुळातच ज्या देशात आगपेटीचे कारखाने १९१५/१६ नंतर सुरू झाले तो देश शस्त्रास्त्रे कुठून आणणार होता..? त्यासाठी लागणारा पैसा,तंत्रज्ञान आपण कोठून आणणार होतो? याचं उत्तर आपल्याकडे नसतं.सशस्त्र क्रांतीच तत्वज्ञान अनेकांना भूरळ पाडतं पण प्रत्यक्ष त्या मार्गावर चालणारे मोजकेच असतात. गांधीजींनी मांडलेले विचार न पटणारे बरेच होते पण प्रत्यक्ष आंदोलनात मात्र लाखो लोक सहभागी होत असतं फरक हा होता.गांधीचे विचार कधीच आकर्षक ठरले नाहीत कारण त्यांच्या विचार,कार्य व मार्गात काही "थ्रीलच" नाही असचं काहींना वाटतं.पण हाच साधा मार्ग देशाला स्वातंत्र्यापर्यंत घेवून गेला होता हे पण खरं आहे.अरविंद देशपांडे सरांचे एक आवडतं वाक्य आहे जे गांधीजींच्या विचार व मार्गाचे यश अधोरेखित करते.,"क्रांतीकारकांनी कमीत कमी लोकांकडून जास्ती जास्त त्यागाची अपेक्षा केली तर गांधीजींनी जास्ती जास्त लोकांकडून कमीत कमी त्यागाची अपेक्षा केली..."पण हे नंतरच समजलं.
महात्मा गांधींना मारण्याचे बहुतेक सारे प्रयत्न महाराष्ट्रातून झाले होते.अशा सात प्रयत्नांची सुरवात १९३४ पासून पुण्यातली गांधीजींच्या मिरवणूक मार्गावर बाॅंम्ब टाकून केली गेली होती. यातले बरेच प्रयत्न नथुराम गोडसे व सहकार्यांनी केले होते.
महाराष्ट्रात पेशवाई गेल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या रुपाने एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला होता ज्याच्याकडून परत महाराष्ट्रात पेशवाई स्थापन होईल अशी काहींना अपेक्षा होती. लोकमान्यांचा मृत्यू होणं आणि त्याचवेळी गांधींचा राजकीय उदय होणं व चळवळीचे सत्ताकेंद्र महाराष्ट्रा बाहेर जाणं अनेकांना खुपत होतं. लोकशाही,सामान्यांच्यात राष्ट्रवादाचा गांधींनी रूजवलेला विचार काहींना त्रासदायक ठरत होता. गेलेली पेशवाई परत आणणं(हिंदुराष्ट्र वगैरे) याचसाठी महाराष्ट्रातील एक गट काम करत होता.गांधी त्यात अडचणीचे ठरत होते.त्यांना संपवणे हा मग यांचा उद्योग होता.आणि त्याची सुरवात झाली होती ती १९३० पासून तेंव्हा ना फाळणी झाली होती,तेंव्हा ना ५५ कोटी दिले होते,तेंव्हा ना मुस्लिमांचे लालूंगचालून केले होते...ना नथुराम माथेफिरू होता.पण हे वाचणार कोण?आणि मुळात लिहणार कोणं.
जगन फडणीस सरांनी बर्याच वर्षांपूर्वी या विषयावर"महात्म्याची अखेर" हे पुस्तक लिहलं होतं.त्यानंतर त्यांना धमक्या आल्या होत्या,तशी धमकीची पत्रं आली होती.त्याच पुस्तकाचं नव्याने लेखन करताना सरांनी मला लिखाणासाठी मदत करायला बोलवलं होतं..त्यानिमित्ताने हे पुस्तक वाचलं,जगन फडणीस सरांसोबत गप्पा मारता आल्या आणि गांधींना थोडंफार वाचून पाहता आलं.गांधी हत्येबद्दल ज्यांना किमान काही तठस्थपणे समजून घ्यायचं आहे त्यांनी हे पुस्तक किमान वाचावं.३० जानेवारी येतोय काहींचा गांधी द्वेष टोकावर पोहचला असेल. गांधी मरणार नाहीच तरी पण त्या नावाभोवती तयार केलेली काही जळमटं आपल्याला साफ मात्र नक्की करता येतील. लोकवाड:मयने प्रकाशित केलेलं हे लहानसं पुस्तक त्यासाठी नक्कीच आपल्याला मदत करेल...!!
शरद पाटील
No comments:
Post a Comment