गांधींच्या ऐवजी मोदींचं चित्र हा वाद एखाद्या भाबड्याला कदाचित दोन विचारांतील फरक वाटेल, कोणाला गांधीहत्येच्या शिलेदारांचे असलेले मोदींच्या पूर्वसुरींशी संबंध आठवतील किंवा कदाचित अर्धनग्न गांधींच्या जागी स्वतःच्या नावाचं कोरीव काम करून अंगरखा पांघरणारे मोदी कसे दिसतील असा प्रश्न येईल नाहीतर 'ईश्वर अल्ला तेरो नाम'आणि '(समर्थाच्या) गाडी खालचे श्वान' यांना एकसमान कसं पाहता येईल, असाही प्रश्न भाबडेपणाने पडेल...!
पण भारतातल्या उजव्या विचारात क्वचित असलेला अभ्यासूपणाचा सद्गुण असला म्हणजे या सगळ्या घटनेकडे पाहायला एक अद्भुत ऐतिहासिक चष्मा मिळतो. फाळणीच्या वेळी मुस्लिम लीग सोबत सत्ता भोगणारे सावरकरी महासभेचे होते, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याचं टाळणारे आजच्या स्वयंघोषित देशाभिमान्यांचे संघी पूर्वज होते आणि पाकिस्तानात राहून सातत्याने तिथल्या धर्माध राजवटीचा प्रतिकार करणारे फैजसारखे।साम्यवादीच आहेत, हा इतिहास काहीतरी करून खोडायला त्यांना ही संधी मोलाची वाटते. एखाद्याचं विराट प्रतिमापूजन त्यांना देवापुढे नम्र होऊ पाहणाऱ्या 'भक्ता'एवढं सोज्ज्वळ वाटतं...!
गम्मत अशी की आपला अभ्यास हे मोदींचे बुद्धिजीवी भाट मोठ्या सोयीने वापरतात... गेल्या साठ वर्षात नर्मदेतल्या अहिंसक गांधीवाद्यांपासून ते नक्षलवाद्यांच्या हिंसक रोमँटिसीजमपर्यंत काँग्रेसला मन, माफक धन आणि गरज पडल्यास तन देऊन कडवा विरोध करणारे हे डावे, पुरोगामी, समाजवादी, साम्यवादीच होते हे सोयीस्करपणे बाजूला पडतं आणि या सगळ्या लोकांना, याच चळवळींची आठवण काढून वरून काँग्रेसच्या दरबारातले 'नाचणारे' असं सार्वत्रिक ब्रँडिंग केलं जातं...!
गांधींच्या नेतृत्वाची 'तपासणी ','विश्लेषण' वगैरे असंख्य डाव्या लेखकांनी कठोरपणे, टीकात्मकही केलेलं आहे, याचं भान यांना नाही म्हणावं का ज्ञान? बहुदा 'ज्ञान'च नसावं, कारण 'प्रातःस्मरणीय' करून जाहीर पूजन मांडायचं आणि शाखेशाखेवर मात्र 'टकल्या'च्या उद्धाराची 'केस' उभी करायची यातच तर आपली पाच दशकं गेल्येत ना...!
आज ज्या बहुमताच्या जीवावर आरबीआय सारख्या यंत्रणेचेही धिंडवडे काढण्याचं शौर्य आपल्यात आलेलं आहे, त्या बहुमताला आपण गेली साडेपाच दशकं पारखे आहोत, याची मळमळ सत्ता मिळूनही अजून शमलेली नाही. राजकारणच काय पण चित्रपट, क्रिकेट, काव्य, साहित्य, विनोद या सर्वच प्रकारात, या देशातली जनता ढोंगी हिंदुत्त्वाच्या लुच्च्या बुरख्यापासून कायमच दूर पळत आलेली आहे, याचा न्यूनगंड हे टाळू शकत।नाहीत. या देशातल्या सामान्य हिंदूंनी, हिंदू असल्याचे।पोकळ आणि नौटंकीबाज दिंडीम पिटणाऱयांना सातत्याने नाकारलं आहे, हे नुसतं ऐतिहासिक वास्तव नाही तर संभाव्य भविष्य आहे, याची विलक्षण भीती यांना आहे. म्हणून संधी मिळेल तिथे या देशातल्या बुद्धिवाद्यांना शिव्या द्यायच्या त्यांची उणिदुनि काढायची आणि असल्या वैचारिक खाजवण्यातून आपली अर्धवट प्रतिभेची क्षुधा कराकरा शांत करायची, हा आसुरी प्रयोग या लोकांनी नेहमीच केलेला आहे, पण चारख्याचं निमित्त घेऊन पुन्हा तीच खाज बाहेर येईल, हे जरासं आश्चर्यकारकच आहे...
इतिहासाची सोयीस्कर मोडतोड, कानात गरळ ओकण्याची 'कुजबूजी' परंपरा आणि दामटून खोटारडेपणा करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे आजपर्यंत फारसं यशस्वी नव्हतं. सोशल मीडियाने या विकृतीला उदंड इंधन दिलं. सहाजिकच सोशल मीडियामुले लोक 'शहाणे' झालेले आहेत हा अद्भुत जावईशोध यांना लागत आहे. पण गोळ्या पेराल तर गोळ्याच उगवतील, असं हातात बंदूक घेतलेला एक गांधीवादी।म्हणत असे, याच न्यायाने सोशल मीडियाही कधीतरी आपल्याच डोक्यावर हात ठेवणार आहे, ही मूलभूत जाणीव अजून कशी होत नाही, हा मात्र एक प्रश्नच आहे. स्वतःच्या प्रतिमेवर बेहद्द खुश असलेल्या एखाद्या आत्मकेंद्री नेत्याला जर बापूंच्या सूताचा धागा मिळत असेल तर ते।आनंददायकच आहे पण त्यासाठी आत्मनिर्भत्सनेचं एक अख्ख पुस्तक लिहिण्याचं चाळीस इंच छातीचं धैर्य लागतं, सगळं त्यागून एका धोतरावर जगायची फकिरी लागते आणि झगमगाटी जल्लोष टाळून 'शेवटच्या' माणसासोबत स्वर्ग शोधण्याचं देशप्रेम लागतं....!!
आणि हेही जमत नसेल तर बापडे बापू सरकारी भिंती आणि पुस्तकात तरी राहू द्या, काँग्रेसने सोडले तसे, तिथेही आरश्यासमोर आरती ओवाळण्याचा अट्टाहास कशाला?
©अजित
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1373927072652408&id=100001053842223
No comments:
Post a Comment