Blog Archive

Wednesday, 11 January 2017

शास्त्रीजी-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम..-राज कुलकर्णी

भुवनेश्वर इथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे ६८ वे अधिवेशन भरले होते. संजीवय्या यांच्याकडून के. कामराज यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली आणि ११ जानेवारी १९६४ रोजी ,कार्यकारिणीच्या सदस्यांची नावे जाहीर केली. त्यात शास्त्रीजींचे देखील नाव होते. नेहरू म्हणाले ,शास्त्रीजींना मला पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचे आहे. मुळात शास्त्रीजींचे मंत्री मंडळातून बाहेर जाणे  नेहरूंना मान्य नव्हते,परंतु शास्त्रीजींच्या वारंवार विनंतीमुळे नेहरूंनी त्यांचा राजीनामा मंजूर केला होता.आता पुन्हा नेहरू शास्त्रीजींना मंत्रिमंडळात एखादी जवाबदारी देण्यास इच्छुक होते.

शास्त्रीजींनी नेहरूंना विचारले “ मुझे काम क्या करना होगा ? ”.
नेहरू म्हणाले “ तुम्हे मेरा सब काम करना होगा”. आणि लगेच शास्त्रीजीची  केंद्रीय मंत्रिमंडळात बिनखात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती केली गेली.

यानंतर ११ दिवसांनी २२ जानेवारीला राष्ट्रपती भवन मधून एक परिपत्रक काढण्यात आले, त्यानुसार पंतप्रधान नेहरूंनी असा आदेश पारीत  केला होता की, ‘परराष्ट्र मंत्रालय, अणुशक्ती विभाग व मंत्रिमंडळ सचिवालय यांच्याकडून पंतप्रधानाकडे येणारी कागदपत्रे बिनखात्याचे मंत्री पाहतील. आवश्यक तेथे ते पंतप्रधानांकडून विशिष्ट प्रकरणात आदेशही  देतील आणि त्यानुसार पंतप्रधान नेहरूंच्या साउथ ब्लॉक मधील दालनाजवळ शास्त्रीजींना कार्यालय दिले गेले.
याच वेळी काश्मीर मध्ये विचित्र प्रसंग घडला होता ,२६ डिसेंबर १९६३ ला श्रीनगर मधील हजरतबल दर्ग्यातील प्रेषित मोहम्मद यांचा पवित्र केस चोरीला गेल्याची बातमी पूर्ण काश्मीर मध्ये पसरली आणि धार्मिक भावनेतून जनमत  प्रक्षुब्ध झाले होते. अशा नाजूक प्रसंगी काश्मिरातील परिस्थिती अधिक स्फोटक व्हावी या साठी पाकिस्तान टपून बसलेला होता. पण सुदैवाने ४ जानेवारी १९६४ ला केस सापडल्याची बातमी आली मात्र या केसाच्या खरेपणाबद्दल कांही लोकांनी शंका उपस्थित केली आणि मौलवींना त्याचा ‘दीदार’ करावा अशी मागणी समोर आली. ही मागणी तिथल्या राज्य सरकारने फेटाळून लावली आणि श्रीनगर मध्ये दंगल सुरु झाली.  प्रक्षुब्ध जमावर केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. याचा परिणाम एकत्रित होवून भारत सरकार हेच टीकेचे लक्ष बनू लागले होते. अंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारविरोधातील चळवळ असे याचे वर्णन होवू लागली तशी बातमी देखील २७ जानेवारीच्या लंडनच्या ‘द टाइम्स’ च्या अंकात प्रकाशित झाली.

पंडित नेहरूंनी शास्त्रीजींना ही परिस्थिती हाताळण्यास सांगितली आणि त्याबाबत  पूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. श्रीनगर मध्ये त्यावेळी कडाक्याची थंडी होती. नेहरूंनी शास्त्रीजींना श्रीनगरला जाण्याचे सांगितले आणि म्हणाले ‘तिथे खूप थंडी असते, तुझ्याकडे कोट नसणार’ म्हणून नेहरूंनी स्वतःचा एक ओव्हरकोट शास्त्रीजींना घालण्यासाठी दिला आणि तो कोट घालून शास्त्रीजी लष्कराच्या विमानाने ३० जानेवारी १९६४ रोजी यशस्वी होण्यासाठीच श्रीनगरकडे निघाले .

पंडितजी नंतर देशाचे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री होणार हे त्या दिवशीच ठरले होते ! .
.
.
संदर्भ-
लाल बहाद्दूर शास्त्री-राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम
लेखक - श्री. सी. पी. श्रीवास्तव                                                 अनुवाद - अशोक जैन
पान क्र. ५५ ते ६९

No comments:

Post a Comment