पंडित जवाहरलाल नेहरू यांची नामवंत व्यंगचित्रकार के शंकर पिल्लई यांनी जवळपास १५०० व्यंगचित्रे काढली आणि ती सर्व त्यांच्या " शंकर्स विकली " या साप्ताहिकातून प्रसिद्ध करण्यात आली .
नेहरू एक दृष्टे जागतिक नेते म्हणून शंकर यांना नेहरू यांच्याबद्दल प्रचंड आदर होता, पण एक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी त्यांच्या साप्ताहिकात नेहरूंची, नेहरूंच्या धोरणांची यथेच्छ खिल्ली उडवली आणि नेहरूंनीही त्यास हसून दाद दिली. दिल्लीत १९४८ च्या मे महिन्यात " शंकर्स विकली " च्या प्रथम आवृत्तीच्या प्रकाशनास शुभेच्छा देताना नेहरू म्हणाले होते " ....a cartoonist is not just a maker of fun but one who sees the inner significance of an event and by few masterstrokes impresses it on others. That is a service to all of us for which we should be grateful. For we apt to grow pompous and self-centered ,and it is good to have the veil of our conceit torn occasionally"
आणि ते पुढे म्हणाले "Don't spare me Shankar "
मोठे कार्य करायचे असेल स्वतःबद्दल असणारा फाजील आत्मसन्मानाचा अहंकार असाच फाडावा लागतो, त्यासाठी व्यंगचित्र महत्वाचे असते , शंकर मला सोडू नकोस, असा संदेश नेहरूंनी शंकर यांना दिला होता.
शंकर यांनी नेहरू यांची काढलेली व्यंगचित्रे खूप मजेशीर आणि खूप खिल्ली उडवणारी आहेत . पण नेहरूंनी त्यावर कधीही अगदी नाराजी देखील व्यक्त केली नाही. उलट त्यांच्या व्यंगचित्राला हसून दाद दिली . या संग्रहात ३१ मार्च १९५७ रोजी नेहरूंना चक्क साडी घालून मंत्रिपदाचे सफरचंद हातात घेवून उभारल्याचे एक व्यंगचित्र आहे , १९ मे १९५७ रोजीच्या व्यंगचित्रात नेहरू यांना पातळ साडी घालून शकुंतलेच्या रुपात जयप्रकाश नारायण यांना प्रेमपत्र लिहितानाचे व्यंगचित्र आहे . साडी घातलेली स्त्रीवेशातील नेहरूंची अनेक चित्रे असून एक तर लहान मुलांना दुध पाजून झोपाविणाऱ्या बाळंतीण बाईच्या वेशातील एक व्यंगचित्र सुद्धा यात आहे. सर्वात उल्लेखनीय म्हणजे १२ जुलै १९५३ च्या व्यंगचित्र तर फारच गमतीशीर आहे. सयुंक्त राष्ट्र संघाने भारताच्या काश्मीर मधील परिस्थितीबाबत काही मागण्या मान्य करण्यास नकार दिला , मागण्या मान्य होणार नाहीत अशी चिन्हे दिसत असताना सुद्धा नेहरूंचे प्रयत्न चालू होते. त्यावर टीका करणारे शंकर यांचे व्यंगचित्र चपखल आहे . युनो चा दरवाजा कुलूप लावून पूर्णतः बंद आहे ,आणि नेहरू दारात उभे राहून ,दरवाजा उघडण्याची विनंती करताहेत आणि महत्वाचे म्हणजे नेहरू पूर्ण नग्न अवस्थेत विनवणी करताना दाखवले आहेत. शंकर यांनी असे संपूर्ण नग्न चित्र काढले असताना सुद्धा नेहरूंनी या सर्व व्यंगचित्रांचा अगदी मिश्किल पणे आनंद घेतला.
नेहरूंच्या कृतीचे आणि विचाराचे मोठेपण अशा बाबीतून देखील तेवढेच प्रभावी पणे समोर येते. आजकालच्या राजकारण्यांना,त्यांच्या भावनाशील अनुयायांना आणि एकूणच समाजातील सर्वच घटकांना, नेहरूंनी राजकीय जीवनात जपलेली ही विनोद जाणून घेण्याची शालीनता मार्गदर्शक ठरेल अशीच आहे.
© राज कुलकर्णी .
संदर्भ :-
'डोन्ट स्पेयर मी शंकर'
प्रकाशक- चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट ,नवी दिल्ली . १९८३.
No comments:
Post a Comment