Blog Archive

Saturday, 27 August 2016

व्हाटस्अॅप वरील कॉन्टॅक्ट व माहिती फेसबुकवर share करण्यासंबंधीचा मेसेज पाहिला का?सावध रहा आणि खालील steps घ्या

सध्या  व्हाटस्अॅप एक मेसेज येत आहे.
तो तुम्ही न वाचता ओके केलात तर तुम्हाला अडचण येऊ शकते.
त्यामुळे हा मेसेज वाचूनच पुढे जा. किंवा तुम्ही या मेसेजला ओके केले असेल तर घाबरु नका.
तुम्ही खालील माहिती वाचा आणि त्याप्रमाणे करा.
युजर्स डेटा प्रायव्हसीबाबत एक धक्कादायक पाऊल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने उचलले आहे.
आता युझर्सची माहिती व्हॉट्सअॅपने फेसबूकसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे व्हॉट्सअॅप आता आपला मोबाईल नंबरदेखील फेसबूकसोबत शेअर करणार असल्यामुळे तुमची खासगी माहिती लिक होऊ शकते. फेसबूकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सअॅप युझर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे तु्म्ही सावधान राहा आणि खालील सूचनांचे पालन करा आणि राहा बिनधास्त.

तुम्हाला गेल्या काही दिवसांत Whatsapp कडून Terms &Conditions मान्य करण्याविषयी विचारले गेले असेल.

A) तर तुम्ही  sharing the data with facebook ला असलेली टिक काढून Agree वर क्लिक करा
B) जर तुम्ही असे न करता AGREE चे बटन दाबले असेल तर लक्षात ठेवा तुम्ही Whatsapp ला तुमचा फोन नंबर facebook वर जोडण्यास आणि माहिती पुरविण्यास परवानगी दिली आहे हे टाळण्यासाठी साठी
1⃣ताबडतोब Whatsapp च्या Settings मध्ये जा.
2⃣Accounts च्या बटनावर क्लीक करा
3⃣share my account info वरील ✅बरोबरची खूण काढून टाका.अन्यथा तुमच्या सगळ्या personal गोष्टी facebook ला add होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे.

तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.

चांगले विचार समूह

गोविंदावरील तथाकथित हिंदू लोकांच्या कंगावेखोर पोस्टला दिलेले हे उत्तर:* - उत्तम जोगदंड.

*गोविंदावरील तथाकथित हिंदू लोकांच्या कंगावेखोर  पोस्टला दिलेले हे उत्तर:* - उत्तम जोगदंड.

हिंदू एकत्र आहेच फक्त तुमच्यासारखे काही थोडेसे बिनडोक लोक स्वतःच्या नवीन उपद्रवी प्रथा निर्माण करून बहुसंख्य लोकांना त्रास देत आहेत.  हिंदू 1947 च्या आधीपासूनच धार्मिक दृष्ट्‍या स्वतंत्र आहे. आधीही कुठल्या सणावारांवर बंदी किंवा याचिका नव्हती.  आता ज्या काही याचिका आहेत त्या सणावारांवर नसून त्यात सणांच्या नावाने धुडगूस घालणार्‍या, मानवाला (खरे तर सर्वच सजीवांना) व पर्यावरणाला घातक असणार्‍या नवीनच निर्माण केलेल्या कुप्रथांवर आहेत.

*1 गणेश उत्सवात किती लोकांना कानाचे विकार झाले:*

एक तर मुळात सार्वजनिक गणेशउत्सव साजरा करावा असा उल्लेख कुठल्याही धर्मग्रंथात नाही, त्यामुळे त्यास धार्मिक मान्यता नाही. तो टिळकांनी सुरू केलेला इंग्रजांविरुद्ध उपक्रम आहे. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यावर तो उद्देश संपलेला आहे. टिळकांनी डीजे लावावा असे कुठेही म्हटलेले नाही, त्यामुळे डीजे हा प्रकारच अत्याधुनिक असल्याने तो परंपरेचा भाग होऊ शकत नाही. म्हणून असे करणे हे अधर्माचे कृत्य आहे.  दुसरे असे की उत्सव मंडळाच्या दरार्‍याने कुणी तक्रार द्यायला पुढे येत नाही.  परंतु आवाजाची डेसिबल लेवल व त्यामुळे होणारे दूरगामी परिणाम हे शस्त्राने सिद्ध झालेले आहेत.  

*2. नवरात्र मध्ये राञ राञ नाचणारे आम्ही राञ होण्याहोण्या आधीच घरी*

नवरात्र हा देवीच्या आराधनेचा काळ आहे. या दिवसात सूर्यास्ताला पुजा सुरू करून देवीची आरती गाणी गाऊन रीतसर गरबा व रास खेळले जात व रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास हा पूजेचा कार्यक्रम थांबवला जायी, अशी मूळ प्रथा आहे. सिनेमाच्या अश्लील गाण्यावर रात्रभर धुडगूस घालावा असे धर्मात किंवा ग्रंथात कुठेही लिहलेले नाही. उलट, परंपरेप्रमाणे रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास हा पूजेचा कार्यक्रम थांबवला गेला पाहिजे. तसे न करणे हे अधर्मी कृत्य ठरेल.

*3. दहिहंडी उत्सव, गोविंदा मरत असलेल्या पर्श्वभूमी वरती बंद करण्याचा निर्णय...* पुढे अन्य मृत्युंची टक्केवारी दिलेली आहे:

एक तर दहीहंडी उत्सव हा बालकांचा उत्सव आहे. कारण बाळगोविंद माखण चोरतांना दोन किंवा तीन थर लावून शिंक्याला लटकावलेल्या (साधारणतः 5 ते 6 फूट उंचावर) माठाला हात घालायचा. हा सण मोठ्या टोणग्यान्ंनि कित्येक थर लाऊन व अनेकांचा जीव धोक्यात घालून का साजरा करावा? असे धर्मात किंवा ग्रंथात कुठे लिहलेले दिसत नाही.  दुसरे, यात टक्केवारी काढून अमुक एवढी माणसे मेली किंवा जखमी झाली तरी चालेल असे अमानवी व असंवेदनशील विधान कुठल्या आधारावर करता येईल. यास काय धार्मिक आधार आहे. 

*1.रोड अपघातात मध्ये मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढते तर तुम्ही रस्त्यावर चालणारी वाहने बंद करणार का. ..?*

एक तर दहीहंडीवर बंदी घातली नाहीये, फक्त सुरक्षेसाठी काही नियम आखून दिले आहेत. दुसरे, रोड अपघातात मरण पावणारे लोक त्यांना आवश्यक असा प्रवास करतांना तांत्रिक किंवा मानवी चुकांमुळे होणार्‍या अपघातात मरतात.  प्रवास करणे हे आधुनिक दहीहंडी सारखे बिनडोक कर्मकांड नव्हे. प्रवास करणे हे बेकायदेशीर नाही. तसेच प्रवासात सुरक्षेचे नियम पाळले जातात. तसे दहीहंडीच्या वेळेस ही पाळायला काय प्रॉब्लेम आहे?

*2 . रेल्वे अपघातात रोज एक तरी व्यक्ती मरते म्हणून रेल्वे बंद करणार का...?*

रेल्वे हे प्रवासासाठी आवश्यक साधन आहे. त्यात बरेच वेळा जे लोक मरतात ते सुरक्षेचे नियम तोडल्यामुळे (उदा. रुळ ओलांडल्यामुळे) मरतात. म्हणूनच तर गोविंदा मरु नयेत यासाठी थरांचे व उंचीचे सुरक्षेचे नियम आहेत ना! रेलेवेचे नियम पाळणारे लोक मरत नाहीत. तसेच गोविंदाचे नियम पाळल्याने गोविंदा सुद्धा वाचतील ना. ते वाचले तर काही प्रॉब्लेम आहे काय?

*3.धुम्रपान, मद्यपान केल्याने कित्येक लोक मेले कित्येक संसार उद्ध्वस्त झाले,तरी सुद्धा यावरती बंदी आली का....?*
एक तर एका पवित्र धार्मिक सणाची तुलना धूम्रपान व मद्यपानाशी करायला लाज वाटली पाहिजे. दुसरे, दारू व सिगरेट (यावर वैधानिक इशारा असतो) पिण्याचे काही नियम आहेत, ते पाळले नाहीत तर शिक्षा होते. कित्येक राज्यात दारूबंदी आहे हे माहिती नाही का? सुरक्षेसाठी, म्हणूनच दहीहंडीला काही नियम लावलेत. त्यांचा आदर करून सण साजरा करायला कोणी अडवले आहे?

*दारू बार व पब वरील प्रश्नांना उत्तर:*

दारूचे बार हे बंदिस्त जागेत असतात. ते डीजे लावून किंवा रास्ता अडवून लोकांना त्रास देत नाहीत व नियमांनुसार त्यांना बार चालवावे लागतात.

डिस्को पब बंदिस्त जागेत असतात. ते डीजे लावून किंवा रस्ता अडवून लोकांना त्रास देत नाहीत व नियमांनुसार त्यांना पब चालवावे लागतात.

*पब व बारला देतात तशी परवानगी गोविंदा, गणपती व नवरात्रोत्सव यासाठी पहाटेपर्यंत  हवीय:*

जरूर द्यावी, गोविंदा, गणपती व नवरात्रोत्सव अगदी रात्ररात्रभर 200 डेसिबल आवाजाचा डीजे लाऊन, अश्लील नाच करून, गणणे लाऊन, जेवढा अधार्मिक पद्धतीने एंजॉय करता येईल तेवढा करा पण, तो पब व बार प्रमाणे बंदिस्त जागेत, अन्य सजीवांना आवाजाचा त्रास होणार नाही, रस्ते अडवले जाणार नाहीत अशा पद्धतीने करा अगदी 24X7एक्स365 करा. भारत आमचाही देश आहे. तुमच्या संस्कृतिच्या नावावर चालणार्‍या विकृतीने आम्हाला त्रास देऊ नका.

मॅड फॉर पीस - डॉ. प्रदीप आवटे

कोपर्डि,ढाका , नाईस घडतच राहतं
आणि अशा वेळी जिल हिक्स भेटते,
निराशेच्या अंधारात एक पणती लावून जाते

आजच्या रसिक पुरवणीतील *अडीच अक्षरांची गोष्ट* मधील नवा लेख

-------------------------------------------
मॅड फॉर पीस
- डॉ. प्रदीप आवटे.
 
              “ शांती – प्रेम ही भाववाचक नामं नाहीत, वास्तवात ती क्रियापदं आहेत, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे,” ती सांगत असते. कारण या भाववाचक संज्ञा जगण्यात उतरण्याकरता आपल्याला सातत्यानं कृतीशील रहावं लागतं. पण हे उमजण्याकरता ती ज्या दिव्यातून गेली त्या दिव्यातून जावं लागतं. केवळ बोधीवृक्षाखाली बसल्यानं ज्ञानप्राप्ती झाली असती तर इथला प्रत्येकजण बुध्द नसता का झाला ? मनाच्या तळ्यात प्रसन्न कमळदलासारखं उमलणारं ज्ञान फुकाफुकी आणि सुखासुखी आपल्या वस्तीवर येत नाही, ते आपली किंमत वसूल करतं. किती जणांची ही किंमत अदा करण्याची तयारी असते ?
    खरं तर ७ जुलै २००५ पूर्वी तिला तरी कुठं ठावं होतं, आपल्या आयुष्यात काय आणि कसं घडणार आहे? 
ती मूळची ऍडीलेड – ऑस्ट्रेलियाची पण १९९२ पासून ती लंडनमध्ये राहत होती. ती एकवीस वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि पुढच्याच वर्षी तिच्यावर आभाळभर माया करणारी तिची ममाही गेली. आईचा उबदार हात सुटलेल्या जिल हिक्सनं मग लंडन गाठलं. इथं ती डिझाईन क्युरेटर आणि प्रकाशक म्हणून काम करु लागली.
त्या दिवशी म्हणजे ७ जुलै २००५ रोजी तिला जॉबवर जायला उशीर झाला. रात्री तिची आणि तिचा प्रियकर ज्यो केरची काहीतरी कुरबुर झाली. तिला रात्रभर नीट झोपच आली नाही. सकाळी उठायला उशीर झाला, नाही तर ती सकाळी साडेसातला ऑफिसमध्ये असायची. पण त्या दिवशी ती उशीरा स्टेशनला पोहचली. नॉर्थ लाईनवर गाडया नीट येत नव्हत्या म्हणून तिनं पिकाडेली लाईन पकडली. त्यातही ती पास घरी विसरल्यानं तिला कधी नव्हे ते सिंगल तिकिट घ्यावं लागलं त्यामुळं तिला ८.५० ची टयूब ट्रेन मिळाली. तिला हिच ट्रेन मिळायची होती, हे ही जणू ठरलेलं होतं. ती डब्यात शिरली. तिच्या शेजारी चाळीशीचा एक माणूस उभा होता आणि त्याच्या पलिकडे अवघ्या १९ वर्षांचा जेमन लिंडसे उभा होता. त्याच्या डोक्यावर बेसबॉलची कॅप होती आणि त्यानं ट्रॅक सूट घातला होता. रसेल स्क्वेअर स्टेशनच्या अलिकडे तिच्या डब्यात अचानक मोठा धमाका झाला. जेमन लिंडसे आत्मघातकी बॉम्बर होता. त्यानं त्यांच्या डब्यात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. रेल्वेच्या बोगद्यात एकच हाहाकार माजला. जिलला आठवतं, तिच्या भोवती काळाकुट्ट अंधार होता. लिंडसेसह सव्वीस माणसं जाग्यावर खलास झाली होती. जेमन आणि त्याच्या तीन मित्रांनी एका मुस्लिम अतिरेकी संघटनेच्या प्रभावाखाली सेंट्र्ल लंडनमध्ये असे चार बॉम्बस्फोट घडवून आणले होते. रेल्वेच्या टनेलमध्ये रक्तमांसाचा चिखल झाला होता. जिवंत असणारे लोक त्या अंधारात ‘ मी इकडं आहे,’ म्हणून ओरडून सांगत होते. जिल त्या अंधा-या बोगद्यात एका कोप-यात पडली होती. तिचे दोन्ही पाय तुटून दूर उडाले होते. प्रचंड वेगानं रक्तस्त्राव होत होता. ‘ जिल.. मी जिल..!’, ती ओरडून आपण तिथं असल्याचं सांगत होती. प्रचंड रक्तस्रावामुळं तिला ग्लानी आली आणि तिच्या कानावर एका स्त्रीचा आवाज आला, “ जिल, चल माझ्यासोबत. आता अशी जगून काय करणार आहेस? शांतपणे चल माझ्यासोबत,” किती हवाहवासा होता तो मृत्यूचा आवाज. तो तिला बोलवत होता आणि त्या पाठोपाठ एक पुरुषी आवाज आला. त्या आवाजात जरब होती, “ नाही जिल, तुला जगायचंय.” रक्त वाहत होतं, वेदना जाणवतच नव्हत्या. मदतकार्यासाठी धावपळ करणा-या स्वयंसेवकाचे, पोलिसांचे, वैद्यकीय पथकातील लोकांचे आवाज येत होते पण कुणीच तिच्याकडं येत नव्हतं. अर्ध्या तासानंतर ट्रेसी नावाच्या नर्सनं तिला पाह्यलं. तिथं पडलेल्या फाटक्या कापडांचं तिनं कसंतरी स्ट्रेचर बनवलं आणि तिला ऍम्बुलन्समध्ये नेलं. जिल एवढी प्रचंड जखमी झाली होती की ती स्त्री आहे का पुरुष, हे सुध्दा वैद्यकीय पथकाच्या लक्षात यायला तयार नव्हतं. तिच्या हातावर लेबल लागलं, ‘ वन अननोन ह्युमन, इस्टीमेटेड फिमेल’. जिलच्या शरीरात जिवंतपणाच्या कोणत्याच खुणा नव्हत्या. मॉनिटर काहीच दाखवत नव्हता पण इमर्जन्सी टीमनं शेवटची साडेतीन मिनिटं आणखी प्रयत्न करायचं ठरवलं आणि तीन मिनिटानंतर मॉनिटर तिच्या जिवंतपणाच्या काही खुणा दाखवू लागल्या. ‘आणखी तीस सेकंद उशीर झाला असता तर,’ जिल असं म्हणते आणि आपल्या शरीरभर एक थंड लहर पसरत जाते.
जिल सांगत असते, ‘मदत पथकातील लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवले. अशा अतिरेकी हल्ल्यांमध्ये रेस्क्यू टीमला नामोहरम करण्यासाठी बॉम्ब पेरल्याच्या घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत. पण या रेस्क्यू टीमने कशाचीच तमा बाळगली नाही. त्यांच्या करिता माझा धर्म, माझ्या कातडीचा रंग, माझं स्त्री पुरुष असणं काही काहीच महत्वाचं नव्हतं. त्यांच्या करिता मी एक मौल्यवान मानवी जीव होते आणि म्हणून मला वाचविणे, त्यांना महत्वाचे वाटत होते- वन अननोन ह्युमन – त्यांच्या करिता माझी ओळख होती ती एवढीच.माझ्या आईनंतर असं निरपेक्ष , बिनशर्त प्रेम मी पहिल्यांदाच अनुभवत होते. नर्स असणा-या ट्रेसीनं माझ्या गळयाभोवती हात घालून मला उचलले तेव्हा मला मिठीत घेणा-या उबदार ममाची मला आठवण झाली.’
सेंट थॉमस रुग्णालयात ती भरती झाली तेव्हा तिच्या शरीरातील ७५ टक्के रक्त वाहून गेले होते. गुडघ्याखाली दोन्ही पाय तिने गमावले होते. तिची फुप्फुसं कमकुवत झाली होती. पण जिलच्या जगण्याचा दुसरा अध्याय सुरु झाला होता. ती विचार करत होती. अशा प्रचंड शक्तीच्या बॉम्बस्फोटातून ती बचावली होती. तिला तिचं जगणं पुन्हा नव्यानं तपासून घ्यावं वाटत होतं.
‘ त्या १९ वर्षाच्या नुकत्याच मिसरुड फुटलेल्या पोराच्या डोक्यात काय चाललं होतं? त्यानं बॉम्बस्फोट घडवून स्वतःसह २६ जणांचा जीव घेतला. किती सहजतेनं त्यानं मला शत्रू मानलं होतं ! तो कधी बोललाही नव्हता माझ्याशी…! तो बोलला असता तर किती बरं झालं असतं.’ जिलला राग आला नव्हता का? खरं तर खूप राग आला होता. आपले दोन्ही पाय गमावल्याचं दुःख जीवघेणं होतं. तिला तिच्या पायाच्या नखांना पेंट करायला किती आवडायचं ! तिनं हॉस्पिटलमध्ये तिचे तुटलेले पाय शेवटचेच डोळा भरुन पाहिले होते. डोक्यात राग तर प्रचंड होता पण त्याचवेळी एक नवीन ज्ञान, एक नवी समज तिच्या मनात वस्तीला आली होती. सारं काही आपल्या हातात आहे. घटना काहीही घडली तरी तिला प्रतिक्रिया काय द्यायची, कसं रिस्पॉन्ड करायचं, हे आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच रेल्वे बोगद्यात जखमी अवस्थेत पडली असताना तिनं स्वतःला बजावलं, “ जे आज घडलं आहे ते शेवटचं आहे. मी हे पुन्हा पुन्हा घडू देणार नाही. दॅटस ऑल.”
राग ही प्रचंड उर्जा आहे. तिला विधायक वळण लावणे, आवश्यक आहे. या रागाचं रुपांतर कर्करोगासारखं शरीरभर पसरणा-या, आयुष्याचं मातेरं करणा-या द्वेषात होता कामा नये. तिच्या लक्षात आलं, माणसामाणसांमध्ये भिंती बांधणा-या संघटनांसाठी प्रतिविष शोधावं लागेल, ऍण्टीडोट शोधावा लागेल. तिनं पुलाच्या बांधकामाची रुपरेखा आखली. दोन्ही तीरावरली माणसं ज्या पूलावरुन एकमेकांकडे ये जा करु शकतील असा पूल तिला बांधायचा होता. निरपेक्ष प्रेमाचं गाणं तिला पोटातून गायचं होतं. जेमन लिंडसेच्या अंतकरणातही तिला हे शहाणपण पेरायचं होतं.
तिला जेमनचा राग नव्हता कारण तिला स्वतःवर हसता येत होतं. तिच्या प्रसन्न हसण्यात कसलंही दुःख विरघळण्याची ताकद होती. हॉस्पिटलमध्ये असताना तिला भेटायला ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान जॉन हॉवर्ड आले तेव्हा ती त्यांना सहज हसत म्हणाली, “ कशी बार्बी डॉल दिसते आहे ना मी ! या बार्बीला पाय लावायचे आहेत आता.” ती हसत हसत बोलली खरे पण हॉवर्डना आपले अश्रू रोखता आले नाहीत.
अपेक्षेपेक्षा खूपच लवकर ती रुग्णालयातून बाहेर पडली. तिच्या जगण्याची दिशाच बदलली होती. आपल्याला तोडणा-या बाबींपेक्षा आपल्याला जोडणा-या असंख्य गोष्टी आहेत, हे तिला प्रत्येक जेमनला समजावून सांगायचे होते. शांती आणि प्रेम ही नव्यानं गवसलेली क्रियापदे तिला जगण्यात चालवून दाखवायची होती. जिल हिक्सनं ‘ मॅड फॉर पीस’ या संस्थेची स्थापना केली. ‘मेक अ डिफरन्स’( एम. ए. डी.) हा तिच्या मॅडनेसचा अर्थ आहे. लंडनमध्ये आत्मघातकी बॉम्बहल्ले घडवणारी भडकावू पोरं लीडस भागातील होती. जिल त्या पोरांच्या वस्तीत गेली. अतिरेकी कृत्य करणा-या पोरांच्या कुटुंबियांना, त्या वस्तीतील सर्व लोकांना ती भेटली. ती सारी कुटुंब मानसिक दृष्टया उध्वस्त झाली होती. आपल्या पोरांनी केलेल्या कृत्यांनी त्यांची झोप उडाली होती. जिलचं त्यांच्या वस्तीत जाणं, पाऊस नसलेल्या वस्तीत पावसाचं पोहचणं होतं. वेगवेगळया धर्मपंथाच्या लोकांनी परस्परांशी बोललं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. या मनोमिलनासाठी नवेनवे प्लॅटफॉर्म तयार केले पाहिजेत, हे जिलच्या लक्षात आलं. तिनं लिडस ते लंडन अशी पदयात्रा सुरु केली. जवळपास ४०० किमीचे अंतर होते. रस्त्यात वीस बावीस छोटी मोठी शहरं होती. जिल आपल्या कृत्रिम पायावर चालत होती. अनेक लोक या पश्चिमेच्या पंढरीच्या वारीत सहभागी झाले. लोक एकत्र आले, परस्परांशी बोलू लागले. या पदयात्रेत एक बिगर मुस्लिम महिला आपल्या घरासमोर राहणा-या मुस्लिम गृहस्थाला मागील दहा वर्षात कधी ‘ हॅलो’ देखील म्हणाली नव्हती, ती त्यांच्याशी बोलली. तिनं आपलं मन मोकळं केलं, “ तुम्ही लोक स्त्रियांना बरोबरीनं वागवत नाही. स्त्रियांशी बोलणे तुम्हांला कमीपणाचे वाटते म्हणून मी तुमच्याशी कधी बोलले नाही. तुम्हांला टाळत आले.” त्या गृहस्थांनी तिचे गैरसमज दूर केले. आणि हळूहळू दोघे गप्पात एवढे रंगले की दहाव्या मिनिटाला ते आपल्या भागातील कच-याच्या समस्येवर बोलू लागले. तुमचा धर्म पंथ वर्ण कोणताही असो तुमचे रोजमर्राच्या जगण्याचे प्रश्न थोडयाफार फरकाने तेच असतात.
  मनातले पूर्वग्रह दूर सारुन जवळ येणारी माणसं, हे जगातील सर्वात सुंदर दृश्य असतं. जिल रोज हे अनुभवते आहे. बॉम्बस्फोटानंतर सहा सात वर्षांनी, वयाची चाळीशी उलटल्यावर तिनं अमेली या गोड मुलीला जन्म दिला आहे.
“कृत्रिम पायावर चालताना काय फरक जाणवतो ?”,असं विचारल्यावर जिल म्हणते,“ या कृत्रिम पायांमुळे माझी उंची वाढली आहे.”
जिलची ही वाढलेली उंची सेंटीमीटरमध्ये मोजता येत नाही, एवढे समजले तरी पुरे…!

- ✍ *�डॉ. प्रदीप आवटे

मानवी मनाचे दोन ऊर्जास्त्रोत -वानप्रस्थ' गणेश देवी

मानवी मनाचे दोन ऊर्जास्त्रोत आहेत. एक कल्पनाशक्ती, दुसरी स्मृतीशक्ती. कल्पनाशक्तीने आपल्या भोवतीच्या वास्तवाची संगती लावता येते नि स्थलविस्तार अनुभवता येतो. स्मृतीमुळे कालक्रमाची संगती लावता येते व कालविस्तार अनुभवता येतो. आपली मौखिक परंपरा स्मृतींवर आधारित आहे; मात्र आपल्या सौंदर्यशास्त्रात कल्पनाशक्तीला अधिक महत्व दिले गेले आहे. जोपर्यंत मौखिक कला व मौखिक परंपरा आपण नीट जुळवून घेत नाही तोपर्यंत आपले सौंदर्यशास्त्रही अपुरे राहणार. आपण अदिवासी संस्कृतीपासून सुरुवात करुन समग्र भारतीय सौंदर्याशास्त्रापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
( 'वानप्रस्थ' या गणेश देवी यांच्या पुस्तकातून श्रीरंजन आवटे कडून साभार)

ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ डोपिंगच होतं असं नाही, आयुष्यभर सोबत देईल,असं प्रेमही बहरतं - डॉ. प्रदीप आवटे.

ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ डोपिंगच होतं असं नाही, आयुष्यभर सोबत देईल,असं प्रेमही बहरतं -
हेच सांगणारा *अडीच अक्षरांची गोष्ट* या सदरातील नवा लेख
----------------------------------------
*द परफेक्ट टेन*
                                                                                            - डॉ. प्रदीप आवटे.
---------------------------------------
२८ मार्च १९७६.
मॅडीसन स्क्वेअर गार्डन.
जिम्नॅशियम मधील अमेरिकन कपचा बक्षीस वितरण समारंभ सुरु आहे. मॉन्ट्रीयल ऑलिंम्पिक अवघ्या तीन महिन्यावर आली असताना होणारी ही स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकची रंगीत तालीम आहे. रुमानियाच्या चौदा वर्षाच्या चिमुरडीनं या वेळचा महिलांसाठीचा अमेरिकन कप जिंकला आहे तर सतरा वर्षाचा अमेरिकन टीन एजर पोरगा पुरुषांसाठीचा विजेता ठरला आहे. या दोघांना अमेरिकन कप प्रदान करताना फोटो घेण्यासाठी पत्रकारांची एकच गडबड उडाली आहे. आणि फोटो काढता काढता एक फोटोग्राफर टीन एजर बार्ट कॉनरला म्हणतो, “गिव्ह अ किस ऑन हर चिक...! इट विल बी फंटास्टिक फोटोग्राफ.” त्याला उद्या छापायचा फोटो अधिक इंटरेस्टिंग बनवायचा आहे. पण सतरा वर्षाचा बार्ट आपल्याच मनातली इच्छा कुणीतरी बोलून दाखविल्यासारखा पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानत हलकेच झुकतो आणि शेजारी उभ्या असलेल्या रुमानियाच्या नादिया कोमानसीच्या गालांवर आपले ओठ टेकवतो. आणि एकाच वेळी अनेक कॅमे-यांचे आवाज येतात.. क्लिक क्लिक क्लिक...! सुंदरतेच्या सुमनावरले दवबिंदू टिपणारा हा क्षण कॅमे-यात कैद होतो. नादिया आपल्याच विश्वात इतकी रममाण की हा प्रसंग ती विसरुनही जाते. पण या प्रसंगात तिच्या त्याच्या जगण्याची दिशा दडलेली असते. बार्टच्या ओठांनी गायलेलं गीत रुंजी घालत तिला पुन्हा भेटणार असतं,आयुष्य किती वळणं घेत वाहत जातं, किती अनोळखी वाटांवर ओढून नेतं पण काहीही झालं तरी अशा अनोळखी वाटांवर ओळखीचा वाटावा असा एक सूर असतो, दरवळणारा फुलांचा मोहर असतो. ज्याला उमजायचा त्याला तो उमजतो ..!
             मॉन्ट्रीयल ऑलिम्पिक जणू काही नादिया कोमानसीसाठीच आयोजित केलं होतं. या स्पर्धेमधे तिनं सा-या जगाला वेड लावलं. जिम्नॅशियममध्ये कोणत्याही प्रकारात तोपर्यंत कुणी दहा पैकी दहा पॉईन्टस मिळवले नव्हते. या पोरीनं अनइव्हन बिम्स या पहिल्याच प्रकारात इतकी नेत्रदिपक कामगिरी केली की अंपायर्स नुसते पाहत राह्यले. ती लवचिकता,प्रत्येक हालचालीतील ती सहजता, ठासून भरलेला आत्मविश्वास, श्वास रोखून घ्यावे अशा कसरती आणि हे सारं करताना हे तर माझ्यासाठी नेहमीचंच आहे, यात विशेष ते काय, चेह-यावर अशी निरागसता. दहा पॉईन्टस..!!! द परफेक्ट टेन..!! असे परफेक्ट टेन मिळवणारी नादिया जगातली पहिली जिम्नॅसिस्ट ठरली. हाच प्रकार तिनं जिम्नॅशियमच्या सात प्रकारात केला. तिला वैयक्तिक पाच सुवर्णपदकं मिळाली. इनमिन चौदा वर्षाची पोर जिम्नॅशियम सारख्या कठीण खेळाची सम्राज्ञी झाली. तिचं नाव जगभर झालं, एखाद्या नायिकेसारखं तिचं  रुमानियात स्वागत झालं.सरकारनं तिच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकिट काढलं.‘हिरो ऑफ सोशॅलिस्ट लेबर’हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान नादियाला बहाल करण्यात आला. अमेरिकन कपच्या वेळी तिच्या गालावर आपले ओठ टेकवणारा बार्ट मात्र या ऑलिम्पिकमध्ये शेहचाळीसव्या नंबरवर फेकला गेला. त्याची आठवण कुणाला यायचं कारणही नव्हतं.
   मॉन्ट्रियलमधील घवघवीत यशानं या शाळकरी पोरीचं आयुष्यच बदलून गेलं.एका ऑटो मेकॅनिकची पोर असणारी सामन्य घरातली नादिया आता घराघरात पोहचली. खरं म्हणजे,ही पोरगी लहानपणापासून भलतीच उपद्व्यापी.उडया मारुन,धिंगाणा घालून घरातलं फर्निचरची मोडतोड करत राह्यची.तिच्या या प्रचंड इनर्जीचं करायचं काय म्हणून आईनं तिला जिममध्ये पाठवायला सुरु केलं.किंडरगार्टनमध्ये असताना अवघ्या साडेसहा वर्षाच्या या पोरीला बेला कॅरोली या जिम्नॅशियम कोचनं पाह्यलं आणि तो मॅडच झाला.त्यानं आणि त्याच्या बायकोनं मार्टानं ही पोरगी ताब्यातच घेतली आणि रोज सहा तास सराव करुन घेत तिला नादिया कोमानसी बनवलं .. विशुध्द सोनं. पण यश,प्रसिध्दी एकटे येत नाहीत.त्यांच्या सोबत इतर गोष्टीही येत राहतात. नादिया स्पर्धांमागून स्पर्धा जिंकत होती पण ती राहत असलेल्या रुमानियातील परिस्थिती गंभीर होती. देशात कम्युनिस्ट राजवट होती. निकोलाय चाऊसेस्कू नावाचा क्रूर हुकूमशहा सत्तेवर होता. देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. विचारांची कट्टरता घेऊन सत्तेवरील आलेली माणसं अखेर अवघ्या देशाच्या अनावस्थेला कारणीभूत होतात.रुमानियातही तेच होत होतं. विरोधक बंदुकीच्या गोळीनं शांत केले जात होते. अशा देशात नादिया आता सामान्य नागरिक उरली नव्हती. ती सेलिब्रेटी होती.त्यात तिच्या १९८१ च्या अमेरिका दौ-यात तिचा कोच असलेल्या बेलाने आपल्या बायकोसह रुमानियाला राम राम केला. आणि सरकारची नजर नादियाकडे वळली. नादियाचा कोच पळून जाण्यात काही षडयंत्र तर नाही ना,सरकारला संशय आला.नादियाच्या दैनंदिन व्यवहारावर पाळत ठेवली जाऊ लागली. साधी कॉफी प्यायला जायचं तरी सेक्युरिटी गार्ड तिच्या मागोमाग येऊ लागले. तिला परदेशात जाण्याची परवानगी पुन्हा पुन्हा नाकारली जाऊ लागली. अखेरीस १९८४ साली ती जिम्नॅशियममधून निवृत्त झाली पण तिच्यामागचा ससेमिरा काही सुटेना. त्यात रुमानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दारुडया मुलाची निकूची तिच्यावर नजर पडली. तो तिला हवे तेव्हा बोलवू लागला. त्यानं तिला आपली बायकोचं बनवलं आहे, अशी कुजबूज सर्वत्र होऊ लागली. बळजबरीनं नादियाकडून नको त्या गोष्टी करुन घेतल्या जात होत्या. नाही म्हणायची सोय नव्हती, नाही म्हटलं की मृत्यूशिवाय दुसरी शिक्षा नव्हती पण जगणं मरणापेक्षा भयंकर झालं होतं. अशात तिला कॉनस्टॅण्टीन पानाईट भेटला. त्यानं तिला रुमानियातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची हमी दिली. तिनं ही जोखीम घ्यायचं ठरवलं. बर्फाळ नदी, सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असणारी सीमा रेषा ओलांडत हंगेरी मार्गे ती १९८९ च्या नोव्हेंबरात ती अमेरिकेत पोहचली. सोबत पानाईट होताच. रुमानियातून सुटकेसाठी त्याने इतर सहा जणांकडून पाच हजार डॉलर्स घेतले होते. पण नादिया त्याच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. तो तिला सोडायला तयार नव्हता. तो तिला हॉटेलच्या रुममध्ये कैद करे. तिला फोन करायची, फोन घ्यायची परवानगी नव्हती. त्याची सतत पाळत असे. अमेरिकेतील माध्यमं नादियाला मुलाखतीसाठी बोलवत. त्याचे मिळणारे लाखो डॉलर्सचे मानधन पानाइट हडप करे. नादिया एका तुरुंगातून सुटून दुस-या तुरुंगात अडकली होती. “मला धोका द्यायचा प्रयत्न केला तर मी तुला सुटकेसमध्ये पॅक करुन परत रुमानियाला पाठवेन,” अशी धमकी तो देत असे. या चार पोरांच्या बापासोबत नादियाचे प्रेम संबंध आहेत, अशा बातम्या छापून येत होत्या.
   इकडे बार्ट कॉनरला नादिया अमेरिकेत आली आहे हे एका टीव्ही शोच्या जाहिरातीमुळे समजले. १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने देखील दोन सुवर्णपदकं पटकावली होती आणि आता जिम्नॅशियम कोचिंगची एक संस्था तो ओक्लोहोमा येथे चालवत होता. १३ जानेवारी १९९० .. त्या दिवशी संध्याकाळी नादियाचा कार्यक्रम एका चॅनेलवर होणार आहे, असे समजताच त्याने त्या चॅनेलच्या अधिका-यांना फोन करुन या कार्यक्रमात मी नादियाचे स्वागत करु इच्छितो, असे सांगितले. तो लगोलग लॉस एंजिलसला त्या चॅनेलच्या स्टुडिओत पोहचला आणि गुलाबांच्या फुलांनी त्यानं तिचं स्वागत केलं. नादिया काही तरी अडचणीत आहे,हे बार्टच्या चाणाक्ष नजरेने लगेच ओळखले पण ती काहीच बोलत नव्हती.पानाईट अवतीभवती असताना तिला काहीच बोलणे शक्य नव्हते. बार्टने  “काही अडचण आली तर मला फोन कर,” असे म्हणत त्यानं तिला आपला फोन नंबर दिला. दडपणाखाली असलेली नादिया काहीच बोलत नव्हती. तिचा एक रुमानियन मित्र अलेक्स स्टेफूने अखेरीस तिची पानाईटच्या तावडीतून सुटका केली आणि नादिया स्टेफूच्या कुटुंबासोबत मॉन्ट्रियलच्या कामगार वस्तीत राहू लागली. पानाईटच्या तावडीतून सुटल्यामुळे तिनं नुकताच कुठे मोकळा श्वास घेतला होता तेवढयात अलेक्स एका कार अपघातात मृत्यूमुखी पडला आणि तिच्यावर आभाळच कोसळले.
  .. आणि तिला बार्टची आठवण झाली. तिनं त्याला फोन केला. बार्टला काही तरी भयंकर घडले आहे,याची जाणीव झाली कारण इतका प्रचंड घाबरलेला आवाज त्यानं प्रथमच ऐकला होता. अलेक्स स्टेफू हा तिचा मोठा आधार होता आणि आता तोच हरवला होता,नादियावर झालेल्या भावनिक आघाताची बार्टला कल्पना आली. तो धावतच मॉन्ट्रीयलला गेला आणि त्यानं तिला ओक्लोहोमाला आणलं. नादिया खूप पोळली होती.जगण्यानं तिच्याकडून तिच्या ‘नादिया’असण्याची भली थोरली किंमत वसूल केली होती. जखमा ताज्या होत्या,हळव्या होत्या. जिम्नॅशियम हाच या जखमांवरला उतारा होता. बार्टनं त्याच्या जिम्नॅशियम संदर्भातील वेगवेगळया ऍक्टीव्हिटीज मध्ये तिला सहभागी व्हायला प्रवृत्त केलं.नव्या मुलांचे प्रशिक्षण,टीव्ही वरील जिम्नॅशियम विषयक कार्यक्रम, नृत्य आणि जिम्नॅशियम  फ्युजन कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमात नादिया त्याच्या सोबत काम करु लागली. बार्ट तिला सर्वतोपरी मदत करत होता पण त्यानं तिच्या कडून कधीच कसली अपेक्षा केली नाही. त्याच्या या निरपेक्ष मदतीकडं नादिया ओल्या डोळयांनी पाहत राह्यची.
एका हळव्या क्षणी बार्टनं तिला प्रपोज केलं. गहिवरलेलं आभाळ आपल्या ओठांवर झुकल्यावर मातीनं काय म्हणायचं असतं? नादिया वेडयासारखी त्याच्याकडं पाहत राह्यली. या वेडया प्रियकराला घेऊन ती रुमानियाला गेली.डिसेंबर १९८९ मध्ये रुमानियात क्रांती झाली होती आणि पूर्वीचं जुलमी सरकार उलथून टाकण्यात आलं होतं. आता तिचा देश भयमुक्त होता.
२७ एप्रिल १९९६ ला बुखारेस्ट मध्ये रुमानियाच्या राष्ट्रपतीच्या राजमहालात  बार्ट आणि नादिया विवाह सोहळा संपन्न झाला. सा-या चॅनेलवरुन या सोहळयाचे लाईव टेलिकास्ट झाले. ज्या राजमहालाने तिला छळले त्याच राजमहालात तिचा विवाह सोहळा व्हावा,हा काव्यात्म न्याय होता. मॅडीसन स्क्वेअरच्या त्या निरागस चुंबनानंतर दोन दशकांनी बार्ट आणि नादिया एकमेकांचे झाले होते.
नादियाच्या डोळयांत अश्रू होते, “आज माझ्या आयुष्यात उजेड आला आहे. मी घाबरलेली होते,मी अडचणीत आहे,हे मला जगाला सांगायचे धैर्य नव्हते. पण मला सतत वाटायचं की कोणीतरी येईल आणि माझी या त्रासातून सुटका करेल. आणि तो बार्ट होता,माय डिअर बार्ट..! बार्ट प्रत्येकाला हवाहवासा वाटावा असा माणूस आहे.तुम्ही त्याच्या डोळयांत पहा.आणि तुमच्या लक्षात येईल,त्या डोळयांत अपरंपार विश्वास भरला आहे.”
  खरं तर किती अफवा,किती प्रवाद होते नादिया बद्दल पण बार्टसाठी त्यानं पाह्यलेली नादिया खरी होती, “ तिनं काही चुकाही केल्या, नाही असं नाही पण ती आता जगाशी बोलते आहे,तिनं जे सोसलं ते सांगते आहे.पण जगाला ती जशी वाटते तशी ती नाही,ती अत्यंत आनंदी आणि उत्साही मुलगी आहे. आणि खरं सांगू, तिच्या भूतकाळाशी मला काही देणं नाही.मी माझ्यासमोर जी नादिया आहे तिच्यावर प्रेम करतो. खूप प्रेमळ आहे ती.”
.. बार्ट आणि नादियाच्या प्रेमवेलीवर एक देखणं फूल उमललंय.नव्या नव्या उपक्रमात दोघंही गुंग आहेत. दोघांनी मिळून रुमानियातील गरीबांसाठी नादिया कोमानसी क्लिनिक्स सुरु केली आहेत. जगण्याच्या बीम आणि बारवर संतुलन राखत परफेक्ट टेनचा आकडा गाठणं,प्रत्येकवेळी सोपं असतं असं नाही पण जेव्हा अंतरंगात फुलणारं निरपेक्ष प्रेम सोबत असतं तेव्हा अशक्य असं काहीच नसतं. 
✍ � *डॉ.प्रदीप आवटे*