आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या )
(^m^) (^j^) (मनोगते)
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण " गटारी " आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे. भारतीय संस्कृती गटारीचे महत्त्व किती जाणते याचे हे उत्तम उदाहरण! गटार अशुद्ध पदार्थ वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईनाशी झाली. गटारे स्वच्छ होण्यापेक्षा ती अशुद्ध होण्याचा वेग अधिक वाढला आणि गटारांमुळे रोगराई वाढू लागली. आषाढ महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. ती होऊ नये म्हणून आताच्या विज्ञान युगात गटारे स्वच्छ ठेवली, त्यात घाण तुंबू नये अशी व्यवस्था केली, तर रोगराई आपोआप वाहून जाईल, प्रसन्न श्रावण महिन्याचे आगमन होईल. ‘गटारी'ची आठवण त्यासाठी ठेवायची !
आषाढ अमावस्या ही "तमसो मा ज्योतिर्गमय" असा संदेश घेऊन येणारी मंगलमय मानली जाते. हा दिवस दिव्यांची अमावस्या साजरा केला जातो. "दिव्यांची अवस", जरी खरं असलं तरी आज किती जणांना हे माहित आहे ? किंवा किती जण ही अमावस्या या पध्दतीने साजरी करतात ? या इतक्या सुंदर दिनाला "गटारी" हे नाव कुणी दिले कुणास ठाऊक. सध्या गटारी म्हणजे दारू, मटण, चिकन, मासे यांच्यावर आडवा हात मारणे!!! यामुळेच ही अमावस्या बदनाम झाली आहे.
मद्यसेवन करून गटारात लोळणे हिच खरी गटारी! काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसाचे कार्यक्रम आखले जातात. श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येच्या दिवशी भरपेट मांसाहार करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही.
खरेतर श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा ही पोषकपणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो. आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची... गटारात लोळण घेऊन की निसर्गाचा आस्वाद घेऊन ?
आषाढात पावसाचा धुमाकूळ झाल्यावर मातीच्या घरामधून असा चिखल होतो की घराचे गटार झाल्यागत वाटते. त्यातून बाहेर पडून प्रकाशाची कास धरण्याचा हा सण आहे. कालचीच गोष्ट आमच्या कामवाल्या बाईने गटारीसाठी म्हणून रविवारी रजा घेतली होती. तिला सोमवारी विचारले ,काय म्हणते सुट्टी! ती उत्तरली "कसली गटारी ? नाला भरून वाहिला तशी घराचे गटार झाले. दिवसभर तेच उपसत होतो. " थोडक्यात ज्यांच्याकडे दिव्यासाठी तेल नाही अशाना मजबुरीने गटारात लोळावे लागते . ज्यांच्याकडे प्रकाश आहे त्यांनी तो इतरांना द्यावा म्हणून दीप अमावस्या आहे. मात्र प्रकाशाकडे पाठ फिरवून नशेचे बोट धरून गटार जवळ करणारांना कर्मदरिद्रीच म्हणावे लागेल. केवळ हीच नव्हे तर अशा अनेक प्रथा वस्तुस्थितीचा विपर्यास करून जन्माला आलेल्या दिसतात. त्यात अनेकदा आपल्याज्या इच्छा राजरोस पूर्ण करता येत नाहीत ; त्या पूर्ण करण्यासाठी प्रथेकडे बोट दाखवले जाते. ते वाईट आहे.
ReplyDelete