Blog Archive

Saturday, 27 August 2016

मॅड फॉर पीस - डॉ. प्रदीप आवटे

कोपर्डि,ढाका , नाईस घडतच राहतं
आणि अशा वेळी जिल हिक्स भेटते,
निराशेच्या अंधारात एक पणती लावून जाते

आजच्या रसिक पुरवणीतील *अडीच अक्षरांची गोष्ट* मधील नवा लेख

-------------------------------------------
मॅड फॉर पीस
- डॉ. प्रदीप आवटे.
 
              “ शांती – प्रेम ही भाववाचक नामं नाहीत, वास्तवात ती क्रियापदं आहेत, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे,” ती सांगत असते. कारण या भाववाचक संज्ञा जगण्यात उतरण्याकरता आपल्याला सातत्यानं कृतीशील रहावं लागतं. पण हे उमजण्याकरता ती ज्या दिव्यातून गेली त्या दिव्यातून जावं लागतं. केवळ बोधीवृक्षाखाली बसल्यानं ज्ञानप्राप्ती झाली असती तर इथला प्रत्येकजण बुध्द नसता का झाला ? मनाच्या तळ्यात प्रसन्न कमळदलासारखं उमलणारं ज्ञान फुकाफुकी आणि सुखासुखी आपल्या वस्तीवर येत नाही, ते आपली किंमत वसूल करतं. किती जणांची ही किंमत अदा करण्याची तयारी असते ?
    खरं तर ७ जुलै २००५ पूर्वी तिला तरी कुठं ठावं होतं, आपल्या आयुष्यात काय आणि कसं घडणार आहे? 
ती मूळची ऍडीलेड – ऑस्ट्रेलियाची पण १९९२ पासून ती लंडनमध्ये राहत होती. ती एकवीस वर्षांची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि पुढच्याच वर्षी तिच्यावर आभाळभर माया करणारी तिची ममाही गेली. आईचा उबदार हात सुटलेल्या जिल हिक्सनं मग लंडन गाठलं. इथं ती डिझाईन क्युरेटर आणि प्रकाशक म्हणून काम करु लागली.
त्या दिवशी म्हणजे ७ जुलै २००५ रोजी तिला जॉबवर जायला उशीर झाला. रात्री तिची आणि तिचा प्रियकर ज्यो केरची काहीतरी कुरबुर झाली. तिला रात्रभर नीट झोपच आली नाही. सकाळी उठायला उशीर झाला, नाही तर ती सकाळी साडेसातला ऑफिसमध्ये असायची. पण त्या दिवशी ती उशीरा स्टेशनला पोहचली. नॉर्थ लाईनवर गाडया नीट येत नव्हत्या म्हणून तिनं पिकाडेली लाईन पकडली. त्यातही ती पास घरी विसरल्यानं तिला कधी नव्हे ते सिंगल तिकिट घ्यावं लागलं त्यामुळं तिला ८.५० ची टयूब ट्रेन मिळाली. तिला हिच ट्रेन मिळायची होती, हे ही जणू ठरलेलं होतं. ती डब्यात शिरली. तिच्या शेजारी चाळीशीचा एक माणूस उभा होता आणि त्याच्या पलिकडे अवघ्या १९ वर्षांचा जेमन लिंडसे उभा होता. त्याच्या डोक्यावर बेसबॉलची कॅप होती आणि त्यानं ट्रॅक सूट घातला होता. रसेल स्क्वेअर स्टेशनच्या अलिकडे तिच्या डब्यात अचानक मोठा धमाका झाला. जेमन लिंडसे आत्मघातकी बॉम्बर होता. त्यानं त्यांच्या डब्यात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. रेल्वेच्या बोगद्यात एकच हाहाकार माजला. जिलला आठवतं, तिच्या भोवती काळाकुट्ट अंधार होता. लिंडसेसह सव्वीस माणसं जाग्यावर खलास झाली होती. जेमन आणि त्याच्या तीन मित्रांनी एका मुस्लिम अतिरेकी संघटनेच्या प्रभावाखाली सेंट्र्ल लंडनमध्ये असे चार बॉम्बस्फोट घडवून आणले होते. रेल्वेच्या टनेलमध्ये रक्तमांसाचा चिखल झाला होता. जिवंत असणारे लोक त्या अंधारात ‘ मी इकडं आहे,’ म्हणून ओरडून सांगत होते. जिल त्या अंधा-या बोगद्यात एका कोप-यात पडली होती. तिचे दोन्ही पाय तुटून दूर उडाले होते. प्रचंड वेगानं रक्तस्त्राव होत होता. ‘ जिल.. मी जिल..!’, ती ओरडून आपण तिथं असल्याचं सांगत होती. प्रचंड रक्तस्रावामुळं तिला ग्लानी आली आणि तिच्या कानावर एका स्त्रीचा आवाज आला, “ जिल, चल माझ्यासोबत. आता अशी जगून काय करणार आहेस? शांतपणे चल माझ्यासोबत,” किती हवाहवासा होता तो मृत्यूचा आवाज. तो तिला बोलवत होता आणि त्या पाठोपाठ एक पुरुषी आवाज आला. त्या आवाजात जरब होती, “ नाही जिल, तुला जगायचंय.” रक्त वाहत होतं, वेदना जाणवतच नव्हत्या. मदतकार्यासाठी धावपळ करणा-या स्वयंसेवकाचे, पोलिसांचे, वैद्यकीय पथकातील लोकांचे आवाज येत होते पण कुणीच तिच्याकडं येत नव्हतं. अर्ध्या तासानंतर ट्रेसी नावाच्या नर्सनं तिला पाह्यलं. तिथं पडलेल्या फाटक्या कापडांचं तिनं कसंतरी स्ट्रेचर बनवलं आणि तिला ऍम्बुलन्समध्ये नेलं. जिल एवढी प्रचंड जखमी झाली होती की ती स्त्री आहे का पुरुष, हे सुध्दा वैद्यकीय पथकाच्या लक्षात यायला तयार नव्हतं. तिच्या हातावर लेबल लागलं, ‘ वन अननोन ह्युमन, इस्टीमेटेड फिमेल’. जिलच्या शरीरात जिवंतपणाच्या कोणत्याच खुणा नव्हत्या. मॉनिटर काहीच दाखवत नव्हता पण इमर्जन्सी टीमनं शेवटची साडेतीन मिनिटं आणखी प्रयत्न करायचं ठरवलं आणि तीन मिनिटानंतर मॉनिटर तिच्या जिवंतपणाच्या काही खुणा दाखवू लागल्या. ‘आणखी तीस सेकंद उशीर झाला असता तर,’ जिल असं म्हणते आणि आपल्या शरीरभर एक थंड लहर पसरत जाते.
जिल सांगत असते, ‘मदत पथकातील लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवले. अशा अतिरेकी हल्ल्यांमध्ये रेस्क्यू टीमला नामोहरम करण्यासाठी बॉम्ब पेरल्याच्या घटनाही अनेक वेळा घडल्या आहेत. पण या रेस्क्यू टीमने कशाचीच तमा बाळगली नाही. त्यांच्या करिता माझा धर्म, माझ्या कातडीचा रंग, माझं स्त्री पुरुष असणं काही काहीच महत्वाचं नव्हतं. त्यांच्या करिता मी एक मौल्यवान मानवी जीव होते आणि म्हणून मला वाचविणे, त्यांना महत्वाचे वाटत होते- वन अननोन ह्युमन – त्यांच्या करिता माझी ओळख होती ती एवढीच.माझ्या आईनंतर असं निरपेक्ष , बिनशर्त प्रेम मी पहिल्यांदाच अनुभवत होते. नर्स असणा-या ट्रेसीनं माझ्या गळयाभोवती हात घालून मला उचलले तेव्हा मला मिठीत घेणा-या उबदार ममाची मला आठवण झाली.’
सेंट थॉमस रुग्णालयात ती भरती झाली तेव्हा तिच्या शरीरातील ७५ टक्के रक्त वाहून गेले होते. गुडघ्याखाली दोन्ही पाय तिने गमावले होते. तिची फुप्फुसं कमकुवत झाली होती. पण जिलच्या जगण्याचा दुसरा अध्याय सुरु झाला होता. ती विचार करत होती. अशा प्रचंड शक्तीच्या बॉम्बस्फोटातून ती बचावली होती. तिला तिचं जगणं पुन्हा नव्यानं तपासून घ्यावं वाटत होतं.
‘ त्या १९ वर्षाच्या नुकत्याच मिसरुड फुटलेल्या पोराच्या डोक्यात काय चाललं होतं? त्यानं बॉम्बस्फोट घडवून स्वतःसह २६ जणांचा जीव घेतला. किती सहजतेनं त्यानं मला शत्रू मानलं होतं ! तो कधी बोललाही नव्हता माझ्याशी…! तो बोलला असता तर किती बरं झालं असतं.’ जिलला राग आला नव्हता का? खरं तर खूप राग आला होता. आपले दोन्ही पाय गमावल्याचं दुःख जीवघेणं होतं. तिला तिच्या पायाच्या नखांना पेंट करायला किती आवडायचं ! तिनं हॉस्पिटलमध्ये तिचे तुटलेले पाय शेवटचेच डोळा भरुन पाहिले होते. डोक्यात राग तर प्रचंड होता पण त्याचवेळी एक नवीन ज्ञान, एक नवी समज तिच्या मनात वस्तीला आली होती. सारं काही आपल्या हातात आहे. घटना काहीही घडली तरी तिला प्रतिक्रिया काय द्यायची, कसं रिस्पॉन्ड करायचं, हे आपल्या हातात आहे. आणि म्हणूनच रेल्वे बोगद्यात जखमी अवस्थेत पडली असताना तिनं स्वतःला बजावलं, “ जे आज घडलं आहे ते शेवटचं आहे. मी हे पुन्हा पुन्हा घडू देणार नाही. दॅटस ऑल.”
राग ही प्रचंड उर्जा आहे. तिला विधायक वळण लावणे, आवश्यक आहे. या रागाचं रुपांतर कर्करोगासारखं शरीरभर पसरणा-या, आयुष्याचं मातेरं करणा-या द्वेषात होता कामा नये. तिच्या लक्षात आलं, माणसामाणसांमध्ये भिंती बांधणा-या संघटनांसाठी प्रतिविष शोधावं लागेल, ऍण्टीडोट शोधावा लागेल. तिनं पुलाच्या बांधकामाची रुपरेखा आखली. दोन्ही तीरावरली माणसं ज्या पूलावरुन एकमेकांकडे ये जा करु शकतील असा पूल तिला बांधायचा होता. निरपेक्ष प्रेमाचं गाणं तिला पोटातून गायचं होतं. जेमन लिंडसेच्या अंतकरणातही तिला हे शहाणपण पेरायचं होतं.
तिला जेमनचा राग नव्हता कारण तिला स्वतःवर हसता येत होतं. तिच्या प्रसन्न हसण्यात कसलंही दुःख विरघळण्याची ताकद होती. हॉस्पिटलमध्ये असताना तिला भेटायला ब्रिटनचे तत्कालिन पंतप्रधान जॉन हॉवर्ड आले तेव्हा ती त्यांना सहज हसत म्हणाली, “ कशी बार्बी डॉल दिसते आहे ना मी ! या बार्बीला पाय लावायचे आहेत आता.” ती हसत हसत बोलली खरे पण हॉवर्डना आपले अश्रू रोखता आले नाहीत.
अपेक्षेपेक्षा खूपच लवकर ती रुग्णालयातून बाहेर पडली. तिच्या जगण्याची दिशाच बदलली होती. आपल्याला तोडणा-या बाबींपेक्षा आपल्याला जोडणा-या असंख्य गोष्टी आहेत, हे तिला प्रत्येक जेमनला समजावून सांगायचे होते. शांती आणि प्रेम ही नव्यानं गवसलेली क्रियापदे तिला जगण्यात चालवून दाखवायची होती. जिल हिक्सनं ‘ मॅड फॉर पीस’ या संस्थेची स्थापना केली. ‘मेक अ डिफरन्स’( एम. ए. डी.) हा तिच्या मॅडनेसचा अर्थ आहे. लंडनमध्ये आत्मघातकी बॉम्बहल्ले घडवणारी भडकावू पोरं लीडस भागातील होती. जिल त्या पोरांच्या वस्तीत गेली. अतिरेकी कृत्य करणा-या पोरांच्या कुटुंबियांना, त्या वस्तीतील सर्व लोकांना ती भेटली. ती सारी कुटुंब मानसिक दृष्टया उध्वस्त झाली होती. आपल्या पोरांनी केलेल्या कृत्यांनी त्यांची झोप उडाली होती. जिलचं त्यांच्या वस्तीत जाणं, पाऊस नसलेल्या वस्तीत पावसाचं पोहचणं होतं. वेगवेगळया धर्मपंथाच्या लोकांनी परस्परांशी बोललं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. या मनोमिलनासाठी नवेनवे प्लॅटफॉर्म तयार केले पाहिजेत, हे जिलच्या लक्षात आलं. तिनं लिडस ते लंडन अशी पदयात्रा सुरु केली. जवळपास ४०० किमीचे अंतर होते. रस्त्यात वीस बावीस छोटी मोठी शहरं होती. जिल आपल्या कृत्रिम पायावर चालत होती. अनेक लोक या पश्चिमेच्या पंढरीच्या वारीत सहभागी झाले. लोक एकत्र आले, परस्परांशी बोलू लागले. या पदयात्रेत एक बिगर मुस्लिम महिला आपल्या घरासमोर राहणा-या मुस्लिम गृहस्थाला मागील दहा वर्षात कधी ‘ हॅलो’ देखील म्हणाली नव्हती, ती त्यांच्याशी बोलली. तिनं आपलं मन मोकळं केलं, “ तुम्ही लोक स्त्रियांना बरोबरीनं वागवत नाही. स्त्रियांशी बोलणे तुम्हांला कमीपणाचे वाटते म्हणून मी तुमच्याशी कधी बोलले नाही. तुम्हांला टाळत आले.” त्या गृहस्थांनी तिचे गैरसमज दूर केले. आणि हळूहळू दोघे गप्पात एवढे रंगले की दहाव्या मिनिटाला ते आपल्या भागातील कच-याच्या समस्येवर बोलू लागले. तुमचा धर्म पंथ वर्ण कोणताही असो तुमचे रोजमर्राच्या जगण्याचे प्रश्न थोडयाफार फरकाने तेच असतात.
  मनातले पूर्वग्रह दूर सारुन जवळ येणारी माणसं, हे जगातील सर्वात सुंदर दृश्य असतं. जिल रोज हे अनुभवते आहे. बॉम्बस्फोटानंतर सहा सात वर्षांनी, वयाची चाळीशी उलटल्यावर तिनं अमेली या गोड मुलीला जन्म दिला आहे.
“कृत्रिम पायावर चालताना काय फरक जाणवतो ?”,असं विचारल्यावर जिल म्हणते,“ या कृत्रिम पायांमुळे माझी उंची वाढली आहे.”
जिलची ही वाढलेली उंची सेंटीमीटरमध्ये मोजता येत नाही, एवढे समजले तरी पुरे…!

- ✍ *�डॉ. प्रदीप आवटे

No comments:

Post a Comment