Blog Archive

Saturday, 27 August 2016

ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ डोपिंगच होतं असं नाही, आयुष्यभर सोबत देईल,असं प्रेमही बहरतं - डॉ. प्रदीप आवटे.

ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ डोपिंगच होतं असं नाही, आयुष्यभर सोबत देईल,असं प्रेमही बहरतं -
हेच सांगणारा *अडीच अक्षरांची गोष्ट* या सदरातील नवा लेख
----------------------------------------
*द परफेक्ट टेन*
                                                                                            - डॉ. प्रदीप आवटे.
---------------------------------------
२८ मार्च १९७६.
मॅडीसन स्क्वेअर गार्डन.
जिम्नॅशियम मधील अमेरिकन कपचा बक्षीस वितरण समारंभ सुरु आहे. मॉन्ट्रीयल ऑलिंम्पिक अवघ्या तीन महिन्यावर आली असताना होणारी ही स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकची रंगीत तालीम आहे. रुमानियाच्या चौदा वर्षाच्या चिमुरडीनं या वेळचा महिलांसाठीचा अमेरिकन कप जिंकला आहे तर सतरा वर्षाचा अमेरिकन टीन एजर पोरगा पुरुषांसाठीचा विजेता ठरला आहे. या दोघांना अमेरिकन कप प्रदान करताना फोटो घेण्यासाठी पत्रकारांची एकच गडबड उडाली आहे. आणि फोटो काढता काढता एक फोटोग्राफर टीन एजर बार्ट कॉनरला म्हणतो, “गिव्ह अ किस ऑन हर चिक...! इट विल बी फंटास्टिक फोटोग्राफ.” त्याला उद्या छापायचा फोटो अधिक इंटरेस्टिंग बनवायचा आहे. पण सतरा वर्षाचा बार्ट आपल्याच मनातली इच्छा कुणीतरी बोलून दाखविल्यासारखा पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानत हलकेच झुकतो आणि शेजारी उभ्या असलेल्या रुमानियाच्या नादिया कोमानसीच्या गालांवर आपले ओठ टेकवतो. आणि एकाच वेळी अनेक कॅमे-यांचे आवाज येतात.. क्लिक क्लिक क्लिक...! सुंदरतेच्या सुमनावरले दवबिंदू टिपणारा हा क्षण कॅमे-यात कैद होतो. नादिया आपल्याच विश्वात इतकी रममाण की हा प्रसंग ती विसरुनही जाते. पण या प्रसंगात तिच्या त्याच्या जगण्याची दिशा दडलेली असते. बार्टच्या ओठांनी गायलेलं गीत रुंजी घालत तिला पुन्हा भेटणार असतं,आयुष्य किती वळणं घेत वाहत जातं, किती अनोळखी वाटांवर ओढून नेतं पण काहीही झालं तरी अशा अनोळखी वाटांवर ओळखीचा वाटावा असा एक सूर असतो, दरवळणारा फुलांचा मोहर असतो. ज्याला उमजायचा त्याला तो उमजतो ..!
             मॉन्ट्रीयल ऑलिम्पिक जणू काही नादिया कोमानसीसाठीच आयोजित केलं होतं. या स्पर्धेमधे तिनं सा-या जगाला वेड लावलं. जिम्नॅशियममध्ये कोणत्याही प्रकारात तोपर्यंत कुणी दहा पैकी दहा पॉईन्टस मिळवले नव्हते. या पोरीनं अनइव्हन बिम्स या पहिल्याच प्रकारात इतकी नेत्रदिपक कामगिरी केली की अंपायर्स नुसते पाहत राह्यले. ती लवचिकता,प्रत्येक हालचालीतील ती सहजता, ठासून भरलेला आत्मविश्वास, श्वास रोखून घ्यावे अशा कसरती आणि हे सारं करताना हे तर माझ्यासाठी नेहमीचंच आहे, यात विशेष ते काय, चेह-यावर अशी निरागसता. दहा पॉईन्टस..!!! द परफेक्ट टेन..!! असे परफेक्ट टेन मिळवणारी नादिया जगातली पहिली जिम्नॅसिस्ट ठरली. हाच प्रकार तिनं जिम्नॅशियमच्या सात प्रकारात केला. तिला वैयक्तिक पाच सुवर्णपदकं मिळाली. इनमिन चौदा वर्षाची पोर जिम्नॅशियम सारख्या कठीण खेळाची सम्राज्ञी झाली. तिचं नाव जगभर झालं, एखाद्या नायिकेसारखं तिचं  रुमानियात स्वागत झालं.सरकारनं तिच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकिट काढलं.‘हिरो ऑफ सोशॅलिस्ट लेबर’हा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान नादियाला बहाल करण्यात आला. अमेरिकन कपच्या वेळी तिच्या गालावर आपले ओठ टेकवणारा बार्ट मात्र या ऑलिम्पिकमध्ये शेहचाळीसव्या नंबरवर फेकला गेला. त्याची आठवण कुणाला यायचं कारणही नव्हतं.
   मॉन्ट्रियलमधील घवघवीत यशानं या शाळकरी पोरीचं आयुष्यच बदलून गेलं.एका ऑटो मेकॅनिकची पोर असणारी सामन्य घरातली नादिया आता घराघरात पोहचली. खरं म्हणजे,ही पोरगी लहानपणापासून भलतीच उपद्व्यापी.उडया मारुन,धिंगाणा घालून घरातलं फर्निचरची मोडतोड करत राह्यची.तिच्या या प्रचंड इनर्जीचं करायचं काय म्हणून आईनं तिला जिममध्ये पाठवायला सुरु केलं.किंडरगार्टनमध्ये असताना अवघ्या साडेसहा वर्षाच्या या पोरीला बेला कॅरोली या जिम्नॅशियम कोचनं पाह्यलं आणि तो मॅडच झाला.त्यानं आणि त्याच्या बायकोनं मार्टानं ही पोरगी ताब्यातच घेतली आणि रोज सहा तास सराव करुन घेत तिला नादिया कोमानसी बनवलं .. विशुध्द सोनं. पण यश,प्रसिध्दी एकटे येत नाहीत.त्यांच्या सोबत इतर गोष्टीही येत राहतात. नादिया स्पर्धांमागून स्पर्धा जिंकत होती पण ती राहत असलेल्या रुमानियातील परिस्थिती गंभीर होती. देशात कम्युनिस्ट राजवट होती. निकोलाय चाऊसेस्कू नावाचा क्रूर हुकूमशहा सत्तेवर होता. देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. विचारांची कट्टरता घेऊन सत्तेवरील आलेली माणसं अखेर अवघ्या देशाच्या अनावस्थेला कारणीभूत होतात.रुमानियातही तेच होत होतं. विरोधक बंदुकीच्या गोळीनं शांत केले जात होते. अशा देशात नादिया आता सामान्य नागरिक उरली नव्हती. ती सेलिब्रेटी होती.त्यात तिच्या १९८१ च्या अमेरिका दौ-यात तिचा कोच असलेल्या बेलाने आपल्या बायकोसह रुमानियाला राम राम केला. आणि सरकारची नजर नादियाकडे वळली. नादियाचा कोच पळून जाण्यात काही षडयंत्र तर नाही ना,सरकारला संशय आला.नादियाच्या दैनंदिन व्यवहारावर पाळत ठेवली जाऊ लागली. साधी कॉफी प्यायला जायचं तरी सेक्युरिटी गार्ड तिच्या मागोमाग येऊ लागले. तिला परदेशात जाण्याची परवानगी पुन्हा पुन्हा नाकारली जाऊ लागली. अखेरीस १९८४ साली ती जिम्नॅशियममधून निवृत्त झाली पण तिच्यामागचा ससेमिरा काही सुटेना. त्यात रुमानियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दारुडया मुलाची निकूची तिच्यावर नजर पडली. तो तिला हवे तेव्हा बोलवू लागला. त्यानं तिला आपली बायकोचं बनवलं आहे, अशी कुजबूज सर्वत्र होऊ लागली. बळजबरीनं नादियाकडून नको त्या गोष्टी करुन घेतल्या जात होत्या. नाही म्हणायची सोय नव्हती, नाही म्हटलं की मृत्यूशिवाय दुसरी शिक्षा नव्हती पण जगणं मरणापेक्षा भयंकर झालं होतं. अशात तिला कॉनस्टॅण्टीन पानाईट भेटला. त्यानं तिला रुमानियातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याची हमी दिली. तिनं ही जोखीम घ्यायचं ठरवलं. बर्फाळ नदी, सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असणारी सीमा रेषा ओलांडत हंगेरी मार्गे ती १९८९ च्या नोव्हेंबरात ती अमेरिकेत पोहचली. सोबत पानाईट होताच. रुमानियातून सुटकेसाठी त्याने इतर सहा जणांकडून पाच हजार डॉलर्स घेतले होते. पण नादिया त्याच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. तो तिला सोडायला तयार नव्हता. तो तिला हॉटेलच्या रुममध्ये कैद करे. तिला फोन करायची, फोन घ्यायची परवानगी नव्हती. त्याची सतत पाळत असे. अमेरिकेतील माध्यमं नादियाला मुलाखतीसाठी बोलवत. त्याचे मिळणारे लाखो डॉलर्सचे मानधन पानाइट हडप करे. नादिया एका तुरुंगातून सुटून दुस-या तुरुंगात अडकली होती. “मला धोका द्यायचा प्रयत्न केला तर मी तुला सुटकेसमध्ये पॅक करुन परत रुमानियाला पाठवेन,” अशी धमकी तो देत असे. या चार पोरांच्या बापासोबत नादियाचे प्रेम संबंध आहेत, अशा बातम्या छापून येत होत्या.
   इकडे बार्ट कॉनरला नादिया अमेरिकेत आली आहे हे एका टीव्ही शोच्या जाहिरातीमुळे समजले. १९८४ च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने देखील दोन सुवर्णपदकं पटकावली होती आणि आता जिम्नॅशियम कोचिंगची एक संस्था तो ओक्लोहोमा येथे चालवत होता. १३ जानेवारी १९९० .. त्या दिवशी संध्याकाळी नादियाचा कार्यक्रम एका चॅनेलवर होणार आहे, असे समजताच त्याने त्या चॅनेलच्या अधिका-यांना फोन करुन या कार्यक्रमात मी नादियाचे स्वागत करु इच्छितो, असे सांगितले. तो लगोलग लॉस एंजिलसला त्या चॅनेलच्या स्टुडिओत पोहचला आणि गुलाबांच्या फुलांनी त्यानं तिचं स्वागत केलं. नादिया काही तरी अडचणीत आहे,हे बार्टच्या चाणाक्ष नजरेने लगेच ओळखले पण ती काहीच बोलत नव्हती.पानाईट अवतीभवती असताना तिला काहीच बोलणे शक्य नव्हते. बार्टने  “काही अडचण आली तर मला फोन कर,” असे म्हणत त्यानं तिला आपला फोन नंबर दिला. दडपणाखाली असलेली नादिया काहीच बोलत नव्हती. तिचा एक रुमानियन मित्र अलेक्स स्टेफूने अखेरीस तिची पानाईटच्या तावडीतून सुटका केली आणि नादिया स्टेफूच्या कुटुंबासोबत मॉन्ट्रियलच्या कामगार वस्तीत राहू लागली. पानाईटच्या तावडीतून सुटल्यामुळे तिनं नुकताच कुठे मोकळा श्वास घेतला होता तेवढयात अलेक्स एका कार अपघातात मृत्यूमुखी पडला आणि तिच्यावर आभाळच कोसळले.
  .. आणि तिला बार्टची आठवण झाली. तिनं त्याला फोन केला. बार्टला काही तरी भयंकर घडले आहे,याची जाणीव झाली कारण इतका प्रचंड घाबरलेला आवाज त्यानं प्रथमच ऐकला होता. अलेक्स स्टेफू हा तिचा मोठा आधार होता आणि आता तोच हरवला होता,नादियावर झालेल्या भावनिक आघाताची बार्टला कल्पना आली. तो धावतच मॉन्ट्रीयलला गेला आणि त्यानं तिला ओक्लोहोमाला आणलं. नादिया खूप पोळली होती.जगण्यानं तिच्याकडून तिच्या ‘नादिया’असण्याची भली थोरली किंमत वसूल केली होती. जखमा ताज्या होत्या,हळव्या होत्या. जिम्नॅशियम हाच या जखमांवरला उतारा होता. बार्टनं त्याच्या जिम्नॅशियम संदर्भातील वेगवेगळया ऍक्टीव्हिटीज मध्ये तिला सहभागी व्हायला प्रवृत्त केलं.नव्या मुलांचे प्रशिक्षण,टीव्ही वरील जिम्नॅशियम विषयक कार्यक्रम, नृत्य आणि जिम्नॅशियम  फ्युजन कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमात नादिया त्याच्या सोबत काम करु लागली. बार्ट तिला सर्वतोपरी मदत करत होता पण त्यानं तिच्या कडून कधीच कसली अपेक्षा केली नाही. त्याच्या या निरपेक्ष मदतीकडं नादिया ओल्या डोळयांनी पाहत राह्यची.
एका हळव्या क्षणी बार्टनं तिला प्रपोज केलं. गहिवरलेलं आभाळ आपल्या ओठांवर झुकल्यावर मातीनं काय म्हणायचं असतं? नादिया वेडयासारखी त्याच्याकडं पाहत राह्यली. या वेडया प्रियकराला घेऊन ती रुमानियाला गेली.डिसेंबर १९८९ मध्ये रुमानियात क्रांती झाली होती आणि पूर्वीचं जुलमी सरकार उलथून टाकण्यात आलं होतं. आता तिचा देश भयमुक्त होता.
२७ एप्रिल १९९६ ला बुखारेस्ट मध्ये रुमानियाच्या राष्ट्रपतीच्या राजमहालात  बार्ट आणि नादिया विवाह सोहळा संपन्न झाला. सा-या चॅनेलवरुन या सोहळयाचे लाईव टेलिकास्ट झाले. ज्या राजमहालाने तिला छळले त्याच राजमहालात तिचा विवाह सोहळा व्हावा,हा काव्यात्म न्याय होता. मॅडीसन स्क्वेअरच्या त्या निरागस चुंबनानंतर दोन दशकांनी बार्ट आणि नादिया एकमेकांचे झाले होते.
नादियाच्या डोळयांत अश्रू होते, “आज माझ्या आयुष्यात उजेड आला आहे. मी घाबरलेली होते,मी अडचणीत आहे,हे मला जगाला सांगायचे धैर्य नव्हते. पण मला सतत वाटायचं की कोणीतरी येईल आणि माझी या त्रासातून सुटका करेल. आणि तो बार्ट होता,माय डिअर बार्ट..! बार्ट प्रत्येकाला हवाहवासा वाटावा असा माणूस आहे.तुम्ही त्याच्या डोळयांत पहा.आणि तुमच्या लक्षात येईल,त्या डोळयांत अपरंपार विश्वास भरला आहे.”
  खरं तर किती अफवा,किती प्रवाद होते नादिया बद्दल पण बार्टसाठी त्यानं पाह्यलेली नादिया खरी होती, “ तिनं काही चुकाही केल्या, नाही असं नाही पण ती आता जगाशी बोलते आहे,तिनं जे सोसलं ते सांगते आहे.पण जगाला ती जशी वाटते तशी ती नाही,ती अत्यंत आनंदी आणि उत्साही मुलगी आहे. आणि खरं सांगू, तिच्या भूतकाळाशी मला काही देणं नाही.मी माझ्यासमोर जी नादिया आहे तिच्यावर प्रेम करतो. खूप प्रेमळ आहे ती.”
.. बार्ट आणि नादियाच्या प्रेमवेलीवर एक देखणं फूल उमललंय.नव्या नव्या उपक्रमात दोघंही गुंग आहेत. दोघांनी मिळून रुमानियातील गरीबांसाठी नादिया कोमानसी क्लिनिक्स सुरु केली आहेत. जगण्याच्या बीम आणि बारवर संतुलन राखत परफेक्ट टेनचा आकडा गाठणं,प्रत्येकवेळी सोपं असतं असं नाही पण जेव्हा अंतरंगात फुलणारं निरपेक्ष प्रेम सोबत असतं तेव्हा अशक्य असं काहीच नसतं. 
✍ � *डॉ.प्रदीप आवटे*

No comments:

Post a Comment