Blog Archive

Thursday, 25 May 2017

संस्कृती(मुख्यमंत्री अपघात विशेष)-राज कुलकर्णी

राजेश पायलट यांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळी वाजपेयी कलकत्याच्या दौ-यावर होते. त्यांनी तात्काळ तो दौरा रद्द केला आणि दौसाला पोचले! सचीन पायलटला धीर दिला. वाजपेयी पुर्णवेळ पायलट यांच्या घरी बसून होते!

वाजपेयींच्या गुढग्याचे ऑपरेशन होते, तर राजीव गांधी त्यांना स्वत:बरोबर मुद्दामहून युरोपात घेऊन गेले आणि उपचाराची पुर्ण व्यवस्था केली !
ही बाब वाजपेयींनी 'डिसीसिव्ह डेज' या पुस्तकात नमुद केली आहे.

कॉग्रेस नेते अजित जोगी यांचा अपघात झाला तेंव्हा स्वत: रमण सिंग यांनी संपुर्ण व्यवस्था कामास लावून स्वत: भेट घेतली आणि शासकीय स्तरावर मदत केली.

दंतेवाडात वी.सी.शुक्ल जखमी झाल्यावरही रमण सिंग यांनी खूप सहाय्य केले! अशी अजून खूप उदाहरणे आहेत!

आपली संस्कृती राजकीय विरोधाची आहे, पण व्यक्तिगत वा  वैयक्तिक द्वेषाची नाही आणि ती कधीच तशी नव्हती.

एखाद्याच्या हत्येला वध म्हणणारी आपली संस्कृती नाही की एखाद्याची हत्या झाल्यावर आनंद व्यक्त करणारी वा पेढे वाटणा-याचीही आपली संस्कृती नाही.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर फटाके वाजवून आनंद व्यक्त करणारे भारतीय असूच शकत नाहीत.

पण गेल्या चार वर्षात देशात असे नेतृत्व आणि अशी विचारधारा प्रचलित झाली, ज्यामुळे वैयक्तिक द्वेष प्रचंड वाढला.

अपघात आणि मृत्यू या सारख्या कठिण प्रसंगात राजकारण यायला नको पण पटेलांच्या अंत्यविधीला नेहरूंनी टांग मारली होती, असे धादांत खोटे बोलणारे नेते निर्माण झाले आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले, हा काळाचा महिमा आहे खरं!

पण आपण तसे होऊ नये, देश पुन्हा सौहार्दाच्या, परस्पर स्नेहाच्या आणि राजकारण विरहीत निखळ प्रेमाच्या वातावरणात जायचा असेल तर द्वेष त्यागायला हवाच!  राजकीय धोरणांना विरोध मात्र चालू राहील.

द्वेषाचा नाश प्रतिशोधाने नव्हेतर अवैराने म्हणजेच प्रेमाने होतो, हीच आपली भारतीय संस्कृती आहे.
--
Raj Kulkarni उस्मानाबाद

No comments:

Post a Comment