Blog Archive

Monday, 29 May 2017

कायम शेतकरी , शेतकरी आत्महत्येवर बोलताना ते आता बंद करून दुसरे प्रश्न हातात घ्याना.काय आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणाऱ्यांना "विचारवंत" म्हणून मान्यता आपल्याच देशात मिळू शकत नाही विदेशाची तर दुरचीच गोष्ट-एका आमदारांचे मत

एका आमदारा सोबत नागपूर ते अकोला त्याच्याच गाडीत प्रवासात होतो. आमदार शेतकरी म्हणविल्या जाणाऱ्या कुटुंबातला आणि बहुजन समाजाचा. प्रवासात तो म्हणाला," चंदूभाऊ तुम्ही जे कायम शेतकरी , शेतकरी आत्महत्येवर बोलताना ते आता बंद करून दुसरे प्रश्न हातात घ्याना.काय आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणाऱ्यांना "विचारवंत" म्हणून मान्यता आपल्याच देशात मिळू शकत नाही विदेशाची तर दुरचीच गोष्ट!" एकूणच काय तर आमदार महोदयांना मला "विचारवंत" म्हणून मान्यता मिळावी ही काळजी होती. मग मीही विचारले विचारवंत म्हणून मान्यता मिळवायची असेल तर मी कोणते प्रश्न हाताळले पाहिजे? माझ्या या प्रश्नाने आमदार महोदय उत्साहीतही झाले आणि मार्गदर्शना साठी उत्तेजीतही झाल्यासारखे वाटले. ते बोलू लागले," काय आहे ना चंदू भाऊ तुम्ही पर्यावरणाचा विषय घ्या. नाहीच काहीतर "ग्लोबल वार्मींग" चा विषय घ्या." आता त्याच्या विषयांची यादी लवकर थांबण्याची शक्यता मला दिसत नव्हती.तो बोलतच होता. " आझोन लेअर च भोक (माझा शब्द) मोठ होत आहे त्यामुळे पृथ्वीवर त्याचे होणारे दुष्परीणाम हाही विषय तुम्हाला जागतीक मान्यता मिळवून देवू शकतो." मारोतीच्या शेपटी प्रमाणे तो प्रश्न सुचवित राहिला मी एेकत राहिलो शेवटी कंटाळून त्याला मी म्हणालो ," शेतकऱ्यांनी अस काय तुमच घोड मारलय की तो प्रश्न सोडून बाकी इतर प्रश्नावर बोलाव अस तुम्ही मला सुचविता?"  त्यावर आमदाराचा चेहरा उग्र झाला .तो म्हणाला ,"अडाणी, अज्ञानी,आळशी शेतकऱ्यांचा तुम्ही कैवार घेता?" आणि नंतर तर भ... भा.... भो.... ह.... मा..... सा.. या अद्याक्षरांनी सुरु होणाऱ्या शिव्यांची लाखोली वहात शेतकऱ्यांविषयी तो बोलू लागला. मी त्याला थांबविणार इतक्यात त्याने ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करायला सांगीतला आणि जवळपास किंचाळत मला गाडीच्या बाहेर बोट दाखवतच म्हणाला , " तो पहा चंदुभाऊ शेतकरी व त्याची बायको, त्यांच्या अंगावरचे कपडे पहा , शेतकऱ्याचे धोतर फाटक दिसतय, त्याच्या बायकोच लुगड दांड लावलेल दिसत, त्यांच्या पायाकडे पहा दोघेही अनवाणी आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर बघा तो टि.व्हि. घेवुन जात आहे. त्याच्या एकूण अवतारा कडे जर पाहिल तर निश्चितच त्याच्या घरी खायची सोय नसेल आणि हा टि.व्हि. त्याने खात्रीने सांगतो उधारीतच घेतला असणार आणि चंदुभाऊ तुम्ही असल्या मुर्ख शेतकऱ्यांची बाजू घेता." आयुष्यात प्रथमच मी निरूत्तर झालो होतो . मनातून मलाही वाटले जर खरोखरच या शेतकऱ्याची घरी खायचीही सोय नसेल तर त्याने टि.व्हि. घ्यायलाच नको होता आणि तोही उधारीत! मन खट्टू झाले होते .
आम्ही अकोल्यात पोहोचलो. अकोल्यातील आमचा कार्यक्रम पार पडला .पण माझ्या मनातून तो टि.व्हि. वाला शेतकरी जाता जाईना. मी तेथून कोणालाही न सांगता निघालो .आणि टि.व्हि.वाल्या शेतकऱ्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतला .गावाच नांव लक्षात ठेवल होत आणि त्या गावात गेल्या नंतर टि.व्हि वाल्या शेतकऱ्याच घर शोधण कठीण जाणार नाही ही खात्री होती कारण त्या दिवशीची त्या गावातली ती "ब्रेकींग न्युज" असणार .
आणि झालेही तसेच.त्या गावात टि.व्हि वाल्या शेतकऱ्याच घर शोधायला अडचण आली नाही आणि योगायोगाने मला आेळखणारेही मला भेटले. तेच मला त्या शेतकऱ्याच्या घरी घेवून गेले. त्याच्या घरी जाताच नमस्कार चमत्कार झाला .आेळख पाळख झाली.त्या शेतकऱ्याने घरात पाणी आणायला सांगितले आणि चहा करायला सांगितला. त्यावर मी म्हणालो," अरे तु एवढा मोठा टि.व्हि घेतला आणि तोंड गोड न करता केवळ चहावरच मला कटवतोस का?"  माझा टिंगल टवाळीचा सुर त्याच्या कदाचित ध्यानी आला असावा. तो म्हणाला "साहेब तुम्ही विचार करित असाल या माणसाची खायची सोय दिसत नाही तरीही याने टि.व्हि घेतला? खर आहे साहेब तुमच खरोखरच माझी खायची सोय नाही तरीही मी कर्ज काढून टि.व्हि घेतला." आणि त्याच्या डोळ्यात पाणी आल ते पुसत तो म्हणाला," साहेब माझी पोरगी लग्नाला आलेली आहे.गेल्या तीन चार वर्षापासून तीच्या लग्नासाठी प्रयत्न करतो आहे पण कधी पोरगा पसंत पडत नाही तर कधी पोरगा पसंत पडतो तर त्याचा हुंडा झेपत नाही .या पोरीले एक खोड आहे. आम्हा नवरा बायकोचा डोळा लागला की ही बाहेर कोठे तरी जावून टि.व्हि.पहात बसायची . एक दोनदा रात्री झोपेतून जाग आली पहातो तर पोरगी घरात नाही .एवढ्या रात्रीबेरात्री तरणीताठी पोरगी  घरात नाही म्हटल्या बापाच्या काळजाच पाणी पाणी झाल तर पोरगी कोणाच्या घरी टि.व्हि पहात .तीले खुप बोललो.मारल झोडल. पण आमचा डोळा लागला की ही बाहेर टि.व्हि पहाले. माझी तर झोपच उडाली .झोप लागली तर पोरगी बाहेर जाते म्हटल्यावर कोण्या बापाले झोप येईन? दिवसभर काम करायच आणि रात्री झोप लागली की पोरगी बाहेर जाईन या धाकान तर माझी झोपच उडाली.त्यान तब्यतही सोकत चालली. म्हणून नाईलाजान हा टि.व्हि.घेतला." हे सर्व सांगत असतांना तो रडत होता. शेवटी त्याने रडत रडतच मला प्रश्न विचारला," साहेब शेतकरी म्हणून घरात खायची सोय नसतांना मी टि.व्हि. घेतला हे चुकल असन पण आपल्या इज्जतीले बट्टा लागू नये पोरीन बाहेर तोंड काळ करु नये या भितीन एका बापान टि. व्हि घेतला असेल तर त्यात काय चुकल? शेतकरी म्हणून मी चुकलो असेन पण बाप म्हणून माझ काय चुकल." हा प्रश्न विचारतांना तो रडत होता .आणि उत्तरा दाखल माझ्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. खरच बाप म्हणून त्याच काय चुकल होत?
*#0# चंद्रकांत वानखडे #0#*

No comments:

Post a Comment