या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून *टिळक* युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या वाटाघाटी चालू असताना शेवटच्या क्षणी एक योजना मांडली गेली होती. बंगाल, बिहार, आसाम यांचा एक गट असावा; पंजाब, सिंध, वायव्य प्रांत यांचा एक गट असावा. प्रत्येक गटाला अंतर्गत स्वायतत्ता असावी, आणि भारत अखंड रहावा, अशी ही योजना होती. भारत असा अखंड राहिला असता, तर काश्मीर व हैद्राबाद प्रांत म्हणून आणि विभक्त मतदारसंघ निवडणुकपद्धती म्हणून कायम राहणार होते. दुबळी मध्यवर्ती सत्ता आणि प्रबल प्रांत अशी घटना अस्तित्वात आली असती, आणि भारत अखंड राहिला असता! जिनांना मान्य असलेली ही योजना नेहरूंनी चाणाक्षपणे उधळून लावली. याच्या परिणामी देशाची फाळणी झाली. नेहरूंचा हा अदूरदर्शीपणा झाला, हे सर्वांचे म्हणणे आहे. पण लिओनार्ड मोस्लेच्या पुराव्याप्रमाणे गांधींच्या पाठिंब्यावर नेहरूंनी हे जाणीवपूर्वक केलेले दिसते. *अखंड भारताच्या मोहाला बळी पडून पस्तीस कोट हिंदूंचे कायमचे अहित करून घेण्यास नेहरू कधीच तयार नव्हते.* फाळणी झाल्यानंतर त्यांनी केंद्र प्रबळ केले, व इतिहासाचा एक धडा मान्य केला. १९१९ पासून सदैव मान्य केलेले विभक्त मतदारसंघ रद्द करून टाकले आणि लखनौ-कराराच्या मागे नेहरू आले.
- *नरहर कुरुंदकर*
'जागर'
No comments:
Post a Comment