Blog Archive

Monday, 29 May 2017

माझा विरोधक माझ्याशी चांगला वागत नाही.त्याचाच आदर्श समोर ठेवून मीही त्याच्याशी चांगला वागत नाही-चंद्रकात वानखडे

कधी कधी वाटते आपली विचारधारा कोणतीही असो,आपले आदर्श म्हणून भिंतीवर टांगलेले व देव्हाऱ्यात सजवलेले महापुरुष कोणतेही असो आपला खरा "आदर्श" असतो आपला विरोधक किंवा दुश्मनच. माझा विरोधक माझ्याशी चांगला वागत नाही.त्याचाच आदर्श समोर ठेवून मीही त्याच्याशी चांगला वागत नाही. तो माझा राग करतो , मीही त्याचा आदर्श समोर ठेवून त्याचा राग राग करतो. तो माझ्याशी जसा वागतो तसाच मी त्याच्याशी वागतो. एकूणच तो माझ्या कळत नकळत माझा "आदर्श" केव्हा बनून जातो ते माझे मलाच कळत नाही.
तो पहा कसा कामचूकार आहे, हलकट आहे, नालायक आहे," आयुष्यभर शेण खात राहिला" असे उच्चरवाने मी जेंव्हा सांगत असतो, तेंव्हा बऱ्याच वेळा मी माझ्या "शेण खाण्याचे" अप्रत्यक्षपणे समर्थन करित असतो. त्याचे शेण खाणे हाच माझा आदर्श बनून जाते. हे आपण मान्य करणार नाही पण स्वतःच स्वतःला तपासले तर असाच काहीसा धक्कादायक निष्कर्ष आपल्या हाती येतो.
कालच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलीकाॅप्टरला अपघात झाल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यावरून ही बाब अधिक स्पष्ट होते. गांधी हत्येनंतर आणि शाहू महाराजांच्या निधनानंतर यांनीच आनंद व्यक्त करित पेढे वाटले ना ? असा प्रश्न करून आपण आपल्या प्रतिक्रियांचे समर्थन कसे काय करू शकतो? त्यांनी त्यावेळेस डालभर शेण खाल्ल होत म्हणून मला आता टोपलभर शेण खाण्याचा तर अधिकार आहे असे म्हणणे म्हणजेच एक प्रकारे मी त्यांच्याच विचारसरणीला "आदर्शवत" विचारसरणी म्हणून एक प्रकारे मान्यता देणे नव्हे काय? त्यांनी आमचा द्वेष केला आम्हीही त्यांचा द्वेष करू यात विजय त्यांचाच आहे . जिथे जिथे द्वेष आहे तिथे तिथे "संघ"  आहे मग तो द्वेष त्यांनी केलेला असो वा प्रतिक्रिया म्हणून आपण केलेला असो. हे कदाचित सध्याच्या वातावरणात पचायला कठीण जाईल पण हे पचणी पडल्या शिवाय "संघाला" मरण नाही हेही तेवढेच खरे .द्वेषाने द्वेष, अंधाराने अंधार नष्ट होण्याची सुतराम शक्यता नाही.त्यासाठी हवा प्रेमाचा आणि प्रकाशाचाच एक किरण हे मात्र निर्विवाद आणि त्रिवार सत्य!
@#* चंद्रकात वानखडे *#@

No comments:

Post a Comment