Blog Archive

Monday, 29 May 2017

स्किझोफ्रेनिक भारतीय समाज

A Beautiful mind या जाँन नँश ( खर म्हणजे यात अनुस्वार नको आहे, पण माझा किबोर्ड तो देतोच! तेव्हा वाचकांनी तो वगळून वाचावे!) या नोबेल विजेत्या गणितज्ञाच्या जीवनावर आधारीत सिनेमातील एक प्रसंग, त्रिवार तलाक, गोहत्या या सारख्या चर्चांच्या संदर्भात आठवला. नँश स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराने त्रस्त असतो. त्याला आपला काल्पनिक पार्टनर व त्याची लहान मुलगी दिसत असतात. हळूहळू त्याचा या काल्पनिक जगाशी असलेला संबंध वाढू लागतो व वास्तवाशी संबंध तुटू लागतो. त्याचा संसार, नोकरी सारेच धोक्यात येते. तो उपचारही नीट घेत नाही. एकदा बायको बाहेर गेली असता त्याच्या दुर्लक्षाने मुलाचा जीव धोक्यात येतो. तेव्हा मात्र पत्नी घर सोडून निघते. या धक्क्याने तो जागा होतो व काही तरी विचार त्याच्या मनात चमकतो. तो भानावर येतो. वास्तव जगातल्या सोडून चाललेल्या पत्नीला अडवून तो म्हणतो "आता मला समजलय वास्तव जगात आणि त्या काल्पनिक जगात फरक काय आहे ते!  मला अनेक वर्षांपासून दिसणारी ती छोटी मुलगी कधीच मोठी होत नाहीय. ती तेवढीच आहे! याचाच अर्थ ती खरी नाही. आता हे मी स्वत:ला सतत सांगून त्या आभासी जगापासून दूर राहू शकतो! " आपल्या समाजातील अनेक समाज घटक असे विखुरलेल्या भूतकाळाच्या गोठलेल्या आभासी जगात राहात आहेत. मग हिंदूंना वैदिक विमान दिसते, मुसलमानांना साम्राज्य विस्तार दिसतो, मराठे शिवाजीच्यापुढे जात नाहीत, ब्राह्मण परशुराम ते बाजीराव यातच येरझ-या घालत राहातात! मग बाबरी, पाकिस्तान, दंगली, गोवंश, मुस्लिम उम्मा, तलाक, मूलनिवासी हे गोठलेले काळ वर्तमानाचे कार्यक्रम बनतात सर्व क्रीयात्मक ताकद ही भूतकाळात खर्च होते, वर्तमानाशी नातेच तुटते. आपण वाढतच नाही आहोत हे या कुणाही समूहाच्या लक्षातच येत नाही का? नँशला हे समजते तेव्हा तो यातून सावरतो व परत विद्यापीठात जातो. संशोधनात गुंततो व त्याला नोबेल जाहीर होते. नोबेल पुरस्कार स्वीकारल्यावर त्या समारंभात त्याचा मित्र त्याला विचारतो, " तुला अजून ती माणसं दिसतात का?" नँश म्हणतो, " होय, आत्ताही ती आसपास आहेत, पण आता मी त्यांना दूर ठेवायला व वास्तव जगात येऊ देण्यापासून रोखायला शिकलो आहे!"  आम्ही कधी ओळखणार की आपण स्किझोफ्रेनियाची शिकार झालो आहोत? आपण कधी आभासी जगाशी नाते तोडून वास्तव जगात जगायला शिकणार? वास्तव समस्यांना सामोरे जाणार?

No comments:

Post a Comment