Blog Archive

Thursday, 11 May 2017

गर्भ आशय(विज्ञान,कल्पना आणि वास्तव यांचा अप्रतिम मिलाप असणारी प्रख्यात डॉ. अमित शिंदे यांची कथा)

आर एस एस च्या ' उंच व गोरी ' मुले जन्माला घालण्याच्या आरोग्यभारती प्रकल्पाविषयी वाचले आणि माझी गेल्या दिवाळीत लिहिलेली  कथा प्रत्यक्षात उतरणार याची खात्री पटली .                    
गर्भ आशय
                     डॉ. अमित शिंदे
“ हा देशद्रोह आहे, असल्या देशद्रोहींना पाकिस्तानात पाठवायला हवे. राष्ट्राला भावी पिढी कशी हवी आहे याची स्पष्ट कल्पना माननीय पंतप्रधानांनी दिलेली आहे. असे असताना आपल्या मनाप्रमाणे संतती निर्माण करण्याचे सैराट कृत्य देशद्रोह नाही तर काय आहे? कुठलाही खटला न चालवता यांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे !” सर्वोच्च टी आर पी असलेल्या न्यूज चँनल वरील डिबेट मधील मिशीवाले गृहस्थ तावातावाने मुद्दा मांडत होते.
ताज्या बातमीनुसार एक स्त्री बायोलॉजीकली बाळाला जन्म देताना पकडली गेली होती. देशातील “राष्ट्रनिर्माण अँक्ट २०३५” नुसार हा राष्ट्र द्रोहाचा गुन्हा होता आणि त्याला मृत्यू दंडाची शिक्षा होती. कृत्रिम गर्भाशय निर्माण झाल्याला आता पंधरा वर्षे झाली होती. पंतप्रधानांच्या महात्वाकांशी योजनेनुसार तालुका पातळीवर अनेक कृत्रिम गर्भाशय केंन्द्रे निर्माण केली गेली होती. देश महासत्ता बनण्याच्या वाटेवर होता. अशा कालखंडात स्त्रियांनी नऊ महिने गर्भारपणात वाया घालाविण्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठेच नुकसान होत होते. कृत्रिम गर्भाशयाच्या शोधाने ते वाचणार होते. शिवाय जीन्स मध्ये म्युटेशन करून बुद्धिमान, कष्टाळू, आरोग्यवान पिढी जन्माला घालणे शक्य होते. पंतप्रधानांच्या आदेशानुसार त्यांच्यात देशप्रेम, शिस्तबद्धता, प्रामाणिकपणा हे गुण बाय डिफॉल्ट असणार होते. स्त्रीने आणि पुरुषाने आपापले शुक्रजंतू आणि बीज या गर्भाशय केंद्राला दिल्यानंतर त्यावर  रिफायनरीत जनुकीय प्रक्रिया करून त्यात राष्ट्र निर्माणासाठी आवश्यक गुणधर्म निर्माण केले जात. देशाच्या विकासाला बाधक असलेले गुणधर्म असलेले जीन्स समूळ नाहीसे केले जात. याचे काँन्ट्रँक्ट पंतप्रधानांचे बालमित्र असलेले राष्ट्रप्रेमी उद्योजक श्रीयुत अतीज्ञानी यांना दिलेले होते. सर्वगुणसंपन्न अपत्य कुणाला नको असते? पालक मागणी नोंदवीत. आम्हाला सचिन तेंडुलकर हवा, विराट कोहली हवा, आईनस्टाईन हवा, अब्दुल कलाम हवा. पालकांचे मागणी आणि राष्ट्राची गरज यांचा ताळमेळ साधून परफेक्ट मुल पालकांच्या हातात पडे. त्यामुळे बहुसंख्य जनता या सरकारी धोरणाच्या मागे ठामपणे उभी होती. देशप्रेमाची एक वेगळीच लहर सर्व देशात वाहत होती. इतकेच नव्हे तर हे आमच्या प्राचीन परंपरेचेच पुनर्निर्माण आहे, गांधारी, कुंती यांनी याचप्रकारे ओजस्वी पराक्रमी पुत्र जन्माला घातले होते, असेही सर्वांचे मत होते. अशी बायोलॉजीकल प्रजननाची एखाद दुसर्या फितूर माथेफिरुची बातमी ऐकून सर्व देशभरात संतापाची लहर उसळत होती. नऊ महिने असे गर्भारपणात वाया घालवायचे ? तुमच्या आयुष्यातील या बहुमुल्य वेळेवर राष्ट्राचा काहीच अधिकार नाही ? अशा राष्ट्रीय संपत्तीच्या उधळपट्टीने राष्ट्रीय उत्पन्नात जी तुट येईल त्याचे काय? शत्रू राष्ट्र या स्पर्धेत पुढे निघून जातील त्याचे काय?
हवेत प्रोजेक्ट केलेल्या टीव्ही स्क्रीन वरील ही चर्चा ऐकून शलाका मात्र अस्वस्थ होत होती. तिला काही सुचत नव्हते. तिच्या मनात एक तीव्र इच्छा आकार घेत होती मात्र ती बोलून दाखवायचे धाडस तिला होत नव्हते. तिच्या अस्वस्थतेचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. पंधरा वर्षापूर्वी जेव्हा कृत्रिम गर्भाशय पहिल्यांदा इन्स्टॉल झाले तेव्हा ही कल्पना तिला अतिशय आवडली होती. आपले मुल सर्वगुणसंपन्न हवे असा तिचा अट्टहास होता.  मग आताच तिच्या मनात काय सलते आहे?
पंधरा वर्षापूर्वी तिनेही अशाच एका कृत्रिम गर्भानिर्माण केंद्रात फॉर्म भरला होता. तिचे स्त्रीबीज आणि शर्विलचे शुक्रजंतू दिल्यानंतर खूप आतुरतेने तिने बाळाची वाट पाहिली होती. नऊ महिने अगदी नेहमीप्रमाणेच तिने बिनधास्त घालवले होते. प्रसूतीची चिंता नाही, त्रास नाही, तपासण्या नाहीत. एकदिवस अचानक मेसेज आला. ‘ युवर प्रोडक्ट इज शिप्ड अँन्ड विल बी डीलीवर्ड टुडे !’ होम डीलेवरी ! संध्याकाळी एक्स्पर्ट बाळाचे पँकेज घेऊन घरी आला. ऑक्सिजनची नळी काढण्यात आली, प्लास्टिकची नाळ कापण्यात आली... आणि बाळाचे पहिले रडणे ऐकू आले! हीच प्रसूती. आरोग्यसंपन्न, सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान, रेडीमेड बाळ ! किती हरकून गेलो होतो आपण. पण आता सहन होत नाही. आज या विषयावर शर्विलशी बोलायचेच! तिने निश्चय केला.
शलाका एका मार्केटिंग कंपनीत डेटा अँनँलीसीस चे काम बघे. हल्लीच्या नवीन ट्रेड प्रमाणे तिला ऑफिस मध्ये जाण्याची गरज नसे. सर्व काम वायफायद्वारे घरूनच करता येई. हल्ली घराबाहेर पडावे लागेल अशी कामे फार कमी उरलीत. अगदी शाळा सुद्धा आभासी ! घरीच किंवा असू तिथे त्रिमितीय स्क्रीन द्वारे एकमेकांशी बोलता येते , चर्चा, मिटिंग सगळे एका खोलीत बसून करता येते. शिवाय बाहेर प्रदूषण किती असते! शर्विल देखील घरूनच दुसर्या खोलीत बसून काम करी. तो इथिकल हँकर होता.
“शर्विल, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे !”शलाकाच्या समोर हवेत शर्विलची प्रतिमा प्रकट झाली.
“असं नाही ! प्रत्यक्ष .” ती त्रासून म्हणाली .

“ओके बेबी, वेट अ मिनिट” स्क्रीन ऑफ झाला आणि थोड्याच वेळात शर्विल शालाकासमोर आला. “व्हाय आर यु लुकिंग सो अपसेट बेबी ?” सोफ्यावर शेजारी बसत शर्विलने शलाकाला प्रेमाने विचारले.
“ मला विश्व ची काळजी वाटते रे .” शलाका म्हणाली .
“का ? काय झाले ?” शर्विल नेहमीच्या समजूतदार स्वरात म्हणाला.
“ काल मारामारी केली, त्याचा एक मित्र आहे, स्टीव्ह . त्याने म्हणे भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या . म्हणून हा आणि याचे चार पाच मित्र त्याच्या घरी गेले आणि त्यांनी मिळून स्टीव्हला मारले. नशीब स्टीव्हचे आईवडील समजूतदार आहेत. नाहीतर प्रकरण भलतेच वाढले असते.” शलाकाने सांगितले.
“हं, असं आहे तर. पण हल्ली अशा घटना सर्रास घडताहेत. दहा वर्षांपूर्वी एक प्राचीन ग्रंथ सापडला. त्यात भुईमुगात ईश्वराचा वास असतो असं लिहिलंय. भुईमुग खाणे मानवाला निषिद्ध आहे अशी ईश्वरी आज्ञा आहे.” शर्विल म्हणाला.
“ ते माहीत आहे रे ! पण इतक्या बुद्धिमान मुलाला कळायला नको का ? प्रत्येकाचे आचार, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. आपण त्यांचा आदर करायला हवा असं त्याला समजवायला गेले तर वाद घालू लागला. भुईमुगाचे हजार गुणधर्म सांगून आणि शंभर वैज्ञानिक युक्तिवाद करून मलाच गप्प केले. इतक्या प्रचंड बुद्धिमत्तेचा उपयोग द्वेष पसरवण्यासाठी करेल असं नव्हतं वाटलं.”  शलाका हाताशेने म्हणाली.
“मलाही काळजी वाटते शलाका! मला पूर्वीपासून शंका होती ...” शर्विल बोलता बोलता अचानक थांबला.
“ राष्ट्राभिमान , अस्मिता वगैरे ठीक आहे पण हल्ली पातळी हिंस्रतेकडे वळते आहे. अगदी पाच वर्षाचा होता तेव्हाचा प्रसंग आठवतो. त्याच्या खोलीतले जळमटे साफ करण्यासाठी रोबोट गेला तेव्हा विश्वने त्याला अडवले. म्हणाला, ‘ही माझ्या खोलीतली जळमटे आहेत! मी नाही साफ करू देणार . शेजार्यांच्या घरात जास्त जळमटे आहेत. ती तुम्हाला दिसत नाहीत का ?’ त्यावेळेस चिमखडे बोल म्हणून कौतुक वाटलं होतं. पण आता काळजी वाटते आहे.”
“ ठीक आहे. मी बोलतो त्याच्याशी” शर्विल म्हणाला.
“मला नाही वाटत काही उपयोग होईल असं... शर्विल मला महत्वाचं बोलायचं आहे. तू प्लीज थोडा वेळ आपल्या घराचा पर्सनल कँमेरा आणि रेकॉर्डर ऑफ करू शकशील का ? फक्त दहा मिनिटांपर्यंत ?” शलाका अजीजीने म्हणाली.
“काय ? आर यु क्रेझी ? प्रत्येक घरात जो गुप्त कँमेरा आणि रेकॉर्डर बसवलेला आहे तो उपग्रहाद्वारे डायरेक्ट नँशनल सिक्युरिटी ब्युरो ला जोडलेला असतो. त्याद्वारे देशात कुठेही अतिरेकी , परकीय हेर, गुन्हेगार असतील तर त्याची माहिती ब्युरोला लगेच मिळते. हा डाटा हँक करणे हा किती मोठा गुन्हा आहे याची कल्पना आहे का तुला? उघड झालं तर लगेच अटक होईल .” शर्विल ओरडला.
“ शर्विल, मला वाटतं आपला वापर होतोय. आपल्या मुलांचा वापर होतोय. लोकशाहीच्या डोळ्यात धूळ फेकली जातेय. मूठभरांचा फायदा करून देणारी ही व्यवस्था टिकावी, या शोषक राज्यकर्त्यांचे आसन डळमळीत होऊ नये म्हणून हे अस्मितावादाचं विष आपल्या मुलांना टोचले जातेय. नव्हे त्या विषासहच त्यांचा जन्म होतोय. कृत्रिम गर्भाशयाचे तंत्रज्ञान आपल्या मुलांचे मेंदू ताब्यात घेण्यासाठी वापरले जात आहे . मला माझी चूक सुधारायचीये शर्विल. मला आणखी एक मुल हवंय. भले ते प्रचंड बुद्धिमान, शिस्तबद्ध, तेजस्वी नसेल पण त्याच्या डोक्यात स्वच्छ मेंदू असेल. कुठल्याही पुर्वग्रहांनी दुषित न झालेला. चांगलं वाईट पाहू शकणारा, प्रचाराला न भुलून निरीक्षणातून निष्कर्ष काढू शकणारा. अनप्रीप्रोग्रॅम्ड.” शलाका बोलत होते.
“ म्हणजे ? तुला बायोलॉजीकल मुल जन्माला घालायचे आहे की काय ?” शर्विल हादरून गेला होता.
“हो.. प्लीज मला मदत कर.” शलाका अजीजीने म्हणाली.
दुसर्या दिवशी सकाळीच शलाकाच्या कंपनीतून मेसेज आला. मेसेज तिचा बॉस सुकर्मनचा होता. तिची घरी राहून काम करण्याची सुविधा काढून घेण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. तिला आजपासून ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागणार होते. शलाकाच्या पोटात धस्स झाले. याचा अर्थ स्पष्ट होता. तिच्या नवऱ्याने त्यांच्या कालच्या संवादाचे रेकॉर्डिंग सँटेलाईट क्लाउड मधून डिलीट केले होते, तरीही या संभाषणाचा काही अंश नँशनल सिक्युरिटी ब्युरो पर्यंत पोहचला होता. तिच्यावर देशद्रोही कृत्याच्या तयारीत असण्याचा संशय होता. तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश तिचा बॉस सुकर्मनला आले होते. म्हणूनच आता तिला ऑफिसला जावे लागणार होते.
तिचे ऑफिस तिच्या घरापासून लांब होते. कंपनीचा ड्रायवर कार घेऊन तिला घ्यायला आला. कार मध्ये इतर तीन सहकारी होते. त्यांच्याशी गप्पा मारत ती ऑफिसवर पोहचली. दरवाजातील सिक्युरिटी गार्ड ने तिला सलाम केला. तिने त्याच्याकडे स्मितहास्य करून त्याचा स्वीकार केला. लिफ्टने ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिने सुकर्मनची त्याच्या केबिन मध्ये भेट घेतली.
“ ओह! हलो शलाका! सॉरी फॉर इनकन्व्हीनियंस. पण खरोखर जेन्युईन टेक्निकल अडचण आहे. पण एनी वे तुझ्या प्रत्यक्ष उपस्थितीचा आम्हाला फायदाच होईल.” मधाळ हसत मृदू मुलायम स्वरात सुकर्मन म्हणाला.
“ नो प्रॉब्लेम, सुकर्मन.” ती म्हणाली. ती मनातून समजून चुकली होती. गोड बोलणारा हा समोरचा माणूस नक्कीच पाताळयंत्री असणार. नँशनल सिक्युरिटी ब्युरोकडून आलेल्या इन्फोर्मेशनने मनातून खुश झालेला असणार. एखाद्या निष्णांत शिकार्यासाराखी सावज जाळ्यात अडकण्याची वाट पहात असणार. मी जर बेकायदेशीर बायोलॉजीकल गर्भधारणेत पकडली गेले तर याला नक्कीच देशभक्तीचे सर्टिफिकेट मिळणार. एखादा पुरस्कारही मिळेल. आणि ऑफिस मधले इतर सहकारी ? गाडीतले ते क्रिश, कृपा, रश्मी ? कुणावर विश्वास ठेवावा ? कोण सरकारी खबरी असेल आणि कोण आपल्यासारखे संशयित हे ठरवणे अवघड आहे.
शलाका हताश झाली. बायोलॉजीकल प्रेग्नन्सी चा वेडा विचार आता अशक्य कोटीतला वाटू लागला होता. सुकर्मनच्या केबिन समोरच तिचा डेस्क होता. तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवणे सुकर्मनला शक्य होते. ऑफिस मध्ये येतानाच सिक्युरिटी चेक अप होई . दर महिन्याला ऑफिसचे डॉक्टर आरोग्य तपासणी करत . या सर्वांतून गर्भारपण लपविणे अशक्य होते.
ऑफिसला जाणे सुरु करून आता सात आठ महिने झाले होते. सुकर्मनने तिच्या शारीरिक बदलांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी तिची महिला सहकारी रश्मीवर सोपवली होती. तिच्या शरीरात कुठलाही बदल नव्हता. बायोलॉजीकल प्रेग्नन्सीचा विचार तिने बहुदा सोडून दिला असावा अशी सुकर्मन ची खात्री होऊ लागली होती . शालाकाचेही सर्वांशी चांगले रिलेशन्स तयार झाले होते. हास्य विनोदात दिवस भराभर उलटत होते.
एके दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये बेंगलोर ब्रँन्चचा एच आर हेड निक आला. सुकर्मन ने शलाकाला केबिनमध्ये बोलावून घेतले.
“शलाका , हा निक, याला काही डाटा हवा आहे, तुझ्याशी डिस्कस करेल. त्याला हवी ती मदत कर.” सुकर्मन म्हणाला.
“ ठीक आहे, प्लीज कम विथ मी निक.” शलाका म्हणाली.
“ कुठे आहे शलाका ? इथे तर कोणीच नाही. कुणाशी  बोलतोय तू सुकर्मन ?” निक गोंधळून म्हणाला.
“ व्हेरी फनी ! पण चेष्टा नंतर. प्लीज जा तिच्याबरोबर ?” सुकर्मन निकला म्हणाला.
“ व्हाट नॉनसेन्स, इथे कुणीच नाहीये.” निक पुन्हा चिडून म्हणाला.
“कुणीच नाहीये ? मग मी वेडा आहे की काय ? ही काय शलाका . तुझ्यासमोर जिती जागती उभी आहे. शलाका, से समथिंग .” सुकर्मन त्रासून उद्गारला.
“निक , तुम्हाला बरं वाटत नाहीये का ? मी पाणी मागवू का ?” शलाका म्हणाली.
“डोंगरे, पटकन ग्लासभर पाणी घेऊन आत  या.” सुकर्मन ने शिपायाला फोनवर बोलावले. डोंगरे शिपाई पाणी घेऊन आत आला.
“आता हा शिपाई तरी दिसतो की नाही?” सुकर्मनने निकला चेष्टेने विचारले.
“ऑफकोर्स दिसतोय! मिस्टर डोंगरे, साहेब म्हणताहेत, इथे एक बाई आहेत शलाका नावाच्या. तुम्हाला दिसताहेत ?” निक ने पाण्याचा ग्लास ओठाला लावत विचारले.
“ का चेष्टा करताय गरीबाची साहेब ? आता शलाका मँडमना वळखत नाही व्हय मी ?” डोंगरे शिपाई म्हणाला.
आता मात्र निकची सहनशक्ती संपली. तो उठून उभा राहिला. त्याने धाडकन केबिनचा दरवाजा उघडला. आरडाओरडा ऐकून सर्व ऑफिस गोळा झाले. “ या , सगळे या, इथे एक बाई उभी आहे म्हणे! कुणाला दिसते आहे सांगा .” निक ओरडला.
“सर प्लीज काम डाऊन. तुम्ही दमला आहात बहुतेक, दोन मिनिटे झोपा या कोचवर ! मी डॉक्टरांना बोलावू का ?” निक ला आधार देत शलाकाचा ज्युनिअर सहकारी क्रिश म्हणाला. त्याने निकला कोचवर झोपवले.
“ रात्रीची उतरली नाही बहुतेक.” कुणीतरी खवचटपणे पुटपुटले.
“ आर यु शुअर ? तुम्हा सर्वांना इथे बाई उभी दिसते आहे?” निक ने घाम पुसत क्षीण स्वरात विचारले. आता मात्र तो पुरता हादरला होता. त्याला चक्कर येऊ लागली होती.
“ सर तुम्ही विचार नका करू. शांत पडा. डॉक्टर येतीलच इतक्यात.” रश्मी म्हणाली. निकला काही सुचेनासे झाले.
“ओके, आय थिंक यु मस्ट बी राईट. दगदग आणि जागरणाने डोके चालेनासे झाले आहे माझे.” निक म्हणाला. सर्वांना एक स्त्री दिसते आहे मग आपल्यालाच कशी दिसत नाही असं विचार करत निकने डोळे मिटले आणि तो शांत पडला.
शलाकाचे दिवस भरले होते. गेले नऊ महिने तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. तिचा मोठा मुलगा विश्व हा अंतर राष्ट्रीय युवा फेलोशिप मिळवून परदेशात गेला होता. तिच्या पतीच्या सहकार्याने आणि त्यांचा वृद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निशिकांत यांच्या मदतीने तिने हे अवघड नऊ महिने पार पाडले होते. डॉ. निशिकांत यांची प्रसूती पार पाडण्याची सवय गेल्या पंधरा वर्षात मोडली होती. कृत्रिम गर्भाशयाच्या सरकारी धोरणामुळे त्यांचावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली होती. त्यामुळे या व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात संताप होता. विद्रोहाच्या जाणीवेतून त्यांनी शलाकाची प्रसूती पार पडण्याची बेकायदेशीर जबाबदारी स्वीकारली होती.
रात्रभर कळा घेऊन बेजार झालेल्या शलाकेने पहाटेच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला.
“मुक्ता पाशा विपाशाच्च मुक्ता सूर्येण रश्मीनः
मुक्त सर्व भयात गर्भ मा चीर ..मा चीर ...स्वाहा”
त्यांनी लहानपणी पाठ केलेला श्लोक म्हटला. “ सर्व बंधने मुक्त झाली आहेत, सूर्याने किरणे मुक्त केली आहेत, हे गर्भ आता भिवू नकोस , ये ये ...”
“ शर्विल , केवळ तुझ्यामुळे होऊ शकले हे. तू जर माझ्या ऑफिस मधील सर्वांचे ब्रेन हँकींग केले नसते तर हे कधीच झाले नसते.” शलाका कृतज्ञतेने म्हणाली.
“ शेवटी विचार म्हणजे काय शलाका ? मेंदूतील इलेक्ट्रो केमिकल सिग्नल्सच ना ?तू सर्वांशी ओळख वाढवली, हस्तांदोलन करताना, कॉफी पिताना नकळत प्रत्येकाच्या शरीरात मायक्रोचीप इंजेक्ट केलीस. त्यामुळेच मला त्यांच्या मेंदूतील ऑडीओ व्हिज्युअल सेन्टर्स हँक करता आले. ड्रायवर पासून शिपायापर्यंत आणि सिक्युरिटी गार्ड पासून डॉक्टरपर्यंत सर्वांच्या शरीरात बायोइलेक्ट्रिक रेझोनन्स सिस्टीम बसवल्यानंतर प्रत्येकाचा मेंदू रिमोट न्यूरल माँनिटरिंग द्वारे कंट्रोल करणे मुळीच अवघड नव्हते. कानाला टाळून आवाज ऐकवणे आणि डोळ्यांना टाळून प्रतिमा दाखविणे सहज शक्य झाले. त्यांचे मेंदू आणि माझा कॉम्प्युटर एकमेकांशी सलग्न झाले होते. मला हव्या त्या प्रतिमा आणि हवा तो आवाज एकाच वेळेस अनेकांना दाखवणे, त्यांचे विचार जाणून घेणे शक्य झाले. शेवटी आपल्याला ‘दिसते’ म्हणजे काय होते? आपल्या मेंदूतील विज्युअल सेन्टर्सला डोळ्यांद्वारे विशिष्ट संदेश देऊन एक प्रतिमा निर्माण केली जाते. म्हणजे वस्तू चे अस्तित्व माणसाच्या मेंदूत असते. अरण्यात झाड पडले आणि तिथे ऐकायला कुणीच नसेल तर आवाजाची कंपने हवेत विरून जातील. त्यांचे मेंदूत इलेक्ट्रो केमिकल संदेशात रुपांतर झाले नाही म्हणजे आवाज ‘निर्माण’ झालाच नाही. इथे उलट झाले. तू प्रत्यक्ष नव्हतीस तरी तुझ्या सहकाऱ्यांसाठी तू अस्तित्वात होतीस.” शर्विलच्या डोळ्यासमोरून गेल्या नऊ महिन्यांचा प्रवास वेगाने एखाद्या चित्रपटासारखा सरकला .
“पण आता या बाळाचे काय ? याचे अस्तित्व कधी न कधी उघड करावे लागेलच ना ?” शलाका काळजीने म्हणाली.
“ते फारसे अवघड नाही. आपल्या देशाची रीतच आहे ती. कृत्रिम गर्भनिर्माण केंद्राच्या एखाद्या भ्रष्ट कर्मचार्याला चिरीमिरी देऊन, ‘धिस बेबी इस डिलिवरड इन अवर सेंटर’ असे सर्टिफिकेट घेता येईल.” शर्विल म्हणाला.
“मात्र तुझे हे तंत्रज्ञान आपल्या राज्यकर्त्यांच्या हाती मात्र पडून देऊ नकोस. नाहीतर आपल्याला कंट्रोल करण्याचे नवीन साधन मिळेल त्यांना.” शलाका काळजीने म्हणाली.
“त्यांना नाही गरज याची. त्यांच्याकडे इतक्याच प्रभावी इतर टेक्निक्स आहेत. नाहीतर सर्वत्र महागाई, बेरोजगारी वाढत असताना आपला विकास होतोय यावर लोकांचा विश्वास कसा बसला असता ?” शर्विल म्हणाली.
दोघेहे खळखळून हसू लागली .

No comments:

Post a Comment