Blog Archive

Monday, 29 May 2017

जाता जाता शेवटचे शब्द. --------------दंगलकार.-------

माफ करा पोरांनो
आज शेवटचं बोलतो आहे,
आपल्या बांधावरच्या बाबळीला
आज गळफास घेतो आहे.
माझं थोरल्या मुलासाठी
एक कळकळीचं सांगणं
आहे त्या भाकरीतच
आपल्या काळ्या मातीत चांदणं...
ते चांदणं कुणाला देऊ नकोस
अनेक मंत्री येतील
चांगली भाषणं देतील
खोट्या आश्वासनांना कधी भुलू नकोस,
मी टाळ्या वाजवल्या तशा
तू वाजवू नकोस,
आपल्या हातात चांदणं आहे
कुणावर कधी उधळू नकोस...
माफ कर मुली मला
तुझ्या डोक्यावर अक्षता
न टाकताच आज
निघून जातो आहे.
तू दिलेला गालावरचा मुका
आजही गालावरच खेळतो आहे,
समाजाच्या वाईट नजरा
आत्ता तुझ्याकडे पाहतील
अनाथ झालेल्या मुलीला
कधी उचलून नेतील
याचा काही नेम नाही
जगात कुठं प्रेम नाही
नजरेला त्या भुलू नकोस
कधी कुणाला फसू नकोस
तुझ्या गालात चांदणं आहे
ते चांदणं कुणाला देऊ नकोस...
माफ कर सखे मला
साथ तुझी सोडतो आहे
अर्ध्यावरती डाव सारा मोडतो आहे.
भातुकलीच्या खेळामधली
तू होतीस राणी
राजा मला म्हणत म्हणत
गुणगुनायचीस बांधावरची गाणी..
आत्ता राजा तुला दिसणार नाही
तुझ्याजवळ असणार नाही..
अर्ध्यावरती डाव मोडून
गाव सोडून जातो आहे..
उद्या माझ्या मड्यासमोर
बरीच गर्दी होईल
चार दोन धीराचे शब्द तुम्हाला
ऐकू येतील...
रडत रडत त्यांना दोन चार शिव्या द्या..
हात जोडून सांगा
आत्ता सुखानं जगू द्या..
बघा जमलंच तर हसत हसत जगा...
उद्या गावात धुकं होईल
माझं घर मुकं होईल..
माफ करा पोरांनो
बाभळीची फांदी तुटली
बांधलेली दोरी तुटली...
घराकडे येतो आहे.
अरे बघूया ना जिंदगी जगून साली,
पावसाची गाणी लिहू
भुई फाडून आलेल्या ढेकळांसाठी...
बाभळ म्हणाली आत्ता,
पाखरं जगतात ना रे,
त्यांना कुठाय सरकार न्याय मागण्यासाठी...
बस झाल्या शिव्या
आपण मातीच्या ओव्या गाऊ
आणि सखे अगं रडतेस काय
धर नांगर
फाडत जाऊ जमीन..
हवामानाचा अंदाज चुकतोच गं.
आपण जगण्याचा अंदाज बदलून दाखवू...
--------
कविता संपली आहे मायबापहो,
पुढे पाठवत चला
आणि जीव वाचवत चला....
कविता हा झरा आहे जिवंत जिंदगीचा...
---------
दंगलकार.नितीन चंदनशिवे.
8855800195.

No comments:

Post a Comment