पॅलेस्टिनींना समजून घेऊ पाहणाऱ्या इस्रायली लेखक-शांतता कार्यकर्त्यांचा हा प्रवास; अनेकांना आत्मपरीक्षणाकडे नेणारा..
आपल्याभोवतीचं भ्रमाचं जाळं बाजूला करून स्वच्छ वास्तव पाहण्याचा मार्ग सोपा नाही. त्यासाठी खुल्या मनाने पूर्वग्रह सोडून देण्यासाठी लागणारं शौर्य आणि प्रामाणिकपणा लागतो. मात्र स्वत:शी व आजूबाजूच्या इतरांशी संघर्ष केल्याशिवाय तो रस्ता गवसण्यासारखा नाही आणि समाज इतका तुकडय़ातुकडय़ांत विभागला गेलेला असतो, की आपण आयुष्यभर काही न करता आनंदाने आपल्या चौकटीत सुखेनैव बेफिकीर राहून आनंदाने जगू शकतो. तशी सोय आपल्या जातीनिहाय, धर्मनिहाय वेगळ्या वस्त्यांनी आपल्याला करून दिली आहे; पण मिको पेलेडसारखे लेखक असं बेफिकीर आनंदाचं जगणं नाकारतात आणि खडतर रस्त्यावर चालणं पसंत करतात. इतकंच नव्हे तर असा प्रवास हीच आपली नैतिक निवड आहे हेही दाखवून देतात. अर्थातच, अशी उदाहरणं अपवादात्मक आणि संख्येने थोडी.
मिको पेलेडबरोबर माझी पहिली सायबरभेट कशी आणि कुठे झाली हे आता नेमकेपणाने आठवत नाही. पहिल्यांदा यू टय़ूबवर पाहिलं तेव्हा मिको युरोपातल्या कुठल्या तरी विद्यापीठात भाषण देत होता. त्याने लिहिलेल्या पुस्तकाबद्दल बोलत होता. त्याची एकामागून एक चार-पाच भाषणं ऐकली.
मिको जन्माने इस्रायली ज्यू. त्याचा जन्म १९६१ मधला. जेरुसलेममध्ये तो लहानाचा मोठा झाला. घरातलं आणि आजूबाजूचं वातावरण झायनवादी, म्हणजे पॅलेस्टिनी प्रदेशात ज्यूंचं एक स्वतंत्र राज्य स्थापन झालं पाहिजे, अशी ठाम भूमिका. स्वत:च्या ज्यू असण्याचा अभिमान. मिकोच्या अगोदरच्या दोन पिढय़ा इस्रायलमध्ये यहुदींचं राज्य आणण्यासाठी लढलेल्या. आजोबा डॉ. अव्राहम कात्सनेल्सन हे प्रसिद्ध झायनवादी नेते. मूळच्या पॅलेस्टाइनमध्ये आपलं इस्रायल नावाचं यहुदी राष्ट्र निर्माण झाल्याचा एक जाहीरनामा तिथल्या ज्यूंनी १९४८ साली प्रसिद्ध केला होता, त्यावर सही करणारे जे होते त्यांच्यापैकी एक. म्हणजे भ्रमाचं जाळं अगदी पक्कं.
मिकोचे वडील इस्रायलच्या लष्करात अधिकारी होते. त्यांचं नाव मातीत्याहू पेलेड ऊर्फ मात्ती पेलेड. हे मात्ती पेलेड १९४८ आणि १९६७ या दोन्ही वर्षी अरबांविरुद्ध लढले होते. १९४८ मध्ये इस्रायली लष्करी अधिकारी म्हणून आणि १९६७ मध्ये जनरल म्हणून. आपल्याकडे ज्या प्रकारच्या इस्रायली शौर्याची वाहवा केली जाते तसल्या इस्रायली शौर्याचं जणू प्रतीकच!
तर अशा मात्ती पेलेडचा मिको हा मुलगा. त्याच्या वडिलांची आणि त्याची स्वत:ची गोष्ट सांगणारं पुस्तक मिकोने लिहिलंय. त्याचं शीर्षक आहे- ‘द जनरल्स सन’. आपल्या वडिलांची निव्वळ लष्करी कीर्ती सांगणारं एक पुस्तक मिकोला लिहिता आलं5 असतं तरी पुरलं असतं; पण मात्ती पेलेड यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मातीत्याहू पेलेड हे निव्वळ एक उत्तम लढवय्ये नव्हते; तर ते अरबी साहित्याचे अभ्यासकसुद्धा होते. इस्रायलच्या विविध वर्तमानपत्रांत त्यांचं लेखनही प्रसिद्ध झालं होतं. इस्रायलींच्या मनात मातीत्याहू पेलेड यांच्याबद्दल सामान्यत: आदराची भावना दिसून येते; पण हा आदर त्यांनी लष्करात केलेल्या कामगिरीपुरता मर्यादित आहे. मिकोच्या वडिलांनी १९६७ च्या अरब-इस्रायली युद्धानंतर सैन्यातून निवृत्ती घेतली आणि अरबी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यामुळे मिको सहा वर्षांचा असताना पेलेड कुटुंब मिकोसकट अमेरिकेला गेलं.
वडिलांची पीएचडी पूर्ण झाल्यावर पेलेड कुटुंब इस्रायलला परत आलं. १९७३ मध्ये आणखी एकदा अरब-इस्रायली संघर्ष झाला. त्यानंतरच्या काळात मिकोच्या वडिलांची मतं आणि इस्रायलच्या सर्वसामान्य ज्यूंची मतं यात अधिकाधिक फारकत होत गेली. इस्रायलमधल्या शांततावादी कार्यकर्त्यांच्या ते जवळ गेले. संघर्ष थांबवून शांतता स्थापन करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. पॅलेस्टिनी नेत्यांना वैयक्तिक पातळीवर भेटणं, शांततेची बोलणी करणं हे त्यांनी अनौपचारिक पद्धतीने करायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत काही शांतता कार्यकर्ते होते. एकदा तर ते यासर अराफतनासुद्धा भेटले. त्याचा काही परिणाम मिकोच्या मतांमध्ये होत होता. अर्थातच, इस्रायली शासनकर्त्यांनी या प्रयत्नांकडे साफ दुर्लक्ष केलं. मात्ती पेलेड अरबधार्जिणे आणि देशद्रोही आहेत, असे आरोप झाले.
१९६७ च्या युद्धानंतर मात्ती पेलेड यांच्या दृष्टिकोनात जे बदल घडले ते या पुस्तकातून मिकोने आपल्यासमोर ठेवले आहेत.
वडील आणि आई
मिकोच्या या पुस्तकात दोन गोष्टी आहेत. पहिली आहे त्याच्या वडिलांची आणि दुसरी त्याची स्वत:ची. दोहोंत निर्णायक वळणं येतात आणि त्यानंतर त्यांच्या कथा वेगळ्याच दिशेला जाताना दिसतात.
मिको शाळेत असताना आपल्या वर्गातली मुलं आणि शिक्षक यांच्याशी वाद घालत असे. मिकोच्या वर्गातली मुलं आणि शिक्षक जे बोलत त्याच्याशी त्याची मतं जुळेनात. ‘या साऱ्यामुळे वादविवाद करण्याचं माझं कौशल्य वाढीला लागलं; पण माझ्या मतांमागचा तर्क कोणी समजून घ्यायला तयार नसे; बहुतेक वेळा आमच्यावर अरबधार्जिणे असल्याची टीका होई,’ असं याबद्दल मिको म्हणतो. पाचव्या इयत्तेत असताना घडलेला एक प्रसंग मिकोला आठवतो : मिकोच्या वर्गातल्या एका मुलाचे वडील एक प्रसिद्ध पत्रकार होते. ते एकदा वर्गात आले. आल्याआल्या त्यांनी पहिला प्रश्न केला- तुमच्या वर्गात मात्ती पेलेडचा मुलगा आहे. कोण आहे तो? प्रश्न खोचकपणे आणि तिरकस बुद्धीने विचारला होता. मिको म्हणतो, ‘वर्गातल्या सगळ्या मुलांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. माझा चेहरा लालबुंद झाला. मी हात वर केला. मी आणि माझे वडील- आमची दोघांची मतं सर्वसामान्य इस्रायलींच्या मतांबरोबर जुळत नसत.’ त्यामुळे आपली देशनिष्ठा, देशप्रेम आणि आपल्या देशाच्या लष्कराबद्दलचं कौतुक अबाधित असल्याचं त्याला दर वेळी इतरांना पटवून द्यावं लागे.
आईने सांगितलेल्या एका छोटय़ा गोष्टीचा मिकोच्या मनावर गहिरा ठसा उमटलेला दिसतो. मिको आपल्या भाषणांत अनेकदा या गोष्टीचा उल्लेख करतो. आई ही गोष्ट त्याला सांगायची व त्यातलं मर्म त्याने ओळखावं अशी तिची इच्छा असायची. ही गोष्ट १९४८ च्या काळातली आहे.. जेरुसलेमच्या एका वस्तीच्या जवळ पेलेड कुटुंब राहायचं. तिथे काही पॅलेस्टिनी कुटुंबं राहायची. त्यांची घरं सुंदर, नेटकी आणि भव्य होती. मिकोची आई त्याला सांगायची : ‘मी लहान असल्यापासून ही घरं पाहात होत्ये. शनिवारी मी जेव्हा या वस्तीतून चालत जायची तेव्हा ती कुटुंबं त्यांच्या व्हरांडय़ात बसलेली दिसायची. घरांच्या समोर पुष्कळदा लिंबाचं झाड असायचं आणि मागच्या परसात फळझाडं असायची..’
१९४८ च्या युद्धात ज्यूंच्या निमलष्करी दलांच्या दहशतीमुळे आपली घरं सोडून ती पॅलेस्टिनी कुटुंबं पळून गेली. इस्रायली सैनिकांनी ती घरं बळकावली. त्यातल्या वस्तू लुटून नेल्या आणि सैन्याने ती घरं आपल्या अधिकाऱ्यांना दिली. असंच एक घर इस्रायली लष्कराने पेलेड कुटुंबीयांना देऊ केलं. मिकोच्या आईने ते घर नाकारलं. म्हणाली, ‘इथल्या आईला जर निर्वासित छावणीत आसरा घ्यावा लागत असेल तर तिचं ते घर मी कसं घेऊ ? त्या माणसांना आपल्या घराची किती आठवण येत असेल?’
मोठं घर नाकारून त्याऐवजी मिकोचं कुटुंब आजीच्या छोटय़ा घरी राहायला गेलं. ते सोपं नव्हतं. मिकोची आई म्हणायची, ‘घरातलं सुंदर फर्निचर, चादरी, पांघरुणं असल्या वस्तू इस्रायली सैनिक पळवून घेऊन जायचे तेव्हा मला शरम वाटायची. असं करायला कसे धजत होते आपले सैनिक?’
मिको म्हणतो, ‘लहानपणी ही गोष्ट ऐकताना मी अस्वस्थ होत असे; पण त्या अस्वस्थतेची कारणं नेमकी उमजायची नाहीत. पुढे मोठं झाल्यावर गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या.’
शालेय शिक्षण घेत असताना मिकोला कराटे शिकण्याची आवड निर्माण झाली. शाळेतल्या शिक्षणापेक्षा त्याचा कल कराटे शिकण्याकडे होता. कराटे शिक्षण घेतल्यावर मिकोने अमेरिकेत स्थलांतर केलं.
भाचीच्या मृत्यूनंतरचं भान
अमेरिकेत असताना मिकोच्या आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं.
नुरित ही मिकोची बहीण. तिची स्मादार नावाची १३ वर्षांची मुलगी सप्टेंबर १९९७ मध्ये एका बॉम्बहल्ल्यात मारली गेली. दोन पॅलेस्टिनींनी जेरुसलेममध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट केला; त्यात स्वत: ते दोघे पॅलेस्टिनी मारले गेलेच आणि काही इस्रायली मारले गेले. त्यातली एक स्मादार. एका प्रसिद्ध इस्रायली जनरलच्या नातीच्या बाबतीत ही घटना घडली आणि तीही दहशतवादी हल्ल्यात. तिचे आजोबा मातीत्याहू पेलेड हे पॅलेस्टिनींशी शांतता करार करण्याचा अथक प्रयत्न करणारे जनरल असल्यामुळे इस्रायलमधल्या वातावरणात पॅलेस्टिनींविषयी पुन्हा एकदा सार्वत्रिक चीड होती. या घटनेला इस्रायलमध्ये महत्त्व होतं. बरेच इस्रायली नेते सांत्वनासाठी नुरीतच्या घरात जमले होते. अनेक वार्ताहर होते. दफनविधी झाल्यानंतर जेव्हा त्या दुर्दैवी मुलीची आई साऱ्यांना सामोरी गेली तेव्हा सर्वाना तिच्या या घटनेबद्दलच्या भावना जाणून घेण्याची उत्सुकता होती. पॅलेस्टिनींबद्दल ती चिडून काही तरी बोलेल; बदला घेण्याची भावना पुन्हा उफाळून येईल, अशी सगळ्यांची अटकळ होती; पण ती तसं काहीच बोलली नाही आणि या घटनेनंतर तिने जी वक्तव्यं केली त्यात ती म्हणते : ‘अशी घटना कोणत्याच आईच्या बाबतीत घडावी असं कुठल्याही आईला वाटणार नाही. बदला घेणं वगैरे मला काही सांगू नका. आईपणा ही सगळ्या आयांना जोडणारी एक शक्ती आहे. ती सगळे धर्म, प्रदेश आणि आपले आपापसातले सगळे मतभेद यांच्या पलीकडची आहे.’ आणखी एक गोष्ट तिने सांगितली. ती म्हणाली : ‘माझं सरकार या गोष्टीला जबाबदार आहे. या सरकारने त्या दोन पॅलेस्टिनी तरुणांना इतक्या टोकाला जायला भाग पाडलं, की त्यांनी स्वत:चा जीवदेखील गमावला. आपलं शासन क्रूर पद्धतीने पॅलेस्टिनींना दडपत आहे आणि ज्या दडपणुकीत पॅलेस्टिनी जगत आहेत त्याचा हा परिपाक आहे. जर अशा घटना पुन:पुन्हा होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर पॅलेस्टिनींची आपण चालवलेली क्रूर दडपणूक प्रथम थांबवा. जोपर्यंत पॅलेस्टिनींना त्यांची जमीन, त्यांचं पाणी, त्यांची घरंदारं, त्यांचे अधिकार, स्वातंत्र्य हे परत मिळण्याची कोणतीच आशा नसेल तोपर्यंत हे होतच राहील.’
या घटनेनंतर आपण भानावर आलो, असं मिको म्हणतो. सात दिवसांचा दुखवटय़ाचा काळ संपल्यावर मिको पुन्हा अमेरिकेत गेला. त्याला स्वस्थ बसवेना. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांची त्याला संगती लावायची होती.
पॅलेस्टिनींशी भेट, चर्चा
२००० साली अमेरिकेत सॅन दिअॅगोमध्ये मिकोला एका संयुक्त गटचर्चेत भाग घेण्याची संधी आली. तिथे ज्यू आणि पॅलेस्टिनी अशा दोन्ही गटांतली माणसं आयुष्यात प्रथम एकत्र बसलेली त्याने पाहिली. आपल्या आयुष्यात आपण तिथे पॅलेस्टिनींना खऱ्या अर्थाने पहिल्यांदा भेटलो, असं मिको म्हणतो. त्या वेळी त्याचं वय ३९ होतं. आयुष्याचा बराच काळ त्याने जेरुसलेममध्ये घालवला होता. जेरुसलेम हे मिश्र वस्तीचं शहर आहे; पण तिथे ज्यू आणि पॅलेस्टिनी यांच्या वस्त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. ज्यू आणि पॅलेस्टिनी एकाच पातळीवरून आणि मोकळेपणाने बोलताहेत असं दृश्य या गटचर्चेपूर्वी मिकोने कधी पाहिलं नव्हतं. जिथे इस्रायली ज्यू आणि पॅलेस्टिनी हे कायद्याने समान आहेत अशी एकही जागा अख्ख्या इस्रायलमध्ये नाही हे त्याला पहिल्यांदा ठळकपणे जाणवलं. आपल्या इस्रायलच्या दिवसांत आपल्याला मित्र म्हणावे असे फक्त इस्रायलीच होते; त्यांत एकही पॅलेस्टिनी माणूस नव्हता ही गोष्ट त्याला ठळकपणे लक्षात आली.
सॅन दिअॅगोमधल्या या चर्चेमध्ये मिकोला आयुष्यात पहिल्यांदा बऱ्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. बळाचा वापर करून आपल्याला कसं हाकलून दिलं गेलं याच्या कहाण्या तिथे आलेल्या एकेका पॅलेस्टिनी माणसाने सांगायला सुरुवात केली. मिकोला हे सारं नवीन होतं, चक्रावून टाकणारं होतं. आपण इस्रायली ज्यू असं काही करू शकतो यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. नैतिकदृष्टय़ा आपण नेहमीच बरोबर असतो; आपलं लष्कर हे नेहमीच योग्य गोष्टी करत आलेलं आहे; माणसं म्हणून काही चुका करत असलो तरी स्थूलमानाने इस्रायली अनैतिक असूच शकत नाहीत, अशी त्याची समजूत होती. पण पॅलेस्टिनींच्या कहाण्या काही तरी भलतंच सांगत होत्या. आपण लहानपणापासून जे ऐकत आलो ते खरं नाही, हे मिकोच्या लक्षात यायला लागलं. ‘असलं कटू सत्य पचवायला आपल्याला बराच वेळ लागला. हे सगळं मला समजावून देण्यासाठी सॅन दिअॅगोमधल्या पॅलेस्टिनी समाजाने बरीच मदत केली, त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी आहोत आणि आपल्या पॅलेस्टाइनच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने तिथे सुरुवात झाली,’ असं मिको म्हणतो.
इतिहासकार विरुद्ध झायनवादी
आपण ज्याला इस्रायलचा स्वातंत्र्यसंग्राम म्हणत असतो त्याला पॅलेस्टिनी माणसं ‘नक्बा’ म्हणतात, असं या चर्चानंतर पहिल्यांदा मिकोच्या लक्षात यायला लागलं. नक्बा याचा अर्थ ‘मोठं संकट’. १९४८ साली अंदाजे साडेसात लाख पॅलेस्टिनींना इस्रायलींनी त्यांच्या भूमीवरून हाकलून दिलं; हे लोक निर्वासित झाले. ‘नक्बा’ हा शब्द इस्रायली इतिहासाच्या पुस्तकांत कुठे सापडत नाही; पण १९९० नंतर इस्रायलमध्ये ज्यू इतिहासकारांची एक नवी पिढी निर्माण झाली आणि इस्रायलच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन खरं काय घडलं होतं याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायला लागली. बेनी मॉरिस, इलान पाप्पे, अवी श्लाइम अशी काही मंडळी यात होती. ज्यूंनी हिंसाचार कसे केले, पॅलेस्टिनींची हकालपट्टी कशी केली याचे पुरावे जेव्हा या इतिहासकारांनी द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्याविरुद्ध ज्यू झायनवाद्यांनी गहजब सुरू केला. त्यांचं जिणं हराम केलं (आपल्याकडच्या ट्रोलधाडीची आठवण यावी असा हा प्रकार होता.) इलान पाप्पे या इतिहासकाराला तर झायनवाद्यांनी इतकं भंडावून सोडलं, की त्याला कंटाळून स्वदेश सोडून ब्रिटनमध्ये स्थलांतर करावं लागलं.
या गटचर्चानंतर मिको आतून-बाहेरून हलून गेला. त्याला स्वस्थ बसवेना. आपण काही तरी केलं पाहिजे, अशी टोचणी त्याला लागली.
‘सुरक्षा’ की वंशभेद?
हे सगळं घेऊन जेव्हा तो इस्रायलला जायचा तेव्हा त्याच्या लक्षात यायचं, की आपले जुने मित्र हे एकत्र पॅलेस्टिनींबद्दल अत्यंत गलिच्छ आणि विद्वेषी विशेषणं वापरायचे. एकूणच बहुतेकांची भाषा अरबविरोधी आणि मुस्लीमविरोधी होती.
त्यानंतर मिकोने पॅलेस्टाइनमध्ये जायचं ठरवलं. त्याबद्दल मिको लिहितो-
‘इस्रायलमधून आपण पॅलेस्टाइनमध्ये जिथे जिथे प्रवेश करतो त्या रस्त्याच्या सुरुवातीलाच हिब्रू भाषेत एक मोठी पाटी लिहिलेली दिसते. तिच्यावर लिहिलेलं असतं- ‘तुम्ही ‘ए’ क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहात.’ इस्रायलींना या क्षेत्रात जायला मज्जाव आहे. तिथे गेल्याने तुमच्या जीविताला धोका आहे आणि (इस्रायलींनी) तिथे प्रवेश करणं हा गुन्हा आहे. ही पाटी हिब्रू भाषेत असल्याने फक्त इस्रायलींना त्यातून काय तो बोध होईल असं गृहीत आहे. ज्या माणसाला काही तारतम्य असेल तो अशी पाटी वाचून मागे वळेल आणि चुपचाप घरी जाईल अशी अपेक्षा असते; पण सुदैवाने माझ्यात किंवा माझ्या काही मित्रांच्यात अशा तारतम्याचा अभाव असल्याने आम्ही सरळ पुढे पुढे जात राहिलो. पॅलेस्टाइनमध्ये शिरल्यावर दिसणारी दृश्यं परिचयाची आहेत. वाहतुकीची अनेक ठिकाणी कोंडी झालेली असते; मुलं शाळेत जात असतात किंवा शाळेतून परत येत असतात; आपल्याला दुकानं दिसतात; माणसं कामावर जाताना किंवा कामावरून परतताना मला दिसतात. आता मला तिथे जायला- तिथून यायला लागून अनेक र्वष होत आली; पण ही दृश्यं काही बदलली नाहीत. मी इस्रायली आहे म्हणून हातात मशीनगन घेऊन उभा असलेला पॅलेस्टिनी माणूस अजूनही मला भेटायचा आहे.
कालांतराने माझ्या असं लक्षात यायला लागलं, की इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यामध्ये उभ्या केलेल्या भिंती, चेकपोस्टांवर असलेली सुरक्षाव्यवस्था यांचा व ‘सुरक्षे’चा काडीचाही संबंध नाही. जेव्हा केव्हा एखाद्या पॅलेस्टिनी माणसाला (इस्रायलमधल्या) तेल अवीव विमानतळावर जायचं असतं तेव्हा प्रत्येक वेळी त्याला ज्या अपमानास्पद पद्धतीने तपासणीला सामोरं जावं लागतं आणि तिथे जी दहशत असते त्याचाही ‘सुरक्षे’शी संबंध नाही. हा सगळा वंशभेदाचा मामला आहे.’
पॅलेस्टिनी मित्र जोडणं, वेस्ट बँक परिसरात जाणं, तिथल्या माणसांशी संवाद करणं, अपंगांना मदत करणं, तिथल्या मुलांना कराटे शिकवणं असे अनेक उद्योग मिकोने केले. त्यांचं वर्णन करणं हा एखाद्या छोटय़ा पुस्तकाचा विषय होईल.
मिकोचं हे प्रवासवर्णन अनोखं आहे. ज्यू समाज आणि पर्यायाने त्यांची मनं ही स्वसंतुष्ट, आक्रमक स्वाभिमानाने भरलेली एक कडेकोट बंदिस्त वस्ती आहे; ती स्वनिर्मित मिथकांवर पोसलेली आहे; तिच्या संकल्पना वांशिक साचेबद्धतेने भरलेल्या आहेत; कटू वास्तव समोर येताच ही वस्ती कशी खवळून उठते या सगळ्याचं चित्रण मिकोच्या पुस्तकात आहे; पण हा त्याच्या लेखनाचा आरंभबिंदू आहे. तिथून सुरुवात करून प्रयत्नपूर्वक या बंदिस्त जाणिवेच्या प्रदेशातून तो कसा बाहेर पडतो आणि अधिक सर्वसमावेशक, मोकळ्या आणि विद्वेषाचा विखार नसलेल्या निर्मळ प्रदेशात तो कसा पोचतो हा प्रवास प्रत्ययकारी आहे. ज्या हिंसाचारात इस्रायल-पॅलेस्टाइन गेली सत्तर र्वष होरपळत आहेत तशा प्रकारच्या हिंसाचाराचे उद्रेक आपल्याकडे वाढत्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे हे प्रवासवर्णन वाचताना आपल्या देशातल्या आजच्या असहिष्णू वातावरणाची वाचकाला पदोपदी आठवण न झाली तरच नवल.
‘द जनरल्स सन’लेखक : मिको पेलेडप्रकाशक : जस्ट वर्ल्ड बुक्सपृष्ठे : २२४, किंमत : ११२५ रुपये
अशोक राजवाडे
No comments:
Post a Comment