Blog Archive

Wednesday, 31 May 2017

गांधीजी अस्पृश्यता निवारणाबद्दल किती क्रांतिकरक विचार करत होते हे एका पत्राला हे जे उत्तर त्यांनी दिले त्यावरून आढळून येईल* सहभोजनाच्या किती तरी पलीकडे जाणारा हा विचार आहे

२७१. हरिजन आणि सवर्ण यांच्यात विवाह
(याचे मूळ गुजराती जुलै ७, १९४६च्या हरिजनबंधूमध्ये प्रकाशित झाले होते)
पाटिदार आश्रम, सुरत येथील एका मित्राने श्री नरहरी पारीख यांना लिहिले आहे (यातील केवळ काही उतारेच उद्धृत केले आहेत.)-
… आमचा देश स्त्री शिक्षणात मागासलेला आहे आणि त्यातही हरिजन समाजात शिक्षित भगिनी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कमी आहेत. सवर्ण मुलाने शिक्षित हरिजन मुलीशी लग्न करण्याचा सामान्यपणे अर्थ हा होतो की ती भगिनी आपल्या समाजापासून दूर होईल व सवर्ण समाजात मिसळेल. म्हणजेच हरिजन समाजाकरिता ती विशेष काही करू शकणार नाही.
… मला वाटते की हे सर्व बंद झाले पाहिजे.
… एका हरिजन विद्यार्थ्याने मला विचारले “बापू, शिक्षित सवर्ण मुलींचे विवाह शिक्षित हरिजनांशी का करायला लावत नाही? प्रोत्साहन देण्यासारखी तर ही गोष्ट आहे. असे केल्याने शिक्षित सवर्ण मुली हरिजनांबरोबर राहिल्या तर हरिजन भगिनींना बरेच काही शिकायला मिळेल व हरिजन कार्याला बरील गती येईल.”...
शिक्षित हरिजन मुली जर कोणा सवर्ण हिंदू मुलाशी विवाह करतील तर त्या जोडप्याने आपले संपूर्ण आयुष्य हरिजनांच्या सेवेकरिता वाहून घेण्याच्या अटीवरच केले पाहिजे…. जर सवर्ण हिंदू मुली हरिजनांमध्ये हरिजन म्हणून राहू लागल्या तर हरिजन भगिनींना त्यांच्यापासून बरेच काही शिकता येईल. जर शिक्षित हरिजन मुलगी सवर्ण हिंदूशी विवाह करील तर त्या जोडप्याने हरिजनांच्या सेवेकरिता आपले आयुष्य वाहून घेतले पाहिजे. अशा विवाहाचा हेतू उपभोग कधीच असू शकत नाही. ते अयोग्य होईल. मी त्याला कधीही प्रोत्साहन देणार नाही. हे शक्य आहे की सर्वोत्तम हेतूने केलेला विवाहही अपयशात परिवर्तित होऊ शकतो. असे अपघात कोणीही टाळू शकत नाही. एक जरी हरिजन मुलगी सवर्ण हिंदूशी विवाह करणार असेल व ती चारित्र्यवान असेल तर ती गोष्ट हरिजन आणि सवर्ण या दोघांकरिताही चागली असेल. ते चांगले उदाहरण घालून देतील आणि हरिजन मुलगी खरोखरच योग्य असेल तर तिचा सुगंध चोहोकडे पोहोचेल व आपल्या उदाहरणाने इतरांनाही तसे  करण्याकरिता ती प्रेरित करील. मग समाज अशा विवाहांना घाबरणे बंद करील. त्यात काही चूक आहे असा विचार करणे ते बंद करतील. अशा जोडप्याची संतती जर पुढे चांगली निघाली तर अस्पृश्यता दूर होण्याकरिता अजूनच मदत होईल. प्रत्येक सुधारणा गोष्टीतील कासवाच्या गतीने पुढे जात असते. प्रगती हळूहळू होते म्हणून जो असमाधानी असतो त्याला सुधारणा कशी काम करते हे माहीत नसते.
सवर्ण हिंदू मुलींनी हरिजन पती निवडला तर ही गोष्ट निश्चितच वांछनीय होईल. ही गोष्ट जास्त चांगली आहे असे म्हणताना मी कचरतो. कारण यांतून स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी प्रतीच्या आहेत असा अर्थ निघेल. अशा प्रकारचा न्यूनगंड आज अस्तित्वात आहे हे मला माहीत आहे. यामुळे सवर्ण हिंदू मुलीने हरिजन मुलाशी लग्न करण्यापेक्षा हरिजन मुलीने सवर्ण मुलाशी लग्न करणे अधिक चांगले राहील. माझे जर चालले असते तर माझ्या प्रभावाखाली असलेल्या सर्व सवर्ण हिंदू मुलींना हरिजन वर निवडण्याकरिता मी सांगितले असते. ही गोष्ट अतिशय कठीण आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. पूर्वग्रह दूर करणे फार कठीण असते. हे पूर्वग्रह हसण्यावर नेण्यासारखेही नसतात. त्यांच्यावर धीराने विजय मिळवावा लागतो. परंतु मुलीला वाटत असेल की आता आपण हरिजनाशी विवाह केला, आपले काम संपले. असे करून ती जर भोगविलासात रममाण होणार असेल तर फुफाट्यातून निघून आगीत पडल्यासारखी तिची अवस्था होईल. ही अवस्था तर पूर्वीपेक्षाही वाईट होईल. प्रत्येक विवाहाची अंतिम कसोटी विवाहित जोडप्यात सेवाभाव किती वृद्धिंगत होतो ही आहे. अशा मिश्र विवाहाबद्दल समाजाला वाटणारा तिटकारा सेवाभावानेच कमी होण्याची शक्यता असते. असे झाले की अखेरीस एकच वर्ण शिल्लक राहील, व तो भंगी म्हणजे सुधारक वा घाण साफ करणारा या सुंदर नावाने ओळखला जाईल. असा सुखद दिवस लवकरच उगवावा म्हणून आपण प्रार्थना करू या. पत्रलेखकाने लक्षात ठेवावे की मी कितीही सदिच्छा व्यक्त केल्या तरी केवळ तेवढ्यामुळे त्या अस्तित्वात येऊ शकत नाहीत. हा विचार व्यक्त केल्यामुळे मला एकाही हरिजन मुलीचे सवर्ण मुलाशी लग्न लावून देण्यात यश आलेले नाही. माझ्याजवळ एक सवर्ण मुलगी आहे जिने तिच्या वडिलांच्या परवानगीने आणि त्यांनी निवडलेल्या हरिजन मुलाशी लग्न करण्याचे ठरवले आहे आणि तो मुलगा सध्या सेवाग्राम येथे प्रशिक्षण घेत आहे. ईश्वराची इच्छा असेल तर हा विवाह लवकरच पार पडेल.
[आगगाडीत.] पुणे, जून ३०, १९४६
हरिजन, जूलै ७, १९४६
*ब्रिजमोहनजी हेडा यांच्या फेसबुकवरुन साभार*

No comments:

Post a Comment