Blog Archive

Wednesday, 31 May 2017

तुम्ही फक्त हिन्दू धर्मावरच टिका करता, हिम्मत असेल तर मुस्लिम धर्मावर टिका करून दाखवा

'तुम्ही फक्त हिन्दू धर्मावरच टिका करता, हिम्मत असेल तर मुस्लिम धर्मावर टिका करून दाखवा.त्यांच्या कर्मकांडावर बोला.आम्हालाच नका शिकवू.' अशा प्रकारे दिशाभूल करून अस्मिता जागवणारी वाक्ये 'गर्वसे कहो...' वाले मोठ्या त्वेषाने उधळत असतात. आणि पुरोगाम्यांना तुच्छ लेखून जातीय ठरवण्यात धन्यता मानतात. खरेतर आजचे पुरोगामी हे लोकहीतवादी, विवेकानंद, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, कबीर, बुध्द आणि बाबासाहेब आंबेडकर,आगरकर आणि सावरकर यांच्या सुधारणावादी विचारांवर चालणारे आहेत. या प्रभूती त्यांच्याच धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी आयुष्यभर झिजल्या, अणि आम्ही वापरतो त्यापेक्षाही जहाल शब्दात टिका केली; तेव्हा त्यांना कुणीही जातीयवादी ठरवले नाही की तुम्ही आमच्याच् धर्मावर टिका का करता, असा कर्कश तर्कदुष्ट टाहोही फोडला नाही...एवढेच काय पण त्यांच्या हत्याही केल्या नाहीत.परंतू आज मात्र ज्यांचा या बहुजन हिंदूंच्या समता आणि प्रगतीला विरोध असतो, ते लगेच पुरोगामी आणि सुधारणावादी चळवळीला जोरदार विरोध करतात , वेळ पडल्यास हे मनुवादी धर्मांध लोक, पुरोगामी हिंदूंची हत्या करायलाही मागेपुढे पाहत नाही, हेही तितकेच सत्य आहे . वर मोठ्या तोंडाने 'हिंदू धर्म हा सहिष्णु धर्म आहे,' असे निर्लज्जपणे म्हणतात.

खरेतर आम्हाला हिंदु धर्मावर टीका करणे अजिबात आवडत नाही .  हिंदु धर्मात स्वातंत्र्य,समता आणि न्यायाची व्यवस्था प्रस्थापित व्हावी एवढीच आमची इच्छा आहे . त्यामुळे जर रोग्याला बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करायची असेल, तर शरीराचा रोगट भाग कात्रीने कापावाच लागतो , अन्यथा रोगी दगावू शकतो. म्हणून कात्रीने , ब्लेड्सने वा योग्य त्या शस्त्राने शरीरावर शस्त्रक्रिया करणे जसे चुकीचे ठरत नाही,तसेच हिंदू धर्मातील काही गोष्टीवर टीका करणे अनिवार्य ठरते...ते चुकीचे ठरत नाही . खोटा इतिहास आणि पुराणातील भाकडकथा तसेच दैववादाच्या नावाखाली बहुजनांचे शोषण करणे कधीही मानवतेच्या व्याख्येत बसत नाही . बहुजन, हिंदु, विवेकवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी बनावे आणि कुणाच्या संमोहाला न भुलता स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र विचार करावा . तसेच तो बुवाबाबांच्या भोंदुगिरीला न फसता अंधश्रद्धा व कर्मकांडामध्ये अडकू नये,एवढीच संतांची  इच्छा होती आणि आजच्या समाजसुधारकांची आहे. दाभोळकर , पानसरे , कलबुर्गी यांना त्यासाठी खुप मोठी किंमत चुकवावी लागली . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जर भारताची राज्यघटना लिहिली नसती तर या बहुजन हिंदुंची आज काय अवस्था झाली असती याची कल्पनाही करवत नाही .

पुरोगामी चळवळ ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही तर धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषण , वर्णभेद आणि मनुवाद्यांच्या वर्चस्ववादाच्या विरोधात आहे . तेव्हा धर्मांध मनुवाद्यांनो, तुम्ही दलित अत्याचार , धार्मिक शोषण , बहुजनांच्या शैक्षणिक , आर्थिक दुरास्थेबाबत सोईस्कर मौन बाळगता तसेच वंचित वर्गाच्या आरक्षणालाही नेहमीच विरोध करता त्यामुळे तुम्हाला बहुजन हिंदूंबद्दल किती बंधुभाव आणि आत्मियता आहे हे दिसुन येतेय. तेव्हा वैदिक सनातन्यांनो, आता तुम्ही कांगावखोरपणा करून खुप दिवस बहुजनांना फसवू शकणार नाही हे लक्षात ठेवा. (^M^) (^J^) (मनोगते)

बोलो, जय गोमुत्र... जय गोबर... :- जेट जगदीश. (^j^)

गोमुत्राने कर्करोग बरा झालेला एक तरी रुग्ण भारतात सापडेल का ? तसेच दमा , हृदयरोग , मधुमेह , किडनीसारख्या असाध्य रोगांवर गोमुत्र उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवणारा कोणी नशीबवान गायाळ गोभक्त आहे का ?

गुगलवर गुमूत्राच्या बहुगुणी मात्रेसंबंधी अनेक फेक गोष्टी प्रसिद्ध होत असतात. अंधभक्तांनी हे लक्षात ठेवावे की, नवीन शोध स्वीकारण्याची एक प्रक्रिया असते. त्यातून तावून सुलाखून जे टिकते तोच शोध शास्त्रीय जगात मान्य होतो. म्हणून गोमूत्राच्या बाबतीतील माहिती कोणत्या शास्त्रीय मासिकात हे प्रसिद्ध झाली आहे ते महत्वाचे ठरते. अन्यथा ते नुसते भावना उद्दीपित करून अस्मिता गोंजारणारे टाकावूच ठरते.

जसे अनेक हिंदुत्ववादी शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये पुष्पक विमानाच्या अस्तित्वाचे समर्थन करण्याचा मूर्खपणा करतात, त्याचप्रमाणे गोमूत्राने कर्करोग, हृदरोग असे अनेक रोग बरे होतात म्हणणे हे  त्यातीलच एक उदाहरण म्हणता येईल. म्हणून त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर स्वीकारले न जाता फक्त भारतापूरतेच मर्यादित राहाते. जर खरेच गोमूत्र एवढे बहुगुणी असेल ह्या संशोधनाला जगन्मान्यता का मिळत नाही ? आणि असे लाखो रुग्ण आहेत की ज्यांच्यावर  हा उपचार चालू असता इतर उपचार चालू ठेवायची परवानगी त्यांना देण्यात येते. ते कशासाठी ? तेव्हा आता भावनेचा उन्माद बंद करून बुद्धीचा वापर करायला हे अंधभक्त केव्हा शिकणार ? बहुदा नाहीच. कारण त्यांचा मेंदू धर्मअंधतेत गहाण जो पडलाय.

गांधीजी अस्पृश्यता निवारणाबद्दल किती क्रांतिकरक विचार करत होते हे एका पत्राला हे जे उत्तर त्यांनी दिले त्यावरून आढळून येईल* सहभोजनाच्या किती तरी पलीकडे जाणारा हा विचार आहे

२७१. हरिजन आणि सवर्ण यांच्यात विवाह
(याचे मूळ गुजराती जुलै ७, १९४६च्या हरिजनबंधूमध्ये प्रकाशित झाले होते)
पाटिदार आश्रम, सुरत येथील एका मित्राने श्री नरहरी पारीख यांना लिहिले आहे (यातील केवळ काही उतारेच उद्धृत केले आहेत.)-
… आमचा देश स्त्री शिक्षणात मागासलेला आहे आणि त्यातही हरिजन समाजात शिक्षित भगिनी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कमी आहेत. सवर्ण मुलाने शिक्षित हरिजन मुलीशी लग्न करण्याचा सामान्यपणे अर्थ हा होतो की ती भगिनी आपल्या समाजापासून दूर होईल व सवर्ण समाजात मिसळेल. म्हणजेच हरिजन समाजाकरिता ती विशेष काही करू शकणार नाही.
… मला वाटते की हे सर्व बंद झाले पाहिजे.
… एका हरिजन विद्यार्थ्याने मला विचारले “बापू, शिक्षित सवर्ण मुलींचे विवाह शिक्षित हरिजनांशी का करायला लावत नाही? प्रोत्साहन देण्यासारखी तर ही गोष्ट आहे. असे केल्याने शिक्षित सवर्ण मुली हरिजनांबरोबर राहिल्या तर हरिजन भगिनींना बरेच काही शिकायला मिळेल व हरिजन कार्याला बरील गती येईल.”...
शिक्षित हरिजन मुली जर कोणा सवर्ण हिंदू मुलाशी विवाह करतील तर त्या जोडप्याने आपले संपूर्ण आयुष्य हरिजनांच्या सेवेकरिता वाहून घेण्याच्या अटीवरच केले पाहिजे…. जर सवर्ण हिंदू मुली हरिजनांमध्ये हरिजन म्हणून राहू लागल्या तर हरिजन भगिनींना त्यांच्यापासून बरेच काही शिकता येईल. जर शिक्षित हरिजन मुलगी सवर्ण हिंदूशी विवाह करील तर त्या जोडप्याने हरिजनांच्या सेवेकरिता आपले आयुष्य वाहून घेतले पाहिजे. अशा विवाहाचा हेतू उपभोग कधीच असू शकत नाही. ते अयोग्य होईल. मी त्याला कधीही प्रोत्साहन देणार नाही. हे शक्य आहे की सर्वोत्तम हेतूने केलेला विवाहही अपयशात परिवर्तित होऊ शकतो. असे अपघात कोणीही टाळू शकत नाही. एक जरी हरिजन मुलगी सवर्ण हिंदूशी विवाह करणार असेल व ती चारित्र्यवान असेल तर ती गोष्ट हरिजन आणि सवर्ण या दोघांकरिताही चागली असेल. ते चांगले उदाहरण घालून देतील आणि हरिजन मुलगी खरोखरच योग्य असेल तर तिचा सुगंध चोहोकडे पोहोचेल व आपल्या उदाहरणाने इतरांनाही तसे  करण्याकरिता ती प्रेरित करील. मग समाज अशा विवाहांना घाबरणे बंद करील. त्यात काही चूक आहे असा विचार करणे ते बंद करतील. अशा जोडप्याची संतती जर पुढे चांगली निघाली तर अस्पृश्यता दूर होण्याकरिता अजूनच मदत होईल. प्रत्येक सुधारणा गोष्टीतील कासवाच्या गतीने पुढे जात असते. प्रगती हळूहळू होते म्हणून जो असमाधानी असतो त्याला सुधारणा कशी काम करते हे माहीत नसते.
सवर्ण हिंदू मुलींनी हरिजन पती निवडला तर ही गोष्ट निश्चितच वांछनीय होईल. ही गोष्ट जास्त चांगली आहे असे म्हणताना मी कचरतो. कारण यांतून स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी प्रतीच्या आहेत असा अर्थ निघेल. अशा प्रकारचा न्यूनगंड आज अस्तित्वात आहे हे मला माहीत आहे. यामुळे सवर्ण हिंदू मुलीने हरिजन मुलाशी लग्न करण्यापेक्षा हरिजन मुलीने सवर्ण मुलाशी लग्न करणे अधिक चांगले राहील. माझे जर चालले असते तर माझ्या प्रभावाखाली असलेल्या सर्व सवर्ण हिंदू मुलींना हरिजन वर निवडण्याकरिता मी सांगितले असते. ही गोष्ट अतिशय कठीण आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. पूर्वग्रह दूर करणे फार कठीण असते. हे पूर्वग्रह हसण्यावर नेण्यासारखेही नसतात. त्यांच्यावर धीराने विजय मिळवावा लागतो. परंतु मुलीला वाटत असेल की आता आपण हरिजनाशी विवाह केला, आपले काम संपले. असे करून ती जर भोगविलासात रममाण होणार असेल तर फुफाट्यातून निघून आगीत पडल्यासारखी तिची अवस्था होईल. ही अवस्था तर पूर्वीपेक्षाही वाईट होईल. प्रत्येक विवाहाची अंतिम कसोटी विवाहित जोडप्यात सेवाभाव किती वृद्धिंगत होतो ही आहे. अशा मिश्र विवाहाबद्दल समाजाला वाटणारा तिटकारा सेवाभावानेच कमी होण्याची शक्यता असते. असे झाले की अखेरीस एकच वर्ण शिल्लक राहील, व तो भंगी म्हणजे सुधारक वा घाण साफ करणारा या सुंदर नावाने ओळखला जाईल. असा सुखद दिवस लवकरच उगवावा म्हणून आपण प्रार्थना करू या. पत्रलेखकाने लक्षात ठेवावे की मी कितीही सदिच्छा व्यक्त केल्या तरी केवळ तेवढ्यामुळे त्या अस्तित्वात येऊ शकत नाहीत. हा विचार व्यक्त केल्यामुळे मला एकाही हरिजन मुलीचे सवर्ण मुलाशी लग्न लावून देण्यात यश आलेले नाही. माझ्याजवळ एक सवर्ण मुलगी आहे जिने तिच्या वडिलांच्या परवानगीने आणि त्यांनी निवडलेल्या हरिजन मुलाशी लग्न करण्याचे ठरवले आहे आणि तो मुलगा सध्या सेवाग्राम येथे प्रशिक्षण घेत आहे. ईश्वराची इच्छा असेल तर हा विवाह लवकरच पार पडेल.
[आगगाडीत.] पुणे, जून ३०, १९४६
हरिजन, जूलै ७, १९४६
*ब्रिजमोहनजी हेडा यांच्या फेसबुकवरुन साभार*

धर्म,अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही.- पु.ल.देशपांडे

भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा.
बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राह्मण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राह्मणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. *पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे!*
कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. *ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.*

न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. *आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो.* जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. *तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे.* एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. *मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत.* केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.
मनुष्यस्वभावात हा जात नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.

आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. *ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे.* अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. *खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.*

आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. *कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात.* आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. *जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलितांना उध्द्वस्त करण्यात येते.* मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

*एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.*

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. *मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.*

विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. *सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे.*
_धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील._

*मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.*

*_पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे._*

संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.
त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. *अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ.*
त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. *त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते.* दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे.
*पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.*
माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली *पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.*
कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. *‘Justice is Simply the interest of the Stronger’.*

मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली.

*‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते.* कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.

*लेखक- पु.ल.देशपांडे*
*(’एक शुन्य मी’ या पुस्तकातून)*