Blog Archive

Monday, 29 May 2017

माझा पगार होतो.. तेव्हा,माझी पत्नी-दंगलकार नितीन चंदनशिवे..

माझा पगार होतो..
तेव्हा,माझी पत्नी
तिच्या सुंदर हस्ताक्षरात
लिहते किराणा मालाची यादी....
हीच यादी माझ्यासाठी
जगातील एक सुंदर कविता असते...........
आणि या कवितेची खरी समीक्षा फक्त तो दुकानदार करतो,
तो एक एक शब्द खोडत जातो,
पुढे आकडा वाढत जातो,
आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो...
त्याच्या लाल वहीत असतं
माझ्या नावाचं एक पान....
किती जमा किती शिल्लक
एकच आकडा उरतो..
बाकी शून्य होत नाही कधीच...
जीव तळमळतो
फक्त एवढ्यासाठी की,
त्याला सांगावंसं वाटतं प्रत्येकवेळी बाबारे
माझं नाव लिहताना
पुढे कवी म्हणून लिहीत जा...
कधी बोलता आलं नाही,
तो व्यापारी आहे
त्याला व्यवहार कळतो...
हिशोब पूर्ण झाला की,
हातातलं पेन कानावर ठेवून
एवढंच म्हणतो,
यावेळी ठीक आहे राव
पण पुढच्यावेळी मी ऐकून
घेणार नाही....
पुन्हा उधार देणार नाही..
पिशवीभरून कविता
सांभाळून आणताना
भूक कवितेशी बोलू लागते
आणि मी जगाला जगण्याचं तत्वज्ञान सांगू पाहतो....
आशावादी का काय म्हणतात ते...
माझीच बाकी शून्य होत नाही...
आशावादी शब्दांनो कधीतरी
त्या लाल वहीत जा..
माझ्या पानावर थांबा थोडावेळ..
आणि सांगा त्या आकड्यांना
बाकी शून्य येण्याचं एखादं सूत्र...
आणि हसू द्या तिच्या गळ्यातलं
एकदातरी मंगळसूत्र....
------------
दंगलकार नितीन चंदनशिवे..
कवठेमहांकाळ
सांगली.
सध्या पुणे.
8855800195

7 comments: